मुंबई (Naigaon Local Train Assault Case) : नायगाव रेल्वे स्थानकात लोकल प्रवासादरम्यान छेडछाडीला विरोध करणाऱ्या २० वर्षीय तरुणीला आरोपीने लोकलमधून थेट रेल्वे रुळांवर ढकलण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत तरुणीचा डावा हात कोपरापासून कापला गेला असून, तिला कायमचे अपंगत्व आले आहे. दि. ४ नोव्हेंबर रोजी भाईंदर ते नायगावदरम्यान प्रवास करताना हा प्रकार घडला. या घटनेने लोकलमधील महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोकल प्रवासादरम्यान आरोपीने तरुणीशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. या प्रकाराला तरुणीने विरोध केला आणि आरोपीला चप्पल मारली. याचा राग मनात धरून आरोपीने तिला लोकलच्या दोन डब्यांमधील जागेतून जोरदार धक्का दिला. त्यामुळे तरुणी थेट रेल्वे रुळांवर पडली. त्याचवेळी लोकल सुरू झाल्याने तिचा डावा हात रेल्वेच्या चाकाखाली आला. या अपघातात तिचा हात कोपरापासून कापला गेला. घटनेनंतर आरोपीने गर्दीचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला होता. मात्र, पोलिसांनी तपास करून त्याला अटक केली आहे. (Naigaon Local Train Assault Case)
दरम्यान, या प्रकरणी मनसेचे विधानसभा प्रमुख सचिन पोकळे यांनी पीडित तरुणीच्या कुटुंबीयांसह रेल्वे पोलिसांची भेट घेतली. आरोपीविरोधात केवळ औपचारिक कारवाई न करता, गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन कठोर कायदेशीर कलमे लावण्यात यावीत, अशी मागणी त्यांनी केली. पोलिसांनी सुरुवातीला दाखल केलेल्या कलमांमध्ये वाढ करून भारतीय दंड संहितेचे कलम ३०७ आणि नव्या भारतीय न्याय संहितेतील कलम १०९ लागू करण्याचे आश्वासन दिल्याचे पोकळे यांनी सांगितले. (Naigaon Local Train Assault Case)
एका तरुणीने छेडछाडीला विरोध केल्याची शिक्षा तिला आयुष्यभराच्या शारीरिक वेदनांच्या रूपाने भोगावी लागत आहे. लोकलमधील गर्दी, महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी असलेल्या यंत्रणा आणि अशा घटनांमध्ये तातडीने मिळणारी मदत याबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत. आरोपीला अटक झाली असली, तरी पीडितेला न्याय मिळण्यासोबतच भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा नेमक्या कोणत्या उपाययोजना करणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. (Naigaon Local Train Assault Case)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.