मुंबई (National Heavy Engineering Pune Revival Project) : महाराष्ट्र ही देशातील सहकार चळवळीची गंगोत्री असून, सहकार क्षेत्राच्या विकासात पुणे आणि महाराष्ट्राचे योगदान ऐतिहासिक आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य मोबदला मिळावा आणि शेतीच्या व्यापारातील नफा थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा, या उद्देशातून महाराष्ट्रात सहकार चळवळीची पायाभरणी झाली. याच सहकार परंपरेला आधुनिक तंत्रज्ञान आणि पारदर्शक कारभाराची जोड देण्याचे काम केंद्र सरकार करत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांनी केले.
पुण्यात नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को-ऑपरेटिव्ह लिमिटेडच्या पुनर्निर्माण प्रकल्पाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर, मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. (National Heavy Engineering Pune Revival Project)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७० वर्षांनंतर केंद्रात स्वतंत्र सहकार मंत्रालयाची स्थापना केली. त्यानंतर प्राथमिक कृषी पतसंस्था, जिल्हा सहकारी संस्था, दुग्धव्यवसाय आणि साखर कारखान्यांना बळ देण्याचे काम सुरू झाले. साखर कारखान्यांना प्राप्तिकरात सुमारे १५ हजार कोटी रुपयांची सवलत आणि दरवर्षी तीन हजार कोटी रुपयांचा दिलासा देण्याचा निर्णयही केंद्र सरकारने घेतला आहे, असे शाह यांनी सांगितले.
नॅशनल हेवी इंजिनिअरिंगचा पुनर्निर्माण प्रकल्प हा सहकार क्षेत्राच्या पुनरुज्जीवनाचे महत्त्वपूर्ण उदाहरण ठरेल. एकेकाळी ११ देशांना साखर कारखान्यांची यंत्रसामग्री निर्यात करणारी ही संस्था बंद पडली होती. तिची ११० एकर जमीन अतिक्रमणाच्या विळख्यात सापडत होती. मात्र, सहकार मंत्रालयाने पुढाकार घेऊन एनडीडीबी, अमूल, एनसीडीसी, नाफेड आणि अन्य सहकारी संस्थांच्या सहकार्याने संस्थेच्या पुनरुज्जीवनाची प्रक्रिया सुरू केली. प्रलंबित लेखापरीक्षण पूर्ण करून आर्थिक देणी पुनर्नियोजित करण्यात आली आहेत. डिसेंबर २०२७ पूर्वी या कारखान्यात उत्पादन सुरू होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (National Heavy Engineering Pune Revival Project)
या प्रकल्पात साखर कारखान्यांची यंत्रसामग्री, वीज निर्मिती संयंत्र, इथेनॉल, सीबीजी आणि दुग्धव्यवसायासाठी लागणारी उपकरणे तयार होतील. पुढील टप्प्यात रेल्वे, संरक्षण आणि निर्यात क्षेत्रासाठी कंटेनर निर्मितीही केली जाईल. या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला नवी दिशा मिळेल, असे शाह म्हणाले.
दरम्यान, पुण्यात केंद्रीय सहकारी संस्था निबंधकांच्या पश्चिम विभागीय कार्यालयाचे उद्घाटनही करण्यात आले. महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दमण आणि दादरा-नगर हवेलीतील बहुराज्य सहकारी संस्थांना आता नोंदणी, तपासणी आणि नियामक सेवांसाठी दिल्लीला जाण्याची आवश्यकता राहणार नाही. (National Heavy Engineering Pune Revival Project)
‘भारत टॅक्सी’च्या माध्यमातून चालकांना केवळ सेवा पुरवठादार न ठेवता मालक बनविण्याचा प्रयत्न आहे. कोणतेही कमिशन न घेता प्रवासाचे संपूर्ण पैसे थेट चालकांच्या खात्यात जमा होतील. मुंबईनंतर पुणे आणि नाशिकमध्येही ही सेवा सुरू होत असून, पुढील काळात नागपूर, कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये विस्तार केला जाणार असल्याचे शाह यांनी सांगितले.
दरम्यान, यावेळी पुण्यात ‘भारत टॅक्सी’ सेवेचाही शुभारंभ करण्यात आला. या सहकारी उपक्रमामुळे चालकांना मध्यस्थ आणि कमिशनशिवाय उत्पन्न मिळणार असून, ते केवळ सेवा पुरवठादार न राहता कंपनीचे मालक बनतील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या प्रकल्पाचे स्वागत करत हजारो रोजगार आणि ग्रामीण औद्योगिक विकासाच्या नव्या संधी निर्माण होतील, असे सांगितले. (National Heavy Engineering Pune Revival Project)
हा प्रकल्प केवळ कारखान्याचे पुनरुज्जीवन नसून आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारत २०४७ च्या संकल्पनेला बळ देणारा आहे. साखर, डेअरी, इथेनॉल, बायोगॅस आणि जैवआधारित उद्योगांसाठी लागणारी यंत्रसामग्री येथे तयार होणार असून, राष्ट्रीय डेअरी विकास मंडळाचीही साथ लाभणार आहे. सुमारे ११० एकर क्षेत्रातील या प्रकल्पामुळे स्वदेशी उत्पादन, कुशल मनुष्यबळ आणि ग्रामीण उद्योगांना चालना मिळेल. - एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
भारत टॅक्सी’च्या माध्यमातून सुमारे २५ हजार सारथींना जोडण्याचे उद्दिष्ट आहे. मुंबई आणि पुण्यात प्रवाशांना ही सेवा उपलब्ध होत आहे. या उपक्रमातील ‘सारथी दीदी’ ही संकल्पना विशेष महत्त्वाची आहे. महिला चालकांनाही टॅक्सी व्यवसायात संधी उपलब्ध करून देत त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न यातून होणार आहे. केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली देशातील सहकार क्षेत्राला नवी दिशा मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचे सहकार्य आणि महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राशी संबंधित सर्व घटकांचे योगदान यामुळे राज्याची सहकार चळवळ निश्चितच नव्या उंचीवर पोहोचेल. - सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री (National Heavy Engineering Pune Revival Project)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.