मुंबई (Mohan Bhagwat Traditional Knowledge Development Model) : उपाययोजनांसाठी जगाचे लक्ष दिवसेंदिवस भारताकडे लागले आहे. भारत आपल्या पारंपरिक ज्ञानाचा आणि अनुभवाचा आधार घेऊन जगासमोर विकासाचे नवे मॉडेल मांडू शकतो. असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. याप्रसंगी त्यांनी मानवी जीवन, प्राण्यांचे आरोग्य आणि पर्यावरण यांच्यात सुसंवाद असण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे दत्ता मेघे फाउंडेशनच्या पशुवैद्यकीय आणि कृषी महाविद्यालयाच्या उद्घाटनानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित होते. (Mohan Bhagwat Traditional Knowledge Development Model)
जैवविविधता, पर्यावरणशास्त्र, पशूंचे आरोग्य आणि पर्यावरण संवर्धन या बाबी मानवी कल्याणासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, असे डॉ. भागवत यांनी सांगितले. केवळ स्वतःच्या हिताचा विचार न करता सर्वांच्या कल्याणाची काळजी घेणारी जीवनशैली स्वीकारण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, “आपली जीवनदृष्टी केवळ माझ्या जीवनापुरती मर्यादित नसावी, तर ती सर्वांच्या जीवनाचा विचार करणारी असावी.” (Mohan Bhagwat Traditional Knowledge Development Model)
मानव, प्राणी आणि पर्यावरण यांच्या कल्याणासाठी लोकांनी आत्मसंयम बाळगून विकासाबाबत संतुलित दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज असल्याचे सरसंघचालकांनी सांगितले. यश किंवा प्रसिद्धी मिळाल्यानंतर माणसाने अहंकारी होऊ नये आणि समाजातील मागे राहिलेल्या घटकांचे स्मरण ठेवावे, असेही त्यांनी नमूद केले.
आधुनिक जगाने पूर्वी मानवाला निसर्गाचा मालक मानले होते आणि नैसर्गिक संसाधनांचा कोणत्याही परिणामांची चिंता न करता वापर करता येईल, असा समज होता. मात्र, आता सर्व सजीव एकमेकांवर अवलंबून असल्याची जाणीव जगाला होत आहे, असे त्यांनी सांगितले. (Mohan Bhagwat Traditional Knowledge Development Model)
मानवी आरोग्य, प्राण्यांचे आरोग्य आणि पर्यावरणाचे आरोग्य यांचा परस्परसंबंध अधोरेखित करणारी ‘वन हेल्थ’ (एक आरोग्य) ही संकल्पना आधुनिक जगाला गेल्या २० ते ३० वर्षांत परिचित झाली. मात्र, भारतात पारंपरिक पद्धतीने अशा एकात्मिक दृष्टिकोनाचा अवलंब केला जात होता, असे ते म्हणाले. “पर्यावरण निरोगी नसेल, तर आपणही निरोगी राहू शकत नाही,” असे सांगून प्राण्यांना होणारे आजार मानवांमध्येही पसरू शकतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले. (Mohan Bhagwat Traditional Knowledge Development Model)
स्वावलंबनाच्या महत्त्वावर भर देताना सरसंघचालक म्हणाले की, इतरांवर अवलंबून राहिल्यास राष्ट्रांवर दबाव आणला जाऊ शकतो आणि त्यांचे शोषण होण्याची शक्यता असते. त्यामुळे स्वावलंबन अत्यंत महत्त्वाचे आहे. भारताचा विकास हा जगाच्या विकासालाही हातभार लावणारा असावा, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक राष्ट्राने स्वतःच्या प्रगतीसोबतच इतरांच्या कल्याणासाठीही प्रयत्न केले पाहिजेत, असे ते म्हणाले. (Mohan Bhagwat Traditional Knowledge Development Model)
देशी गोवंशाच्या जातींचा उल्लेख करताना सरसंघचालक म्हणाले की, दूध उत्पादन वाढविण्यासाठी परदेशी गोवंशाच्या जाती आयात करताना भारताने आपल्या देशी गोवंशाकडे दुर्लक्ष केले. भारतातून परदेशात नेण्यात आलेल्या गोवंशाने तेथील विविध जातींच्या विकासात योगदान दिले; मात्र भारताने स्वतःच्या संसाधनांचा आणि ज्ञानाचा पुरेसा उपयोग केला नाही.
दत्ता मेघे फाउंडेशनचा हा नवीन उपक्रम भारताच्या विकासाचे यशस्वी उदाहरण ठरावा आणि शांततापूर्ण व समृद्ध जगाच्या निर्मितीत त्याचे योगदान असावे, अशी अपेक्षा भागवत यांनी व्यक्त केली. (Mohan Bhagwat Traditional Knowledge Development Model)
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हवामान बदलाचा शेतीवर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे सांगितले. शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी आणि शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी संशोधन, नवकल्पना आणि कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विदर्भात दररोज एक कोटी लिटर दुधाचे उत्पादन होत असल्याची माहिती दिली. याउलट कोल्हापूरमध्ये दररोज आठ कोटी लिटर दूध उत्पादित होते, असे त्यांनी सांगितले. नागपूर येथील मदर डेअरी प्रकल्पाचा विस्तार केल्यामुळे विदर्भातील दुग्धव्यवसायाला बळकटी मिळेल, असे गडकरी म्हणाले. कृषी आणि पशुवैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना केल्यामुळे विदर्भाच्या कृषी विकासाला चालना देण्याचे उद्दिष्ट पूर्ण होण्यास मदत होईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. (Mohan Bhagwat Traditional Knowledge Development Model)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक