ठाणे (Maharashtra Uniform Civil Code Public Hearing) : महाराष्ट्रात समान नागरी कायदा (यूसीसी) लागू करण्याच्या अनुषंगाने नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी कोकण विभागात २१ आणि २२ नोव्हेंबर रोजी जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखालील समिती या सुनावणीच्या माध्यमातून नागरिकांच्या सूचना आणि मते जाणून घेणार आहे. ठाणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी १२ ही वेळ निश्चित करण्यात आली आहे. नागरिकांनी या प्रक्रियेत सहभागी होऊन आपली मते मांडावीत, असे आवाहन विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी केले आहे.
विवाह, घटस्फोट, सहजीवन अर्थात लिव्ह-इन रिलेशनशिप, भरण-पोषण, पालकत्व, वारसाहक्क आणि उत्तराधिकारी हक्क अशा महत्त्वाच्या सामाजिक व कौटुंबिक विषयांवर या जनसुनावणीत मते जाणून घेतली जाणार आहेत. संबंधित गट, सामाजिक संस्था, संघटनांचे प्रतिनिधी तसेच सर्वसामान्य नागरिकांना आपली भूमिका मांडण्याची संधी मिळणार आहे. (Maharashtra Uniform Civil Code Public Hearing)
कोकण विभागातील ही जनसुनावणी नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथील कोकण भवनमधील विभागीय आयुक्त कार्यालयात होणार आहे. जिल्हानिहाय वेळापत्रकानुसार २१ नोव्हेंबर रोजी मुंबई शहर (सकाळी ११ ते १२), मुंबई उपनगर (दुपारी १२.३० ते १.३०), पालघर (दुपारी ३ ते ४) आणि सिंधुदुर्ग (दुपारी ४.३० ते ५.३०) या जिल्ह्यांची सुनावणी होईल. तर २२ नोव्हेंबर रोजी ठाणे (सकाळी ११ ते १२), रायगड (दुपारी १२.३० ते १.३०) आणि रत्नागिरी (दुपारी ३ ते ४) या जिल्ह्यांसाठी सुनावणी होणार आहे.(Maharashtra Uniform Civil Code Public Hearing)
नागरिकांना कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात किंवा संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून आपली मते मांडता येतील. निर्धारित वेळेच्या किमान एक तास आधी संबंधित कार्यालयात उपस्थित राहणे आवश्यक आहे. कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात उपस्थित राहणाऱ्या नागरिकांची समितीसमोर प्रत्यक्ष सुनावणी होईल, तर जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहणाऱ्या नागरिकांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे समितीसमोर मत मांडता येणार आहे.
प्रत्यक्ष सुनावणीला उपस्थित राहणे शक्य नसलेल्या नागरिकांसाठी ऑनलाइन पद्धतीने मते नोंदविण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या www.ucc.maharashtra.gov.in या समान नागरी कायद्याच्या पोर्टलवर ३७ मुद्द्यांबाबत आपली मते आणि सूचना नोंदविता येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन समान नागरी कायद्याबाबत आपली भूमिका मांडावी, असे आवाहन विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी केले आहे.
ठाणेकरांसाठी महत्त्वाचे: २२ नोव्हेंबर, सकाळी ११ ते दुपारी १२. प्रत्यक्ष सुनावणीसाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय किंवा कोकण भवन येथे उपस्थित राहता येईल. कार्यालयात निर्धारित वेळेच्या एक तास आधी पोहोचणे आवश्यक आहे. (Maharashtra Uniform Civil Code Public Hearing)