मुंबई : रोहित पवार म्हणजे प्रसिद्धीची हाव असलेले हावरट व्यक्तिमत्त्व असून आज अजितदादांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमाचे महत्त्व कमी व्हावे, म्हणून केलेला हा त्यांचा उपक्रम आहे, अशा शब्दात भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी रोहित पवार यांच्यावर पलटवार केला. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातावरून रोहित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विमान सेवा देणारे रोहित सिंग यांच्यातील संबंधांवर प्रश्न उपस्थित केले.
यावर उत्तर देताना नवनाथ बन म्हणाले की, "रोहित सिंग आणि त्याची व्हीएसआर कंपनी ही २०१३ पासून राजकीय पक्षांना आणि राज्य सरकारला विमान सेवा देत आहे. त्यामुळे केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाही, तर अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या विमानाने प्रवास केला. केवळ रोहित सिंग याच्याशी नाही, तर अनेक वैमानिकांसोबत त्यामुळे सार्याच नेत्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. अशात कुणाच्या लग्नाला जाणे, ही सामान्य बाब आहे. अनेक वैमानिक आणि सहवैमानिकांसोबत त्यामुळे सार्याच नेत्यांचे फोटोही आहेत. एका फोटोवरुन असे आरोप करणे, हे अत्यंत खालच्या स्तराचे राजकारण आहे."
शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करावी
"रोहित पवारांनी आज जे केले, त्यातून त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब यांचे संस्कार आणि महाराष्ट्राच्या प्रगल्भ राजकीय संस्कृतीला मातीत घातले आहे. याचा करावा तितका धिक्कार कमी आहे. आमची अजून एक मागणी आहे की, रोहित पवार यांच्या या आरोपांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) आणि शरद पवार साहेबांनीही आपली भूमिका तातडीने स्पष्ट केली पाहिजे," असेही नवनाथ बन म्हणाले.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....