अजितदादांची कार्यपद्धती भावी राजकीय पिढ्यांसाठी विद्यापीठ! अजितदादांमुळे महायुतीला स्थिरता आणि सातत्य : अमित शाह

 Amit Shah Praises Ajit Pawar
 
मुंबई (Amit Shah Praises Ajit Pawar) : “संवेदनशीलतेने, नियोजनबद्ध पद्धतीने, शिस्तीने आणि निर्धारित वेळेत काम करण्याची अजितदादांनी निर्माण केलेली कार्यपद्धती महाराष्ट्रातील आगामी राजकीय पिढ्यांसाठी एक मोठे विद्यापीठ ठरेल,” असे गौरवोद्गार केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी काढले. अजित पवार यांचे सहकार क्षेत्रातील योगदान, प्रशासनावरील पकड, विकासकामांचा ध्यास आणि सामान्य माणसांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते यांचा उल्लेख करत त्यांनी अजितदादांच्या कार्याचा गौरव केला.
 
पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या अनावरण आणि प्रवेशद्वार नामकरण सोहळ्यात अमित शाह बोलत होते. सोमवार दि.१६ नोव्हेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराला ‘लोकनेते अजितदादा पवार प्रवेशद्वार’ असे नाव देण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह राज्यातील मंत्री, खासदार, आमदार आणि विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते. (Amit Shah Praises Ajit Pawar)
 
अजित पवार यांच्या सहकार क्षेत्रातील अभ्यासाचा उल्लेख करताना शाह म्हणाले, “दूध संघ असोत, प्राथमिक कृषी पतसंस्था (पॅक्स) असोत, साखर कारखाने असोत, नागरी सहकारी बँका असोत किंवा जिल्हा सहकारी बँका; सहकार क्षेत्रातील प्रत्येक समस्येची इतकी सखोल माहिती असलेली व्यक्ती शोधायची झाल्यास संपूर्ण देशात एकच नाव समोर येते, ते म्हणजे अजित पवार.”
 
कोरोना काळातील अजित पवार यांच्या कामाचेही त्यांनी विशेष कौतुक केले. “कोविडच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची कमतरता होती, लसीकरण आणि औषधांच्या व्यवस्थेची मोठी आव्हाने होती. अशा संकटाच्या काळात अजितदादा सकाळी सात वाजताच मंत्रालयात उपलब्ध असायचे. त्यांचा मंत्रालयातील लँडलाइनवरून फोन यायचा आणि काही वेळातच आवश्यक व्यवस्था झाल्याचा संदेश मिळायचा,” असे शाह यांनी सांगितले. (Amit Shah Praises Ajit Pawar)
 
बारामतीच्या विकासाचा उल्लेख करताना शाह म्हणाले, “बारामती हा देशातील सर्वाधिक विकसित मतदारसंघांपैकी एक बनला, यामध्ये स्वर्गीय अजित पवार यांचे मोठे योगदान आहे.”
 
अजित पवार यांच्या राजकीय निर्णयांचा उल्लेख करताना शाह यांनी महायुतीत सहभागी होण्यामागील त्यांची भूमिका स्पष्ट केली. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर देशाच्या विकासाला नवी दिशा मिळाली असून, देशाचा आणि महाराष्ट्राचा विकास वेगळा ठेवता येणार नाही, असे अजितदादांनी आपल्याला सांगितल्याचे शाह यांनी नमूद केले. आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांच्या हक्कांसाठी अजितदादा ठामपणे भूमिका मांडत असत. महायुतीत त्यांच्या सहभागामुळे सरकारला स्थिरता आणि सातत्य मिळाले, असेही त्यांनी सांगितले. (Amit Shah Praises Ajit Pawar)
 
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी केले. या कार्यक्रमात ‘कर्मयोगी दादा : संस्मरणीय क्षण’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले. तसेच पुणे जिल्हा परिषदेतील अजित पवार यांच्या योगदानावर आधारित चित्रफीत दाखवण्यात आली.
 
मी एक संघर्षाची सहचारिणी : सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री
 
“आजचा हा क्षण माझ्यासाठी अत्यंत भावनिक आहे. अजितदादांचे खरे कर्तृत्व त्यांच्या पदांमध्ये किंवा कामांच्या आकडेवारीत नसून, राज्यातील छोट्या गावांतील लोकांच्या मनात त्यांच्याविषयी असलेल्या प्रेमात आहे. महाराष्ट्रातल्या कुठल्याही छोट्या गावात जरी गेलं, तरी तिथल्या माणसांच्या चेहऱ्यावर दादांविषयीचा विचार... प्रेमाची भावना हेच दादांच्या खऱ्या कर्तृत्वाचं प्रमाणपत्र आहे. मी एक संघर्षाची सहचारिणी आहे. दुःखाला कवटाळून न बसता आदरणीय दादांच्या अपूर्ण स्वप्नांची जबाबदारी घेऊन मी आपल्यासमोर उभी आहे. त्यामुळे मी खचणार नाही आणि मागे तर बिलकुलच पाहणार नाही. शेतकरी हा अजितदादांच्या कामाचा केंद्रबिंदू होता. दुष्काळाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना आधार देणे, हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल. - सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री (Amit Shah Praises Ajit Pawar)





गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर