११ वर्षांपासून बंद नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कारखान्याला मिळणार नवसंजीवनी! अमित शाह यांच्या हस्ते पुनर्निर्माण प्रकल्पाचे भूमिपूजन; हजारो रोजगारांच्या संधी निर्माण होणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    15-Nov-2026
National Heavy Engineering Factory Revival
 
पुणे (National Heavy Engineering Factory Revival) : तब्बल ११ वर्षांपासून बंद असलेला नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को-ऑपरेटिव्ह लिमिटेडचा कारखाना आता पुन्हा उभारी घेणार आहे. या कारखान्याच्या पुनर्निर्माणासाठी केंद्र सरकारने १,५०० कोटी रुपयांची मदत उपलब्ध करून दिली असून, केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांच्या हस्ते या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. या प्रकल्पामुळे औद्योगिक उत्पादनाला चालना मिळण्यासह हजारो रोजगारांच्या संधी निर्माण होतील आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
 
याच कार्यक्रमात चालकांना मालक बनविण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ‘भारत टॅक्सी’ सहकारी सेवेचा पुण्यात शुभारंभ करण्यात आला. सहकार क्षेत्रात अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली मोठे परिवर्तन घडत असून, सहकाराच्या माध्यमातून रोजगार आणि आर्थिक स्वावलंबनाच्या नव्या संधी निर्माण होत असल्याचे शिंदे म्हणाले. (National Heavy Engineering Factory Revival)
 
सुमारे ११० एकर क्षेत्रावर उभारण्यात येणाऱ्या नॅशनल हेवी इंजिनिअरिंगच्या पुनर्निर्माण प्रकल्पात साखर उद्योग, डेअरी, इथेनॉल, बायोगॅस आणि जैवआधारित उद्योगांसाठी आवश्यक यंत्रसामग्री तयार केली जाणार आहे. या प्रकल्पाला राष्ट्रीय डेअरी विकास मंडळाचीही साथ मिळणार आहे. त्यामुळे स्वदेशी उत्पादनाला प्रोत्साहन मिळण्याबरोबरच कुशल मनुष्यबळाची निर्मिती आणि ग्रामीण भागातील औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. हा प्रकल्प केवळ एका बंद कारखान्याचे पुनरुज्जीवन नसून आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारत २०४७ च्या संकल्पनेला बळ देणारा ठरेल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
 
स्वतंत्र सहकार मंत्रालयाची स्थापना करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शाह यांच्याकडे या मंत्रालयाची जबाबदारी सोपवल्यानंतर सहकार क्षेत्राला नवी दिशा मिळाली आहे. सहकारातील मक्तेदारी आणि अनिष्ट प्रवृत्तींना आळा घालण्याबरोबरच शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत योजनांचा लाभ पोहोचविण्याचे काम सुरू आहे. साखर कारखान्यांचा १० हजार कोटी रुपयांच्या प्राप्तिकराचा प्रश्न मार्गी लावून उद्योगाला मोठा दिलासा देण्यात आला. या प्रक्रियेत दिवंगत अजित पवार यांच्या योगदानाचीही शिंदे यांनी आठवण काढली. (National Heavy Engineering Factory Revival)
 
कोल्हापूर दौऱ्यात अमित शाह यांनी दिलेला शब्द पाळत या प्रकल्पासाठी १,५०० कोटी रुपयांची मदत उपलब्ध करून दिली. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीबाबत पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी संवेदनशीलता दाखवली असून, राज्यातील उपाययोजनांची माहिती घेतली. गडचिरोलीतील नक्षलवाद निर्मूलनाच्या कामाचेही त्यांनी कौतुक केले, असे शिंदे यांनी सांगितले. (National Heavy Engineering Factory Revival)
 
‘भारत टॅक्सी’ उपक्रमाबाबत बोलताना शिंदे म्हणाले की, या सहकारी सेवेमुळे टॅक्सीचालकांना मध्यस्थ आणि कमिशनशिवाय थेट उत्पन्न मिळवता येणार आहे. चालकच या व्यवस्थेचे मालक असतील. तसेच ‘सारथी दीदी’सारख्या उपक्रमांमधून महिलांनाही टॅक्सी व्यवसायात संधी उपलब्ध होणार असून, महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना मिळेल.
 
केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मिळणाऱ्या निधीचा उल्लेख करताना, यूपीए सरकारच्या १२ वर्षांच्या काळात राज्याला सुमारे दोन लाख कोटी रुपये मिळाले, तर एनडीए सरकारच्या १२ वर्षांत सुमारे १५ लाख कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचा दावा शिंदे यांनी केला. महाराष्ट्र हे देशाचे आर्थिक ग्रोथ इंजिन असून उद्योग, स्टार्टअप आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रात राज्य आघाडीवर आहे. काही जणांना मोदी आणि अमित शाह यांच्या नावाचा फोबिया असल्याने विकासकामांवर टीका केली जाते; मात्र चांगल्या कामाचे स्वागत करण्याची वृत्ती असली पाहिजे, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. (National Heavy Engineering Factory Revival)
 
या कार्यक्रमाला केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह, केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माधुरी मिसाळ यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (National Heavy Engineering Factory Revival)
 
 




संबंधित मजकूर