अंबरनाथ (Ambernath Knife Attack on Woman) : एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने तरुणीवर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना अंबरनाथमधील हाउसिंग बोर्ड परिसरात घडली. विशाखा गायकवाड असे जखमी तरुणीचे नाव असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हेमंत गुमाने असे हल्लेखोराचे नाव असून, हल्ल्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
शुक्रवारी सायंकाळी विशाखा कामावरून घरी परतत असताना तिच्या पूर्वपरिचित असलेल्या हेमंतने तिला रस्त्यात गाठले. त्यानंतर त्याने तिला ओढत जवळच्याच एका निर्जन मोकळ्या जागेत नेले. तेथे अचानक चाकूने तिच्यावर हल्ला चढवला. आरोपीने विशाखाच्या पोटावर आणि हातावर वार केले. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. हल्ल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. (Ambernath Knife Attack on Woman)
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. जखमी विशाखावर उपचार सुरू असून आरोपी हेमंत गुमाने याला पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. प्राथमिक माहितीनुसार, एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे. (Ambernath Knife Attack on Woman)