चिनी गुप्तहेराच्या सापळ्यात ‘एनव्हिडिया’चे जेनसेन हुआंग

    12-Nov-2026   
 
Jensen Huang China Spy Scandal
 
‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ क्षेत्रातील सगळ्यात महत्त्वाची कंपनी म्हणून ओळखल्या जाणार्‍या ‘एनव्हिडिया’ कंपनीचे प्रमुख जेनसेन हुआंग चिनी गुप्तहेराच्या प्रेमाच्या सापळ्यात अडकल्याने संपूर्ण जगभर खळबळ उडाली आहे. समोर येत असलेली माहिती धक्कादायक असून, सर्वच देशांना अंतर्मुख करणारी आहे.
 
'एआय’ उद्योगासाठी अतिशक्तिशाली ‘जीपीयू चिप्स’ची गरज असते. अशाप्रकारच्या चिप्स ‘गेमिंग’ संगणकांमध्ये वापरण्यात येतात आणि ‘एनव्हिडिया’ अनेक वर्षांपासून त्यांची निर्मिती करत असल्याने ‘एआय’ क्षेत्रासोबतच ‘एनव्हिडिया’ कंपनीची घोडदौड सुरू झाली. चिप जेवढी अधिक शक्तिशाली आणि त्यांची संख्या जेवढी अधिक, तेवढी त्या वापरणार्‍या कंपन्यांची संगणन क्षमता वाढते. त्यांची ‘एआय मॉडेल’ तेवढी अधिक प्रभावी ठरतात. आजवर अमेरिकन कंपन्या नवीन तंत्रज्ञान क्षेत्रात अन्य देशांपेक्षा किमान एक दशकभराने पुढे असतात.
 
गेल्या काही दशकांमध्ये चिनी कंपन्यांनी उत्पादन क्षेत्रात अमेरिकेला मागे टाकले असून, इंटरनेट आणि समाजमाध्यम क्षेत्रातही अमेरिकेला समांतर स्वतःची व्यवस्था उभी केली. चीनची लोकसंख्या १४० कोटींहून अधिक असल्याने, तसेच तिथे लोकशाही, अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि मानवाधिकारांचा अडथळा नसल्याने चिनी कंपन्या या क्षेत्रातही अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपन्यांना टक्कर देऊ लागल्या. ‘एआय’ क्षेत्रात अमेरिकेच्या आघाडीच्या कंपन्या जसे की, ‘चॅट जीपीटी’ आणणारी ‘ओपन एआय’, ‘जेमिनी’ आणणारी ‘अल्फाबेट’ आणि ‘लॉड’ आणणारी ‘अ‍ॅन्थ्रॉपिक’ यांनी संशोधन आणि विकासावर जो खर्च केला, त्यापेक्षा फार कमी खर्चामध्ये चिनी कंपन्यांनी ‘डीप सीक’ आणि ‘किमी’ आणि ‘क्वेन’ अशी मॉडेल विकसित केली.
 
चिनी कंपन्या अमेरिकेकडून तंत्रज्ञानाची चोरी करतात. त्यासाठी चिनी गुप्तहेर संस्थांसाठी काम करणार्‍या तरुणांना विद्यार्थी म्हणून अमेरिकेतील सर्वोत्तम विद्यापीठात पाठवले जाते. अमेरिकेच्या प्राध्यापकांना आर्थिक आमिषे दाखवून चीनमध्ये बोलावले जाते. तसेच चीनबाहेर नोंदणी असलेल्या चिनी कंपन्यांकडून उच्च तंत्रज्ञान मिळवण्याचे प्रयत्न केले जातात. अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणेने ‘एआय’ क्षेत्रात चीनची घोडदौड रोखायची असेल, तर चीनला ‘एनव्हिडिया’ कंपनीच्या अत्याधुनिक ‘जीपीयू चिप’ मिळता कामा नयेत, अशी व्यवस्था केली. ‘एनव्हिडिया’चे संस्थापक अध्यक्ष जेनसेन हुआंग हे स्वतः चिनी वंशाचे. त्यांचे वडील १९४०च्या दशकात व्यवसायानिमित्त तैवानमध्ये स्थायिक झाले. त्यांची आई तैवानची होती. चीनला स्वातंत्र्य मिळत असताना, तिथे ‘कॉमिटाँग’ आणि ‘माओ’च्या नेतृत्वाखालील ‘कम्युनिस्ट’ पक्षामध्ये गृहयुद्ध झाले. पुढे युद्धविराम होऊन ‘कॉमिटाँग’ची तैवानवर, ‘कम्युनिस्ट’ पक्षाची चीनच्या मुख्य भूमीवर सत्ता आली. अमेरिकेने १९७०च्या दशकापर्यंत ‘माओ’च्या राजवटीला मान्यता न देता, तैवानमधील सरकारलाच चीनचे सरकार म्हणून मान्यता दिली. त्यामुळे तैवान आणि अमेरिका यांच्यात अत्यंत घनिष्ठ संबंध प्रस्थापित झाले. पुढे अमेरिकेने ‘कम्युनिस्ट’ राजवटीशी राजनयिक संबंध प्रस्थापित करून त्यांच्या चीनमधील सत्तेला मान्यता दिली असली, तरी तैवानच्या संरक्षणाची जबाबदारी अमेरिकेने घेतली आहे.
 
धामधुमीच्या या काळात हुआंग यांचे कुटुंबीय थायलंडमध्ये स्थायिक झाले. व्हिएतनाम युद्धाची झळ थायलंडपर्यंत पोहोचल्यानंतर ते अमेरिकेला स्थायिक झाले. जेनसेन हुआंग त्यावेळी अवघे नऊ वर्षांचे होते. पुढे त्यांनी लहानसहान कामे करत, ‘ओरेगॉन’ विद्यापीठातून ‘इलेट्रिकल इंजिनिअरिंग’ची पदवी घेतली. १९८४ ते १९९३ अशी नऊ वर्षे ‘मायक्रोप्रोसेसर’ क्षेत्रात विविध जबाबदार्‍या हाताळत ते वयाच्या ३०व्या वर्षी ‘एलएसआय’ या कंपनीच्या संचालकपदापर्यंत पोहोचले. १९९३ साली त्यांनी चांगल्या पगाराची नोकरी सोडून ‘एनव्हिडिया’ कंपनी स्थापन केली. आज ‘एनव्हिडिया’ जगातील सर्वांत जास्त बाजार भांडवल असलेली कंपनी बनली आहे.
 
अमेरिका आणि चीनमध्ये ‘मायक्रोप्रोसेसर’ किंवा चिप युद्ध सुरू असताना, चीनची नजर हुआंगवर पडली. अमेरिकेच्या गृहविभागाकडून केलेल्या तपासाचा काही भाग ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ आणि ‘न्यूयॉर्क टाईम्स’कडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार, २०२३ साली चीनने ‘सेवनरोड होल्डिंग्स’ या कंपनीतून ‘डेटा सेंटर’ची निर्मिती करण्यासाठी ‘मेगास्पीड’ या नवीन कंपनीची स्थापना करण्यात आली. ‘एनव्हिडिया’च्या चिप्सवर आधारित ‘डेटा सेंटर’ उभी करून आपल्या ग्राहकांना ‘लाऊड कम्प्युटिंग’ सेवा उपलब्ध करून देण्याचा कंपनीचा उद्देश आहे. या कंपनीची प्रतिनिधी म्हणून चीनने गुप्तहेर म्हणून तयार केलेली अ‍ॅलिस हुआंग तैवानमधील एका व्यापारी परिषदेत जेनसेन हुआंग यांना भेटली. ती ४२ वर्षांची असून, तंत्रज्ञान क्षेत्रात काम करण्यापूर्वी ती ‘सीसीटीव्ही चीन’च्या सरकारी वृत्तवाहिनीमध्ये काम करत होती. तेथून तिने वित्त क्षेत्रात आणि तेथून तंत्रज्ञान क्षेत्रात प्रवेश केला.
 
‘मेगास्पीड’ने मलेशियामध्ये मोठी ‘डेटा सेंटर’ उभी केली असून, त्यांच्याद्वारे आग्नेय आशियातील देशांना ‘लाऊड कम्प्युटिंग’ सेवा पुरवल्या जातात. असा संशय आहे की, या कंपनीकडून ‘डेटा सेंटर’साठी वापरल्या जाणार्‍या ‘एनव्हिडिया चिप्स’पैकी सुमारे ४० टक्के चिप्सचा हिशोब लागत नसून, त्या चीनला पाठवल्या जातात. अतिशक्तिशाली चिप्सच्या साठ्याचा विचार करायचा, तर अमेरिका चीनच्या पाचपटीहून अधिक पुढे आहे. असे असताना, ‘एआय’ क्षेत्रामध्ये चीन अमेरिकेशी स्पर्धा कशी काय करू शकतो, हा प्रश्न अभ्यासकांना पडतो. चीन स्वतः चिप्स बनवत असला, तरी त्यांची क्षमता अमेरिकेच्या आधुनिक चिप्सपेक्षा खूप कमी आहे. त्यामुळे चीनकडून होणार्‍या तंत्रज्ञान-चोरीवर अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांची करडी नजर असते.
 
जून २०२४ मध्ये अ‍ॅलिस आणि जेनसेन यांना पहिल्यांदा एकत्रित पाहण्यात आले. त्याच वर्षी अमेरिकेच्या वाणिज्य विभागाने ‘मेगास्पीड’ कंपनी ‘एनव्हिडिया’कडून आधुनिक चिप्स मिळवून त्या चीन सरकारला पुरवत आहे का, याचा तपास सुरू केला. मे २०२५ मध्ये अ‍ॅलिस आणि जेनसेन यांचा तैवानमधील एका खासगी मेजवानीत पुन्हा एकदा एकत्र असतानाचा फोटो प्रसिद्ध झाला. दि. ९ ऑटोबर २०२५ रोजी ‘न्यूयॉर्क टाईम्स’ने ‘मेगास्पीड’ आणि अ‍ॅलिस हुआंगबद्दल चौकशी सुरू असल्याचे वृत्त सर्वांत प्रथम प्रसिद्ध केले. जेनसेन हुआंग अमेरिकेतील सर्वांत महत्त्वाच्या उद्योगपतींपैकी एक असल्याने आणि त्यांनी ‘एनव्हिडिया’ कंपनीचा ट्रम्प सरकारच्या ‘मेक इन अमेरिका’ धोरणाला उघडउघड पाठिंबा दिला असल्याने, या वृत्ताने खळबळ माजली. त्यावेळी कंपनीकडून खुलासा करण्यात आला की, आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये विविध देशांच्या कंपन्यांच्या प्रतिनिधींमध्ये अनौपचारिक गप्पा रंगतात. त्यात विशेष असे काही नाही. गेल्या आठवड्यात हुआंग यांनी आपण आपल्या पत्नीशी प्रतारणा केली असून, अ‍ॅलिस हुआंगशी आपले विवाहबाह्य संबंध असल्याचे मान्य केले. पण, आपण राष्ट्रीय सुरक्षेच्या संबंधातील माहिती तिला दिल्याचे त्यांना मान्य नाही. ‘मेगास्पीड’नेही आपली कंपनी चीनला चिप्स पाठवत असल्याच्या वृत्ताला नकार देताना खुलासा केला आहे की, ‘आपल्या वागण्यामध्ये पूर्ण पारदर्शकता आहे.’ थोडयात, अमेरिकेतील सुरक्षा यंत्रणांतील चीनविरोधी जहाल गटाचे म्हणणे आहे की, ‘अमेरिकन ‘मायक्रोप्रोसेसर’ कंपन्यांना, चिनी कंपन्यांना आपली उत्पादने विकण्यास पूर्णपणे मज्जाव करण्यात यावा,’ तर मवाळ गटाचे म्हणणे आहे की, ‘असे केल्यास चीन स्वतःच्या चिप्स विकसित करेल. ‘एनव्हिडिया’ने कमी क्षमतेच्या चिप्स चीनला विकल्यास, त्याबदल्यात अमेरिकेला चीनवरील आघाडी टिकवता येईल.’ अमेरिकेने ‘एनव्हिडिया’ कंपनीच्या कमी क्षमतेच्या चिप्स चीनला निर्यात कराव्यात, यासाठी जेनसेन हुआंग आग्रही राहिले आहेत. आता त्यांच्या या भूमिकेकडून संशयाच्या चष्म्यातून पाहिले जात आहे.
 
डोनाल्ड ट्रम्प यांचे धोरण घड्याळाच्या लंबकाप्रमाणे या टोकापासून त्या टोकापर्यंत फिरत आले आहे. अनेकदा ट्रम्प यांनी आपल्या कुटुंबीयांच्या व्यापारी हितसंबंधांसाठी अमेरिकेच्या धोरणात बदल केल्याचे आरोपदेखील केले गेले आहेत. त्यामुळे ट्रम्प यांचाही हुआंग यांची पाठराखण करण्यात किंवा चीनला कमी क्षमतेच्या चिप्स निर्यात करण्यास परवानगी देताना काही हितसंबंध आहेत का, हे तपासण्याची मागणी होऊ लागली आहे. या प्रकरणामुळे अमेरिका आणि चीनमधील तंत्रज्ञान क्षेत्रातील शीतयुद्धाचे महायुद्धात रूपांतर होताना दिसत आहे.
 




अनय जोगळेकर

आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अर्थकारणाचे अभ्यासक असून राजकीय घडामोडींचे विश्लेषक आणि विशेष प्रकल्पाधिकारी म्हणून ते गेली १२ वर्षं कार्यरत आहेत. वाणिज्य शाखेतील पद्व्युत्तर शिक्षणानंतर त्यांनी पत्रकारितेची पदवी घेतली आहे. एकात्मिक जलव्यवस्थापन या विषयात ते मुंबई विद्यापीठातून पीएचडी करत आहेत.  इंटरनेट, तंत्रज्ञान, समाज माध्यमं आणि जागतिकीकरण हे त्यांच्या आवडीचे विषय आहेत. संगणकीय मराठी आणि भारतीय भाषांमध्ये माहिती तंत्रज्ञान सहजतेने उपलब्ध व्हावे यासाठी त्यांनी काम केले असून सध्या राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळात ते अशासकीय सदस्य म्हणून कार्यरत आहेत. मुक्त स्तंभलेखक म्हणून ते गेली ८ वर्षं विविध वर्तमानपत्र तसेच ब्लॉगच्या माध्यमातून लिहित आहेत.

संबंधित मजकूर