म्हाडा, एसआरएच्या सेवांमध्ये मोठे बदल; प्रक्रिया होणार सुलभ!

म्हाडाच्या २५ सेवांचे १३ सेवांमध्ये एकत्रीकरण; एसआरएच्या तीन सेवांचे सुलभीकरण

 
 
MHADA SRA Services Simplified
 
मुंबई (MHADA SRA Services Simplified): म्हाडा आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) सेवांमध्ये राज्य सरकारने महत्त्वपूर्ण सुधारणा जाहीर केल्या आहेत. प्रशासकीय प्रक्रिया पुनर्रचना (GPR) अंतर्गत म्हाडाच्या सध्या उपलब्ध २५ सेवांचे एकत्रीकरण करून १३ सेवा अधिसूचित करण्यात आल्या आहेत. तर एसआरएच्या विविध सेवांचे पुनरावलोकन करून तीन प्रमुख सेवांना मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय गृहनिर्माण विभागाने जारी केला आहे.
 
म्हाडाच्या सेवांमध्ये मालमत्ता हस्तांतरण, हस्तांतरणाचे नियमितीकरण, सदनिका व भूखंड विक्री परवानगी, ना-देय प्रमाणपत्र, कागदपत्रांच्या प्रमाणित प्रती, गहाणखत व भाड्याने देण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र, संस्था स्थापनेसाठी परवानगी आदी सेवांचा समावेश आहे. निवासी आणि अनिवासी मालमत्तेच्या हस्तांतरणासाठी स्वतंत्र असलेल्या सेवांचे एकत्रीकरण करण्यात आले आहे. (MHADA SRA Services Simplified)
 
नागरिकांना आता अर्जासाठी कार्यालयात पूर्वभेट देण्याची आवश्यकता राहणार नाही. अर्ज पूर्णपणे ऑनलाइन सादर करता येतील. सदनिका, भूखंड आणि व्यावसायिक मालमत्तांच्या विक्री परवानगीसाठी दोन दिवसांची कालमर्यादा निश्चित केली असून अर्ज शुल्क ५९ रुपये आहे. कायदेशीर वारसाच्या बाबतीत मालमत्ता हस्तांतरणासाठी २१ दिवसांची मुदत निश्चित करण्यात आली आहे. (MHADA SRA Services Simplified)
 
एसआरएच्या तीन सेवांचे सुलभीकरण
 
एसआरएअंतर्गत पात्र झोपडीधारकाचा मृत्यू झाल्यानंतर कायदेशीर वारसांची नोंदणी, पुनर्वसन सदनिकेच्या विक्रीसाठी परवानगी आणि झोपडीधारकांची पात्रता निश्चित करणे या तीन सेवा अधिसूचित करण्यात आल्या आहेत. वारस नोंदणीसाठी ३० दिवसांची कालमर्यादा निश्चित केली आहे. अर्ज ऑनलाइन स्वीकारले जाणार असले तरी प्रत्यक्ष स्थळपडताळणी आवश्यक राहणार आहे. (MHADA SRA Services Simplified)
 
दरम्यान, म्हाडाच्या अर्जांसाठी अर्जदार व सह-अर्जदाराकडे महा-आयडी अनिवार्य करण्याची कार्यवाही सुरू आहे. प्रमाणपत्रांवर ई-स्वाक्षरी व क्यूआर कोडची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. एसआरएच्या लाभार्थ्यांचा डेटा महा-आयडीशी जोडण्यासह जन्म-मृत्यू नोंदणी आणि वारस नोंदणीची माहिती डिजिटल प्रणालीतून उपलब्ध करण्यावर भर देण्यात आला आहे. या सुधारणांमुळे नागरिकांच्या कार्यालयीन फेऱ्या कमी होऊन सेवा वितरण अधिक पारदर्शक आणि कालबद्ध होण्याची अपेक्षा आहे. (MHADA SRA Services Simplified)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर