मुंबई, (Tata Power Battery Energy Storage System Mumbai): मुंबईतील वाढती विजेची मागणी आणि अखंडित वीजपुरवठ्याचे आव्हान लक्षात घेता टाटा पॉवरने शहरातील वीज वितरण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कंपनीने महालक्ष्मी, साकीनाका आणि मानखुर्द या तीन मोक्याच्या ठिकाणी एकूण ६० मेगावॅट-तास (एमडब्ल्यूएच) क्षमतेची बॅटरी ऊर्जा साठवणूक यंत्रणा कार्यान्वित केली आहे. या यंत्रणेमुळे आठ लाखांहून अधिक ग्राहकांना वीजपुरवठा करणाऱ्या वितरण जाळ्याची कार्यक्षमता आणि विश्वासार्हता वाढण्यास मदत होणार आहे.
या प्रकल्पाच्या माध्यमातून मुंबईसाठी प्रस्तावित २०० मेगावॅट-तास क्षमतेच्या मोठ्या ऊर्जा साठवणूक उपक्रमाच्या दिशेने कंपनीने महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे. सौरऊर्जेची निर्मिती अधिक असताना आणि विजेची मागणी तुलनेने कमी असताना या बॅटरीमध्ये वीज साठवली जाईल. संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत विजेची मागणी वाढल्यावर ही साठवलेली वीज वितरण जाळ्यात सोडली जाईल. त्यामुळे महागड्या वीजखरेदीवरील अवलंबित्व कमी होऊन वीजपुरवठ्याचा खर्च नियंत्रित करण्यास मदत होणार आहे.(Tata Power Battery Energy Storage System Mumbai)
या यंत्रणांमध्ये वेगाने प्रतिसाद देण्याची क्षमता असल्याने विजेच्या मागणीतील अचानक होणाऱ्या बदलांनुसार पुरवठ्याचे व्यवस्थापन करणे शक्य होणार आहे. दररोज साधारण एक ते दीड वेळा बॅटरी चार्ज आणि डिस्चार्ज करण्याचे नियोजन आहे. याशिवाय वीज यंत्रणेत बिघाड झाल्यास वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी आवश्यक असलेली स्वतंत्रपणे कार्यान्वित होण्याची म्हणजेच ‘ब्लॅक स्टार्ट’ सुविधाही या यंत्रणांमध्ये आहे.
दरम्यान, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने एप्रिल २०२५ मध्ये मुंबईतील १० मोक्याच्या ठिकाणी २०० मेगावॅट-तास क्षमतेची बॅटरी ऊर्जा साठवणूक यंत्रणा उभारण्यास मंजुरी दिली होती. या व्यापक प्रकल्पाचा उद्देश वीज वितरण जाळ्याची स्थिरता वाढविणे, कमाल मागणीच्या काळात पुरवठा व्यवस्थापित करणे आणि रुग्णालये, मेट्रो सेवा, विमानतळ तसेच माहिती केंद्रांसारख्या महत्त्वाच्या सुविधांना अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करणे हा आहे.(Tata Power Battery Energy Storage System Mumbai)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.