मुंबई (Sonia Gandhi Memoir) : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या ‘Belonging: A Journey of Love’ या आत्मचरित्राचे नुकतेच प्रकाशन झाले. या पुस्तकात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यापासून माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याशी झालेला विवाह आणि त्यांचा राजकीय प्रवास यांचा आढावा घेण्यात आला आहे. मात्र, पुस्तकाच्या प्रकाशनानंतर त्यातील काही ऐतिहासिक संदर्भ आणि तारखांवरून राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना, अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखालील भ्रष्टाचारविरोधी आंदोलन आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्या निधनाच्या वर्षाबाबत दिलेला संदर्भ चुकीचा असल्याचे निदर्शनास आले आहे.
पुस्तकाच्या प्रकाशनापूर्वीच प्रकाशक बदलल्याच्या वृत्तामुळे सोनिया गांधींचे हे पुस्तक चर्चेत आले होते. सुरुवातीला पेंग्विन रँडम हाऊसकडून प्रकाशित होणारे हे पुस्तक नंतर हार्परकॉलिन्स या प्रकाशन संस्थेकडून प्रकाशित करण्यात आले. या आत्मचरित्रात सोनिया गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उल्लेख केला आहे. पुस्तकाच्या २४ व्या प्रकरणातील ३३८ व्या पानावर त्यांनी, ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना १९२१ मध्ये झाली,’ असे लिहिले आहे. मात्र, हा संदर्भ चुकीचा असून संघाची स्थापना आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी २७ सप्टेंबर १९२५ रोजी नागपूर येथे विजयादशमीच्या मुहूर्तावर केली होती. (Sonia Gandhi Memoir)
आत्मचरित्राच्या ३३ व्या प्रकरणातील ४६१ व्या पानावर अण्णा हजारे हे २०१२ मध्ये ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचा चेहरा म्हणून पुढे आल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, या आंदोलनाला देशव्यापी प्रसिद्धी २०११ मध्ये मिळाली होती. ५ एप्रिल २०११ रोजी अण्णा हजारे यांनी दिल्लीतील जंतरमंतर येथे भ्रष्टाचाराविरोधात कठोर जनलोकपाल कायदा करण्याच्या मागणीसाठी बेमुदत उपोषण सुरू केले होते. (Sonia Gandhi Memoir)
आत्मचरित्राच्या २९ व्या प्रकरणातील ४०१ व्या पानावर सोनिया गांधी यांनी आपले निकटवर्तीय राजकीय सहकारी अहमद पटेल यांच्या निधनाचा उल्लेख केला आहे. त्यांचे निधन २०२२ मध्ये कोविड-१९ मुळे झाल्याचे पुस्तकात नमूद करण्यात आले आहे. मात्र, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे २५ नोव्हेंबर २०२० रोजी कोविड-१९ संबंधित गुंतागुंतीच्या आरोग्यविषयक समस्यांमुळे निधन झाले होते. ते सोनिया गांधी यांचे अत्यंत निकटचे राजकीय विश्वासू सहकारी होते. त्यांनी सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव म्हणूनही काम पाहिले होते. (Sonia Gandhi Memoir)