मुलीच्या ट्विट ने आव्हाडांची राजकीय कोंडी; उत्तर देताना पवारनिष्ठेचा पाढा!
नताशाने पक्षाच्या संभाव्य भूमिकेलाच संविधानाशी प्रतारणा ठरवले; आव्हाडांकडून अभिव्यक्तिस्वातंत्र्य, पवारांचे उपकार आणि स्वतःच्या राजकीय निष्ठेचा दाखला; डिलिमिटेशनवर मात्र ठोस भूमिका गुलदस्त्यात!
ठाणे (Awhad Faces Delimitation Political Questions) : विरोधकांच्या प्रत्येक विधानाला उठसुठ प्रत्युत्तर देणारे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना यावेळी स्वतःच्या कन्येने सोशल मीडियावर मांडलेल्या भूमिकेवरून स्पष्टीकरण आणि सारवा सारव करण्याची वेळ आली आहे. डिलिमिटेशन अर्थात मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पक्षाने पाठिंबा देण्याचा विचार केल्याच्या चर्चेवर नताशा आव्हाड हिने थेट पक्षालाच सुनावले. प्रस्तावित विधेयकाला पाठिंबा देणे म्हणजे देशाशी आणि संविधानाशी प्रतारणा करण्यासारखे असल्याचे म्हणत तिने पक्षाने आपल्या भूमिकेचा फेरविचार करावा, असे जाहीर आवाहन केले. एका बाजूला मुलीचे हे परखड स्टेटस आणि दुसऱ्या बाजूला आव्हाडांची त्यानंतरची प्रदीर्घ प्रतिक्रिया यामुळे त्यांच्या राजकीय भूमिकेवर नव्याने प्रश्न उपस्थित झाले आहेत.
नताशा आव्हाड हिने आपल्या स्टेटसमधून केवळ डिलिमिटेशन विधेयकाला विरोध केला नाही, तर पक्षाच्या संभाव्य निर्णयावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भाजपला अनुचित राजकीय फायदा मिळवून देण्यासाठी आणि विरोधकांच्या जागा मर्यादित करण्यासाठी हा घटनाबाह्य प्रयत्न असल्याचा आरोपही तिने केला. विशेष म्हणजे, हा आक्षेप विरोधी पक्षांकडून नव्हे, तर जितेंद्र आव्हाड यांच्या स्वतःच्या कुटुंबातून आणि तोही थेट सोशल मीडियावरून नोंदवला गेला. त्यामुळे या स्टेटसची राजकीय चर्चा होणे स्वाभाविक होते. (Awhad Faces Delimitation Political Questions)
या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना आव्हाडांची चांगलीच गोची झाल्याचे दिसून आले ..त्यांनी मुलीच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा पुढे केला. 'ती माझी एकुलती एक कन्या आहे. आजपर्यंत तिच्या स्वातंत्र्यावर घरातील कुणीही अंकुश ठेवलेला नाही. तिने काय बोलावे आणि काय बोलू नये, याबाबत आम्ही कधीही बंधने घातलेली नाहीत,' असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, नताशाने उपस्थित केलेल्या मूळ प्रश्नावर म्हणजेच डिलिमिटेशन विधेयकाला पक्षाने पाठिंबा द्यावा की विरोध करावा, यावर आव्हाडांनी स्वतःची स्पष्ट भूमिका मांडण्याचे सपशेल टाळले. (Awhad Faces Delimitation Political Questions)
पवारांच्या उपकारांचा उल्लेख वारंवार का?
यानंतर आव्हाडांनी शरद पवार यांच्यावरील निष्ठा आणि कुटुंबावर असलेल्या त्यांच्या उपकारांचा पाढाच वाचण्यास सुरुवात केली.. . 'आमच्या कुटुंबावर, घरादारावर आणि पर्यायाने माझ्या मुलीवर पवार साहेबांचे जे उपकार आहेत, त्याची परतफेड आम्ही या जन्मात करू शकणार नाही,' असे ते म्हणाले. पुढे 'माझी सत्ता म्हणजे शरद पवार. माझे सर्वस्व शरद पवार आहेत. शरद पवार इज इक्वल टू एव्हरीथिंग,' अशा शब्दांत त्यांनी आपली निष्ठा अधोरेखित केली. मात्र, नताशाच्या स्टेटसमधून उपस्थित झालेला मुद्दा हा पवारांवरील निष्ठेचा नसून पक्षाच्या संभाव्य राजकीय निर्णयाचा होता. त्यामुळे विधेयकावरील भूमिकेपेक्षा पवारांवरील निष्ठेचा पाढा वाचण्यावर आव्हाडांचा भर का राहिला, असा सवाल उपस्थित होत आहे.
पक्षाकडून डावलले जात असल्याची खदखद?
पक्षाच्या राजकीय निर्णयप्रक्रियेबाबत बोलताना आव्हाडांनी आपण अशा चर्चांमध्ये कधीच सहभागी नसल्याचे सांगितले. 'मला नवीनीकरणाच्या चर्चेत कधीच घेतलेले नाही. ना पूर्वी होतो, ना दादांबरोबर होतो, ना नंतर होतो. मला चर्चेतच घेतलेले नाही,' असे विधान त्यांनी केले. डिलिमिटेशनसारख्या महत्त्वाच्या विषयावर निर्णय घेणे हे मझ्या सारख्या एका आमदाराचे काम नसून खासदार, सुप्रिया सुळे आणि गरज पडल्यास शरद पवार हे एकत्र बसून निर्णय घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या विधानामुळे पक्षातील निर्णयप्रक्रियेत आपली नेमकी भूमिका काय, याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.(Awhad Faces Delimitation Political Questions)