मुंबई (MPCB Innovation Contest 2026) : महाराष्ट्र शासनाच्या ‘सुधारणा उत्सव २०२६’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे (MPCB) ‘नाविन्यपूर्ण सूचना स्पर्धा २०२६’ आयोजित करण्यात येत आहे. प्रथम क्रमांकासाठी १ लाख रुपयांचे पारितोषिक आणि एकूण ३२ पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.
‘कल्पना तुमची, गतिमान कारभाराची हमी आमची!’ या संकल्पनेवर आधारित या स्पर्धेचा मुख्य उद्देश मंडळाच्या प्रशासकीय कामकाजात अधिक सुलभता, पारदर्शकता, गतिमानता आणि कार्यक्षमता आणण्यासाठी औद्योगिक आस्थापना, पर्यावरण तज्ञ, पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्था,नागरिक व इतर क्षेत्रातील तज्ज्ञांच्या नाविन्यपूर्ण कल्पना जाणून घेणे हा आहे. (MPCB Innovation Contest 2026)
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ‘Ease of Doing Business’ अंतर्गत उद्योगांसाठी अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा यापूर्वीच कार्यान्वित केल्या आहेत. यामध्ये हरित व पांढऱ्या श्रेणीतील उद्योगांसाठी स्वयं-प्रमाणपत्राची सुविधा, ऑनलाईन अर्जप्रणाली, १०० टक्के डिजिटल सेवांमुळे कार्यालयीन फेऱ्यांची आवश्यकता कमी करणे, संमतीपत्रे व परवानग्या देण्याच्या प्रक्रियेतील कालावधी लक्षणीयरीत्या कमी करणे तसेच पांढऱ्या श्रेणीतील अधिक उद्योगांना परवानगीच्या बंधनातून सवलत देणे अशा विविध सुधारणांचा समावेश आहे. (MPCB Innovation Contest 2026)
या सुधारणांमुळे औद्योगिक आस्थापनांना व्यवसाय सुलभतेच्या दृष्टीने मोठा लाभ झाला आहे. तथापि, मंडळाचे कामकाज अधिक लोकाभिमुख, तंत्रज्ञानाधारित, पारदर्शक व परिणामकारक करण्यासाठी आणखी कोणत्या सुधारणा करता येतील, याबाबत व्यापक स्तरावर नाविन्यपूर्ण सूचना मागविण्यात येत आहेत. (MPCB Innovation Contest 2026)
या स्पर्धेत खालील चार गटांमधून सूचना मागविण्यात येत आहेत :
१. औद्योगिक आस्थापना
२. पर्यावरण तज्ज्ञ
३. पर्यावरण क्षेत्रात कार्यरत सामाजिक संस्था
४. नागरिक व इतर
प्राप्त होणाऱ्या सूचना या वैयक्तिक तक्रारी अथवा वैयक्तिक प्रश्नांशी संबंधित नसून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यपद्धतीत सुधारणा घडवून आणणाऱ्या, धोरणात्मक स्वरूपाच्या आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीयोग्य असणे अपेक्षित आहे. (MPCB Innovation Contest 2026)
प्रत्येक गटासाठी स्वतंत्र पारितोषिके पुढीलप्रमाणे असतील :
प्रथम पारितोषिक – रु. १,००,०००/-
द्वितीय पारितोषिक – रु. ५०,०००/-
तृतीय पारितोषिक – रु. २५,०००/-
पाच उत्तेजनार्थ पारितोषिके – प्रत्येकी रु. १०,०००/-
अशा प्रकारे प्रत्येक गटासाठी ८ आणि चारही गट मिळून एकूण ३२ पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.
इच्छुकांनी आपल्या नाविन्यपूर्ण व व्यवहार्य सूचना २० नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत खालील ई-मेलवर पाठवाव्यात.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कामकाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी उद्योजक, पर्यावरण तज्ज्ञ, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात येत आहे.
चला, आपल्या कल्पनांना कृतीची जोड देऊया आणि महाराष्ट्राच्या शाश्वत विकासाला गती देऊया! (MPCB Innovation Contest 2026)