मुंबई (NCP Delimitation Political Rift Intensifies) : लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेच्या अर्थात डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातच वेगवेगळे मतप्रवाह समोर आले आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्व राज्यांमध्ये लोकसभेच्या जागा समान प्रमाणात ५० टक्क्यांनी वाढविण्याचा प्रस्ताव असेल, तर डिलिमिटेशन विधेयकाला तत्त्वतः पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली. मात्र, त्यांच्या या भूमिकेला पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या कन्या नताशा आव्हाड यांनी थेट विरोध केला. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी मुलीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थन करताना डिलिमिटेशनबाबतचा अंतिम निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील, असे स्पष्ट केले. त्यामुळे या मुद्द्यावरून शरद पवार गटातील अंतर्गत मतभेदांची चर्चा रंगली आहे.
केंद्राकडून प्रस्तावित डिलिमिटेशनमध्ये प्रत्येक राज्यातील लोकसभेच्या जागा ५० टक्क्यांनी वाढविण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. लोकसंख्येच्या आधारावर काही राज्यांवर अन्याय होणार नसेल आणि सर्व राज्यांना समान प्रमाणात जागा वाढवून दिल्या जाणार असतील, तर या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करता येईल, अशी भूमिका त्यांनी मांडली. तसेच महिला आरक्षणाची अंमलबजावणीही त्याला जोडली जावी, असे त्यांनी स्पष्ट केले. (NCP Delimitation Political Rift Intensifies)
मात्र, सुप्रिया सुळे यांच्या या भूमिकेनंतर नताशा आव्हाड यांनी सोशल मीडियावरून थेट नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, "माझा पक्ष डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देण्याचा विचार करत असल्याच्या बातम्यांमध्ये तथ्य असेल, तर मी या निर्णयाचा तीव्र निषेध करते. मतदारांची वाढती संख्या लक्षात घेता डिलिमिटेशन आवश्यक असले, तरी प्रस्तावित डिलिमिटेशन बिल हे विरोधकांना मिळू शकणाऱ्या जागांची संख्या मर्यादित करण्याचा आणि त्याचवेळी भाजपला अनुचित राजकीय फायदा मिळवून देण्याचा घटनाबाह्य प्रयत्न आहे. भाजपची लोकप्रियता सातत्याने घसरत असताना, सत्तेला चिकटून राहण्यासाठीचा हा त्यांचा शेवटचा केविलवाणा प्रयत्न आहे. या देशाची लोकशाही व्यवस्था टिकवून ठेवण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाने या बिलाला प्रखर विरोध केला पाहिजे. या बिलाला पाठिंबा देणे म्हणजे देशाशी आणि देशाच्या संविधानाशी प्रतारणा करण्यासारखेच आहे. पक्षाने आपल्या भूमिकेचा फेरविचार करावा, अशी मला आशा आहे," असे त्या म्हणाल्या. (NCP Delimitation Political Rift Intensifies)
जितेंद्र आव्हाडांची सावध भूमिका
यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या कन्येच्या या नाराजीवर सावध भूमिका घेतल्याचे दिसले. ते म्हणाले की, "नताशा ही आपली एकुलती एक मुलगी असून, तिने काय बोलावे किंवा बोलू नये, यावर कुटुंबाने कधीही अंकुश ठेवलेला नाही. तिला आपले मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. आपल्या कुटुंबावर आणि आपल्यावर पवारसाहेबांचे मोठे उपकार असून त्यांची परतफेड या जन्मात करता येणार नाही," असे ते म्हणाले. (NCP Delimitation Political Rift Intensifies)
ते पुढे म्हणाले की, "डिलिमिटेशनसारख्या राष्ट्रीय पातळीवरील विषयावर अंतिम निर्णय आपण घेणार नाही. मी काही खासदार नाही. वरचे निर्णय मी घेणार नाही. सुप्रियाताई, शरद पवारसाहेब आणि पक्षाचे खासदार याबाबत निर्णय घेतील," असेही ते म्हणाले.
दरम्यान, डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरून काँग्रेसनेही सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेपासून अंतर ठेवले आहे. त्यामुळे एकीकडे महाविकास आघाडीत या विषयावर मतभिन्नता दिसत असताना, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातही या प्रस्तावाबाबत वेगवेगळे सूर उमटले आहेत. आता पक्षाची अधिकृत भूमिका काय राहणार आणि नताशा आव्हाड यांच्या विरोधाची पक्षश्रेष्ठी कशी दखल घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (NCP Delimitation Political Rift Intensifies)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....