नक्षलवादाच्या सावलीतून ग्लोबल करिअरची झेप; गडचिरोलीच्या तरुणांना जगाची दारे खुली!

 Gadchiroli Global Skills Training Centre
 
मुंबई (Gadchiroli Global Skills Training Centre) : लॉयड्स मेटल्सने सुरू केलेले प्रगत कौशल्य प्रशिक्षण केंद्र हे या परिवर्तनाचे उत्तम उदाहरण आहे. या केंद्रात ४० विविध व्यवसायांमध्ये प्रशिक्षण दिले जात असून, येथील युवकांना जागतिक स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. आतापर्यंत चार हजार जणांना प्रशिक्षणानंतर रोजगार मिळाला असून, आणखी पाच हजार जणांचे प्रशिक्षण सुरू आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
 
लॉयड्स अँड मेटल्स एनर्जी लिमिटेडच्या वतीने बोदली येथे उभारण्यात आलेल्या ‘लॉयड्स मिशन फॉर ग्लोबल स्किल्स अँड एंटरप्रेन्योरशिप’ कौशल्य प्रशिक्षण केंद्राच्या लोकार्पणप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी या संस्थेच्या पुढील विस्तारासाठी ‘ग्लोबल स्किल्स अँड एंटरप्रेन्योरशिप’ संस्थेचे भूमिपूजनही करण्यात आले. केंद्रीय आदिवासी कार्यमंत्री जुएल ओराम प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. (Gadchiroli Global Skills Training Centre)
 
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, हे अत्यंत सुंदर आणि प्रेरणादायी काम आहे. लॉयड्स मेटल्सने सुरू केलेले प्रशिक्षण केंद्र अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असून, येथे ४० प्रकारच्या ट्रेड्समध्ये प्रशिक्षण दिले जाते. केवळ स्थानिक पातळीवर रोजगार मिळविण्यापुरते नव्हे, तर जागतिक स्तरावर काम करण्याची क्षमता येथील युवकांमध्ये विकसित केली जात आहे. विशेष म्हणजे, या प्रशिक्षणामध्ये ५५ टक्के मुली सहभागी होत आहेत. उद्योग क्षेत्रातील अत्याधुनिक तांत्रिक कौशल्य आत्मसात करून त्या रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करत आहेत.
 
गडचिरोलीतील महिला सक्षमीकरणाचे उदाहरण देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, जगातील सर्वांत मोठ्या साडेतीनशे टन क्षमतेच्या डंपरचे संचालन करणारी महिला गडचिरोलीतील आहे. भारतात अन्यत्र उपलब्ध नसलेले हे अत्याधुनिक यंत्र चालविण्याची जबाबदारी एका स्थानिक भगिनीने समर्थपणे स्वीकारली आहे. गडचिरोलीतील महिलांच्या कौशल्याची आणि आत्मविश्वासाची ही मोठी साक्ष आहे. (Gadchiroli Global Skills Training Centre)
 
एकेकाळी नक्षलवादी कारवायांमध्ये सहभागी असलेले युवक आज प्रशिक्षण घेऊन उद्योगांमध्ये कर्मचारी म्हणून काम करत आहेत. पाच वर्षांपूर्वी ज्या भागात येण्यास लोक घाबरत होते, त्याच भागातील तरुणी आज परदेशात जाऊन तेथील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याच्या टप्प्यावर पोहोचल्या आहेत. हा बदल गडचिरोलीच्या नव्या भविष्याची दिशा दाखवणारा आहे, असेही त्यांनी नमूद केले. औद्योगिकीकरणासोबत पर्यावरण संवर्धनालाही प्राधान्य दिले जाणार आहे. गडचिरोलीत पाच कोटी वृक्ष लावण्याचा संकल्प करण्यात आला असून, त्यापैकी एक कोटी वृक्षांची लागवड पूर्ण झाली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
 
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते अडीच हजार नियुक्तिपत्रांचे प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात आले. ॲडव्हान्स मिनरल प्रोसेसिंग कार्यशाळा, लॉयड्स सेंट्रल किचन आणि तक्रार निवारण पोर्टलचे उद्घाटनही करण्यात आले. केंद्रीय मंत्री जुएल ओराम यांनी मनोगत व्यक्त केले. लॉयड्सचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला खासदार नामदेव किरसान, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. (Gadchiroli Global Skills Training Centre)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर