फटाके फोडण्यासाठी गेला अन् १०० फूट खोल दरीत कोसळला!

पनवेल अग्निशमन दलाचे मध्यरात्री थरारक बचावकार्य; १६ वर्षीय शिवांश दामलेला दोरखंडाच्या साहाय्याने दिले जीवदान

    12-Nov-2026
 
 
Panvel Fire Brigade Rescue
 
पनवेल (Panvel Fire Brigade Rescue): दिवाळीत फटाके फोडण्यासाठी गेलेल्या १६ वर्षीय मुलावर काळाने घाला घातला असता; मात्र पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रसंगावधान राखत त्याला मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर काढले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गावरील कर्नाळा स्पोर्ट्सजवळील बांधकामाधीन उड्डाणपुलावरून शिवांश दामले हा सुमारे १०० फूट खोल खाली कोसळला. मंगळवार, दि. १० नोव्हेंबरच्या रात्री १०.२५ वाजता घडलेल्या या घटनेनंतर अग्निशमन दलाने अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत बचावकार्य राबवून त्याची सुटका केली.
 
शिवांश हा जुने पनवेल येथील लाईन आळी परिसरातील रहिवासी असून, उड्डाणपुलावर फटाके फोडण्यासाठी गेला असताना ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे. अग्निशमन दलाचे जवान सागर जाधव यांनी घटनेची माहिती पनवेल अग्निशमन केंद्राला दिली. त्यानंतर दोन अग्निशमन वाहने तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आली. (Panvel Fire Brigade Rescue)
 
घटनास्थळी पोहोचल्यानंतर शिवांश खोल आणि दुर्गम भागात पडल्याचे जवानांच्या लक्षात आले. त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी दोन जवानांना तब्बल दीड किलोमीटर पायपीट करावी लागली. त्यानंतर तीन दोरखंड, बॉडी हार्नेस, हेल्मेट आणि तीन टॉर्चच्या साहाय्याने बचावकार्य सुरू करण्यात आले. दोरखंड आणि हार्नेसच्या साहाय्याने शिवांशला सुरक्षित बांधून अत्यंत काळजीपूर्वक वर काढण्यात आले. त्यानंतर रुग्णवाहिकेतून त्याला पुढील उपचारांसाठी रुग्णालयात हलविण्यात आले. (Panvel Fire Brigade Rescue)
 
या धाडसी बचावकार्यात उपअग्निशमन केंद्र अधिकारी शुभम राठोड, प्रमुख अग्निशामक शिवा आढे, वाहनचालक आकाश नलवडे, शिवलाल अलदार तसेच शुंभागी घुले, शंकर वाकडे, विक्रांत सपकाळ, सुनील मोरे, प्रीतम पाटील, निकितेश दुकरे आणि प्रणय म्हस्के या जवानांनी सहभाग घेतला. प्रतिकूल परिस्थितीत जीवाची बाजी लावत केलेल्या या बचावकार्यामुळे अग्निशमन दलाच्या तत्परतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले. (Panvel Fire Brigade Rescue)
 
अग्निशमन दलाकडून नागरिकांना आवाहन
 
पनवेल महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी प्रवीण बोडखे यांनी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. कर्नाळा स्पोर्ट्सजवळील नव्या उड्डाणपुलावर अद्याप काही ठिकाणी बांधकाम सुरू असून, त्यामुळे अपघाताचा धोका आहे. नागरिकांनी या परिसरात गर्दी करू नये तसेच उड्डाणपुलावर फटाके फोडण्यास जाऊ नये, असे आवाहन बोडखे यांनी केले आहे. (Panvel Fire Brigade Rescue)
 
 
 




संबंधित मजकूर