आव्हाडांचे 'दैव' की राजकीय संभ्रमाचे गाणे? स्टेटस ठेवले, चर्चा झाली अन् खुलासा सुरू!

विलिनीकरणाच्या चर्चेच्या मध्यावर "दैव जाणिले कुणी"ची निवड; स्टेटस हटवून गाणे सर्च करताना चुकून गेल्याचा खुलासा

    16-Nov-2026
Jitendra Awhad Status Political Controversy
 
ठाणे (Jitendra Awhad Status Political Controversy) : राजकारणात योगायोगही कधी कधी चर्चेचा विषय बनतात. विशेषतः तो योगायोग एखाद्या सामान्य कार्यकर्त्याच्या नव्हे, तर राजकारणातील प्रत्येक घडामोडीवर ऊठसूट भाष्य करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्या बाबतीत घडला तर! राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापलेले असताना आव्हाडांच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर झळकले 'दैव जाणिले कुणी' हे स्टेटस..! आता गाणे ऐकणे किंवा आवडलेले गाणे स्टेटसला ठेवणे यात गैर काहीच नाही. पण राजकीय घडामोडींच्या ऐन मध्यावर या गाण्याची निवड झाली, त्यानंतर त्यावर चर्चा सुरू झाली आणि लगेच स्टेटस हटवले गेले. मग खुलासा आला की गाणे सर्च करताना चुकून स्टेटसला गेले! हा सगळा घटनाक्रम राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला नसता तरच नवल!
 
आव्हाड हे काही राजकारणात नवखे नाहीत. सोशल मीडियावरून विरोधकांना सतत लक्ष्य करणे, राजकीय घटनांवर तावातावाने प्रतिक्रिया देणे आणि आपल्या चुकीच्या भूमिकेचेही समर्थन करणे, ही त्यांची ओळख आहे. मग स्वतःच्या स्टेटसवरून चर्चा सुरू झाल्यानंतर मात्र त्याला गाणे सर्च करतानाचा अपघात म्हणावे लागले. राजकीय विधानांच्या अर्थाचे विश्लेषण करणाऱ्या नेत्याच्या स्वतःच्या स्टेटसचा अर्थ लावला जाऊ नये, अशी अपेक्षा तरी कशी ठेवता येईल? (Jitendra Awhad Status Political Controversy)
 
खरा मुद्दा गाण्याचा नाही, तर त्याच्या वेळेचा आहे. एकीकडे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे. दुसरीकडे मुलगी नताशाने ठेवलेल्या स्टेटस मुळे पक्षातूनच नेतृत्वला आव्हान देण्याची चर्चा सुरू असताना नेमकं त्याचवेळी हे स्टेटस ठेवल्याने चर्चा तर होणारच..किंबहुना ती व्हावी अशीच आव्हाडांची इच्छा असावी.. त्यानंतर ते हटवून स्पष्टीकरण देणे, या घटनाक्रमातून अनेक तर्कांना जागा मिळाली. अर्थात, स्टेटसचा हेतू विलिनीकरणाशी संबंधित होता, असा पुरावा नाही. पण राजकीय वातावरणात अशा गोष्टींची चर्चा होणारच!
 
त्यात भर म्हणजे आव्हाडांचे पुढचे विधान. 'माझी सत्ता म्हणजे शरद पवार, माझे सर्वस्व शरद पवार' असे सांगत त्यांनी पुन्हा एकदा आपली निष्ठा स्पष्ट केली. विलिनीकरणाच्या चर्चेत आपण सहभागी नसल्याचेही सांगितले. मग प्रश्न असा की, पक्षातील एवढ्या महत्त्वाच्या घडामोडींबाबत आव्हाड नेमके किती अनभिज्ञ आहेत? आणि जर ते या चर्चेत सहभागीच नसतील, तर त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत सुरू असलेल्या चर्चांना स्पष्ट उत्तर देण्याची जबाबदारी कोणाची? (Jitendra Awhad Status Political Controversy)
 
शरद पवारांवरील निष्ठा वारंवार सांगण्याची गरज का भासते, हाही चर्चेचा मुद्दा आहे. निष्ठा ही प्रत्येक वेळी जाहीर करायची गोष्ट नसते; ती राजकीय भूमिका आणि कृतीतूनही दिसते. त्यातच आपण पक्षातील निर्णयप्रक्रियेच्या चर्चेत नसल्याचे आव्हाड स्वतः सांगतात. मग एकीकडे पवार हेच सर्वस्व आणि दुसरीकडे महत्त्वाच्या राजकीय चर्चांपासून आपण दूर, या दोन्ही विधानांचा राजकीय अर्थ काय लावायचा?
 
विरोधकांच्या स्टेटसवरून राजकीय अर्थ काढणारे आव्हाड आता स्वतःच्या स्टेटसवरून निर्माण झालेल्या प्रश्नांना सामोरे जात आहेत. शेवटी गाणे चुकून स्टेटसला गेले असेल किंवा नसेल पण राष्ट्रवादी च्या दोन्ही गटांच्या एकत्रीकरणा नंतर आव्हाड आणि त्यांची कन्या यांच्या बाबतीतला राजकीय चर्चेचा सूर मात्र चुकून लागलेला नाही असच दिसून येत आहे. (Jitendra Awhad Status Political Controversy)





संबंधित मजकूर