मुंबई (Gondia Students Meet Governor) : गोंदिया जिल्ह्यातील कुडवा येथे पालावरच्या शाळेत शिकणाऱ्या भटक्या विमुक्त जमातीतील उपेक्षित, वंचित मांग गारुडी समाजाच्या ३० मुलामुलींनी आज राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन, मुंबई येथे भेट घेतली व राज्यपालांशी मनमोकळ्या गप्पा केल्या.
रोजगारासाठी पालकांच्या होणाऱ्या स्थलांतरामुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी विदर्भात अनेक ठिकाणी पालावरची शाळा चालविणाऱ्या भटके विमुक्त विकास परिषद, महाराष्ट्र व भटके विमुक्त कल्याणकारी परिषद, विदर्भ प्रांत यांच्या वतीने या भेटीचे आयोजन करण्यात आले होते. (Gondia Students Meet Governor)
"मुंबईत आपण नेहरू विज्ञान केंद्र, सिद्धिविनायक मंदिर, विधान भवन पाहिले परंतु आज येथून पाहिलेला समुद्रच सर्वांना खूप आवडला," अशी माहिती यावेळी मुलांनी राज्यपालांना दिली.
भटके विमुक्त विकास परिषद ही संस्था भटक्या विमुक्त जमातीतील मुलामुलींच्या शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना जीवनदान देण्याचे राष्ट्रकार्य करीत आहे असे गौरवोद्गार राज्यपालांनी यावेळी काढले.
मांग गारुडी समाजातील ३० विद्यार्थ्यांनी भगवद्गीतेतील पंधरावा अध्याय पाठ म्हणून दाखवला. पाठांतर व उच्चाराबाबत मुलांना कौतुकाची थाप दिली.
भटके विमुक्त जमातीतील मुलामुलींना परिषदेने शिक्षण व संस्कारांसोबत रोजगारोन्मुख प्रशिक्षण द्यावे अशी सूचना राज्यपालांनी दिली. (Gondia Students Meet Governor)
सर्वांनी शिक्षण घ्यावे, अभ्यास करावा व उत्तम भविष्य बनवावे असा सल्ला मुलांना दिला. आणि पुढील सुट्ट्यांमध्ये आपण मुलामुलींना पुणे दर्शन घडविण्यासाठी सूचना करू, असे राज्यपालांनी सांगितले.
भटके विमुक्त जमातीतील पालकांचे रोजगारासाठी गोंदिया येथून छत्तीसगड, ओडिसा, हरियाणा, पंजाब व काश्मीर पर्यंत स्थलांतर होत असल्यामुळे त्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहतात व बरेचदा व्यसनांच्या आहारी जातात. अश्या मुलांसाठी पालावरची शाळा हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे, अशी माहिती संस्थेचे शिक्षा आयाम प्रमुख प्रशांत सुरेश बोरसे यांनी राज्यपालांना दिली. (Gondia Students Meet Governor)
सर्व मुलामुलींना अभ्यास व शिस्तीसोबतच खर्रा न खाण्याची, जुगारासाठी पत्ते न खेळण्याची तसेच चांगले नागरिक होण्याची शपथ दिली जाते तसेच त्यांना भगवदगीतेतील अध्याय शिकवले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
मुलामुलींना दररोज खेळ खेळण्यासाठी तसेच आरोग्याची काळजी घेण्यास सांगितले जाते असे प्रशांत बोरसे व उर्मिला बोरसे यांनी सांगितले. (Gondia Students Meet Governor)