उरणमध्ये आगीचा तांडव! प्लॅटिनम लॉजिस्टिक्सच्या गोदामाला भीषण आग; परिसरात धुराचे साम्राज्य

    16-Nov-2026
 
 Uran Warehouse Massive Fire
 
रायगड (Uran Warehouse Massive Fire) : रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील वेश्वी गावात प्लॅटिनम लॉजिस्टिक्स सोल्युशन इंडिया या गोदामाला सोमवारी (१६ नोव्हेंबर) सकाळी भीषण आग लागली. सोयाबीन तेल निर्मितीशी संबंधित असलेल्या या युनिटमध्ये लागलेल्या आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. गोदामातून आगीच्या प्रचंड ज्वाळा आणि धुराचे लोट बाहेर पडू लागल्याने परिसरात खळबळ उडाली.
 
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. गोदामातील मोठ्या भागाला आगीने वेढले. आत साठवून ठेवलेले साहित्य तसेच काही रसायने आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीचे व्हिडिओही समोर आले असून त्यामध्ये गोदामातून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडताना दिसत आहे. (Uran Warehouse Massive Fire)
 
घटनेची माहिती मिळताच सिडको अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले. उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत. (Uran Warehouse Massive Fire)
 
दरम्यान, सहाय्यक पोलीस आयुक्त विजय चौधरी यांनी आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे सांगितले. गोदामात रसायनांची गळती झाली असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. आगीत नेमके कोणते साहित्य जळाले, नुकसान किती झाले आणि आगीचे कारण काय, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. तसेच जीवितहानी किंवा जखमींबाबतही अधिकृत पुष्टी झालेली नाही.
 
आगीची तीव्रता लक्षात घेता अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू असून, आग पूर्णपणे नियंत्रणात आल्यानंतरच नुकसानीचा आणि घटनेच्या कारणांचा तपशील स्पष्ट होणार आहे. (Uran Warehouse Massive Fire)





संबंधित मजकूर