मुंबई (Mumbai Sindhudurg Daily Flights) : दोन वर्षांचा प्रतीक्षा काळ संपला... कोकणवासीयांचे विमानप्रवासाचे स्वप्न पुन्हा एकदा आकाशात झेपावले! मुंबई ते सिंधुदुर्ग हा शेकडो किलोमीटरचा प्रवास आता अवघ्या एका तासात पूर्ण होणार आहे. नवी मुंबई-सिंधुदुर्ग-नवी मुंबई विमानसेवा सोमवारपासून पुन्हा सुरू झाली असून, ‘फ्लाय ९१’कडून आठवड्याचे सातही दिवस ही सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. सिंधुदुर्गच्या पर्यटनाला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देण्यासह कोकणवासीयांच्या दळणवळणाला मोठी गती देणाऱ्या या सेवेचा शुभारंभ मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वतः विमानप्रवास करून केला. आमदार दीपक केसरकर यांनीही या पहिल्या प्रवासात सहभाग घेतला.
चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळावर विमानाचे आगमन होताच कोकणी संस्कृतीचे दर्शन घडले. ढोल-ताशांचा गजर, औक्षण, पुष्पवृष्टी आणि मिठाईचे वाटप करत मुंबईहून आलेल्या प्रवाशांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. पालकमंत्री नितेश राणे यांनी केक कापून या ऐतिहासिक क्षणाचा आनंद साजरा केला. यावेळी आमदार नीलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर यांच्यासह लोकप्रतिनिधी, भाजपा-शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Mumbai Sindhudurg Daily Flights)
या निमित्ताने मुंबईहून सिंधुदुर्गकडे जाणाऱ्या पहिल्या प्रवाशाला तसेच सिंधुदुर्गहून मुंबईकडे जाणाऱ्या पहिल्या प्रवाशाला मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते बोर्डिंग पास प्रदान करण्यात आले. प्रवाशांना शुभेच्छा देतानाच ही विमानसेवा आता कायमस्वरूपी सुरू राहील, ती पुन्हा बंद पडणार नाही, अशी ठाम ग्वाही त्यांनी दिली.
विमानात घुमले मालवणी गाऱ्हाणे!
विमानसेवेचा शुभारंभ केवळ प्रवासापुरता मर्यादित राहिला नाही, तर त्याला अस्सल कोकणी संस्कृतीचीही जोड मिळाली. विमानाने उड्डाण घेताच कोकणातील प्रसिद्ध भजनी बुवा प्रमोद धुरी यांनी विमानातील उद्घोषणा प्रणालीवरून मालवणी शैलीत देवाला गाऱ्हाणे घातले. ही विमानसेवा कोणत्याही अडथळ्याविना अखंड सुरू राहावी आणि प्रत्येक प्रवाशाचा प्रवास सुखाचा व सुरक्षित व्हावा, अशी प्रार्थना त्यांनी केली. त्यांच्या या अनोख्या उपक्रमाला प्रवाशांनी टाळ्यांच्या कडकडाटात आणि ‘होय महाराजा’च्या जयघोषात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे विमानातील पहिलाच प्रवास कोकणी परंपरेच्या अनोख्या आठवणीने संस्मरणीय ठरला. (Mumbai Sindhudurg Daily Flights)
पर्यटन, रोजगाराला मिळणार नवी भरारी
सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटनाच्या जागतिक नकाशावर उज्ज्वल स्थान मिळवून देण्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचे स्वप्न आज प्रत्यक्षात साकार होत आहे. सिंधुदुर्ग विमानतळ सुरू करण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. मी पालकमंत्री झाल्यापासून त्यांचा पाठपुरावा सुरू होता. जिल्ह्यातील पर्यटन व विकास व रोजगार निर्मिती यामध्ये सिंधुदुर्ग विमानतळाची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्य शासन आणि प्रशासनाने एकत्रित प्रयत्न केले. त्यामुळे आज सुरू झालेली सिंधुदुर्ग विमानतळ सेवा आता कधीही बंद पडणार नाही. - नितेश राणे, मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री, सिंधुदुर्ग .
‘मुंबईला जाण्यासाठी हवी असलेली सुविधा आज मिळाली’
सिंधुदुर्ग ते नवी मुंबई या विमानसेवेचे पहिले प्रवासी होण्याचा मान आम्हाला मिळाला. यासाठी मंत्री नितेश राणे, नीलेश राणे आणि दीपकभाई केसरकर यांचे आभार. मुंबईला जाण्यासाठी कोकणवासीयांना ज्या सुविधेची प्रतीक्षा होती, ती आज प्रत्यक्षात सुरू झाली आहे, अशी भावना प्रवासी प्रणय तेली यांनी व्यक्त केली. -प्रणय तेली, प्रवासी (Mumbai Sindhudurg Daily Flights)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.