मुंबई (Birsa Munda Gaurav Din Week 2026): भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने दि. ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान राज्यभर ‘भगवान बिरसा मुंडा गौरव दिन सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहात आदिवासी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या सप्ताहात दि. १३ नोव्हेंबरला न्यूक्लियस बजेट योजनेंतर्गत लाभार्थ्यांना धनादेश वितरण आणि महिला बचत गटांना लाभ देण्यात येणार आहे. दि. १४ नोव्हेंबरला आदिवासी स्मारकांची स्वच्छता व दीपोत्सव, तर दि. १५ नोव्हेंबरला भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन करण्यात येईल. याच दिवशी गडचिरोली येथे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय कार्यक्रम होणार आहे. दि. १६ आणि दि. १७ नोव्हेंबरला शासकीय कागदपत्रांसाठी सेवा शिबिरे तसेच आरोग्य व पोषणविषयक जनजागृती केली जाईल. दि. १८ नोव्हेंबरला आदिवासी सक्षमीकरण दिन साजरा करण्यात येणार आहे. (Birsa Munda Gaurav Din Week 2026)
आदिवासी आश्रमशाळांमध्ये तीन हजारांहून अधिक शिक्षकांची कंत्राटी नियुक्ती, विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी परिचारकांची नेमणूक, वीर रघोजी भांगरे शिष्यवृत्ती आणि स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. आदिवासी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण योजनाही सुरू करण्यात आली आहे. विशेष मागास जमातींच्या विकासासाठी स्वतंत्र पॅकेज देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे शेलार यांनी सांगितले. (Birsa Munda Gaurav Din Week 2026)
दरम्यान, मुंबई उपनगर जिल्ह्यात पाच लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, आतापर्यंत २ लाख १२ हजार ३९० वृक्ष लावण्यात आले आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, आरे आणि अन्य शासकीय जागांवर वृक्षलागवड करण्यात आली आहे. मियावाकी पद्धत, भौगोलिक नकाशांकन आणि आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वृक्षसंवर्धनावर भर दिला जाणार आहे. केवळ वृक्षलागवड नव्हे, तर लावलेली झाडे जगविणे हेही महत्त्वाचे उद्दिष्ट असल्याचे शेलार यांनी स्पष्ट केले. (Birsa Munda Gaurav Din Week 2026)