मुंबई (Navi Mumbai Sindhudurg Flight): सिंधुदुर्गच्या निसर्गसौंदर्याला आता थेट मुंबईची जोड मिळणार असून, जिल्ह्याच्या पर्यटन आणि आर्थिक विकासाला नवी गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली चिपी विमानतळाची मुंबईशी थेट हवाई जोडणी १६ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. फ्लाय ९१ कंपनीची सिंधुदुर्ग-नवी मुंबई-सिंधुदुर्ग ही विमानसेवा आठवड्याचे सातही दिवस सुरू राहणार आहे. त्यामुळे केवळ प्रवासाचे अंतर कमी होणार नाही, तर पर्यटन, उद्योग, हॉटेल व्यवसाय आणि स्थानिक रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होतील अशी आशा राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केली.
याविषयी माहिती देताना मंत्री नितेश राणे म्हणाले,"१९९९ मध्ये तत्कालीन मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्गला पर्यटन जिल्हा घोषित करण्याचा दूरदृष्टीचा निर्णय घेतला. कृषी आणि मासेमारीबरोबर पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढविण्याचा त्यामागील उद्देश होता. याच संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी चिपी येथे विमानतळ उभारण्यात आले आणि मुंबई-चिपी विमानसेवाही सुरू झाली. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे ही सेवा बंद पडली होती. (Navi Mumbai Sindhudurg Flight)
पुढे ते म्हणाले,"आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने या विमानतळाला पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. पालकमंत्री म्हणून मी देखील विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत समन्वय साधून रस्ते, वीज आणि रात्रीच्या विमान उतरविण्याच्या सुविधांसह विविध तांत्रिक अडचणी दूर केल्या. विमानसेवा आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आवश्यक असलेल्या व्यवहार्यता तूट निधी (व्हीजीएफ) योजनेलाही राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली". (Navi Mumbai Sindhudurg Flight)
दरम्यान, सिंधुदुर्गात ताज हॉटेलसारखे मोठे पर्यटन प्रकल्प आकार घेत असून, वेळागर आणि देवगडमध्ये पर्यटन गुंतवणुकीला चालना मिळत आहे. अशा परिस्थितीत नवी मुंबईशी थेट हवाई संपर्क जिल्ह्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. चिपी-हैदराबाद आणि चिपी-पुणे हवाई सेवांनाही यामुळे पूरक बळ मिळेल, असेही राणेंनी सांगितले. (Navi Mumbai Sindhudurg Flight)
‘१६ नोव्हेंबरला केवळ विमानाचे टेकऑफ होणार नाही, तर सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासाचेही खऱ्या अर्थाने टेकऑफ होईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणांनी या संधीचा लाभ घेऊन रोजगार आणि उद्योजकतेसाठी सज्ज व्हावे,’ असे आवाहनही पालकमंत्री नितेश राणे यांनी केले आहे. (Navi Mumbai Sindhudurg Flight)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.