युवतींच्या सामर्थ्याला दिशा देणारे ‘युगंधरा’ युवती संमेलन उत्साहात संपन्न!

शिक्षण, नेतृत्व, उद्योजकता आणि राष्ट्रनिर्मितीमध्ये युवतींनी सक्रिय योगदान द्यावे; मान्यवरांचे आवाहन

    01-Nov-2026   
 
 
Yugandhara Yuvati Sammelan 2026
 
मुंबई (Yugandhara Yuvati Sammelan 2026) : युवतींच्या सुप्त गुणांना वाव मिळावा, त्यांच्यात आत्मविश्वास, नेतृत्वक्षमता आणि सामाजिक जाणीव विकसित व्हावी तसेच राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात युवतींचा सक्रिय सहभाग वाढावा, या उद्देशाने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मुंबई उत्तर विभागाच्या वतीने ‘युगंधरा’ युवती संमेलन २०२६ चे आयोजन शनिवार, दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता कांदिवली येथील अटल बिहारी वाजपेयी कौशल्य विकास केंद्र येथे करण्यात आले. या संमेलनाला युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
 
आजच्या बदलत्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक परिस्थितीत युवतींनी केवळ शिक्षण घेण्यापुरते मर्यादित न राहता विविध क्षेत्रांमध्ये नेतृत्वाची भूमिका स्वीकारावी, स्वतःच्या क्षमतांची ओळख करून घ्यावी आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान द्यावे, हा या संमेलनामागील प्रमुख विचार होता. शिक्षण, प्रशासन, उद्योग, सामाजिक कार्य, पर्यावरण संवर्धन आणि राष्ट्रनिर्मिती अशा विविध क्षेत्रांमध्ये महिलांनी आपले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी पुढे यावे, असा सकारात्मक संदेश या संमेलनातून देण्यात आला. (Yugandhara Yuvati Sammelan 2026)
 
या संमेलनाला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संचालिका अनिता पाटील (भा.व.से.), युवा उद्योजिका रितूपर्णा मोहनती, अभाविप कोकण प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अपर्णा कुलकर्णी आणि कार्यक्रम प्रमुख श्रद्धा नलावडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
संमेलनादरम्यान वेदिका नलावडे यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. तसेच शर्वरी जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवकालीन शस्त्रांचे प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांना शिवकालीन युद्धकलेची आणि शौर्यपरंपरेची ओळख करून दिली. या सादरीकरणांना उपस्थित युवतींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.  (Yugandhara Yuvati Sammelan 2026)
 
प्रशासकीय क्षेत्रातील संधी आणि पर्यावरण संवर्धनाविषयी मार्गदर्शन करताना श्रीमती अनिता पाटील म्हणाल्या, “युवतींनी स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवून प्रत्येक क्षेत्रात पुढे येण्याची तयारी ठेवली पाहिजे. प्रशासन असो किंवा पर्यावरण संवर्धन, प्रत्येक क्षेत्रात महिलांसाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत. समाजाप्रती असलेली जबाबदारी ओळखून काम करण्याची वृत्ती आणि निर्णयक्षमता विकसित करणे आवश्यक आहे. निसर्गाचे संवर्धन आणि भावी पिढ्यांसाठी पर्यावरणाचे रक्षण करणे हीदेखील आपली सामूहिक जबाबदारी आहे.”  (Yugandhara Yuvati Sammelan 2026)
 
उद्योजकतेतील संधी आणि स्वावलंबनाविषयी आपले विचार मांडताना युवा उद्योजिका रितूपर्णा मोहातनी म्हणाल्या, “आजच्या काळात युवतींसमोर उद्योजकतेच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी धाडस, सातत्य, मेहनत आणि योग्य नियोजन आवश्यक आहे. अपयशाला घाबरण्याऐवजी त्यातून शिकण्याची तयारी ठेवली पाहिजे. युवतींनी नोकरीच्या संधी शोधण्याबरोबरच स्वतःच्या कल्पनांमधून रोजगारनिर्मिती करणाऱ्या उद्योजिका बनण्याचे ध्येय ठेवावे. आर्थिक स्वावलंबन हे महिलांच्या सक्षमीकरणाचे महत्त्वाचे साधन आहे.”  (Yugandhara Yuvati Sammelan 2026)
 
युवतींचे व्यक्तिमत्त्व विकास, सामाजिक भान आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदान याविषयी मार्गदर्शन करताना अभाविप कोकण प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अपर्णा कुलकर्णी म्हणाल्या, “युवती या केवळ समाजाच्या भविष्यातील आशा नसून वर्तमानातील परिवर्तनाच्या महत्त्वपूर्ण शक्ती आहेत. शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञान मिळवण्यासोबतच समाजातील प्रश्नांची जाणीव ठेवणे आणि त्या प्रश्नांच्या निराकरणासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करताना सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्राप्रती असलेले कर्तव्य यांची जाणीव युवतींनी कायम ठेवली पाहिजे. सक्षम युवतींच्या सहभागातूनच समर्थ आणि आत्मनिर्भर राष्ट्राची निर्मिती शक्य आहे.”  (Yugandhara Yuvati Sammelan 2026)
 
कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट करताना कार्यक्रम प्रमुख श्रद्धा नलावडे म्हणाल्या, “‘युगंधरा’ हे केवळ एक संमेलन नसून युवतींना त्यांच्या क्षमता ओळखून देणारे, विचारांना दिशा देणारे आणि नेतृत्वासाठी प्रेरित करणारे व्यासपीठ आहे. आजच्या युवतींमध्ये प्रचंड क्षमता असून त्यांना योग्य संधी, मार्गदर्शन आणि व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे. शिक्षण, सामाजिक कार्य, उद्योजकता आणि राष्ट्रनिर्मिती अशा विविध क्षेत्रांमध्ये युवतींनी पुढाकार घ्यावा, यासाठी अभाविप सातत्याने प्रयत्नशील आहे. या संमेलनाच्या माध्यमातून युवतींमध्ये आत्मविश्वास आणि सामाजिक उत्तरदायित्वाची भावना अधिक दृढ व्हावी, हा आमचा प्रयत्न आहे.” (Yugandhara Yuvati Sammelan 2026)
 
‘युगंधरा’ युवती संमेलनाच्या माध्यमातून २५० हून अधिक युवतींना विविध क्षेत्रांतील अनुभवी मान्यवरांचे विचार आणि मार्गदर्शन ऐकण्याची संधी उपलब्ध झाली. सांस्कृतिक कार्यक्रम आणि शिवकालीन शस्त्रांच्या प्रात्यक्षिकामुळे संमेलनाला सांस्कृतिक व ऐतिहासिक परंपरेची जोड मिळाली. स्वतःच्या क्षमता ओळखून ध्येय निश्चित करणे, आव्हानांना सामोरे जाणे, स्वावलंबी बनणे आणि समाजासाठी सकारात्मक योगदान देणे, या महत्त्वपूर्ण बाबींवर या संमेलनातून प्रकाश टाकण्यात आला. (Yugandhara Yuvati Sammelan 2026)
 
अभाविपच्या मते, राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत युवाशक्तीचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून युवतींचा सक्रिय सहभाग हा विकसित, सक्षम आणि आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी आवश्यक आहे. याच विचाराला केंद्रस्थानी ठेवून आयोजित करण्यात आलेले ‘युगंधरा’ युवती संमेलन युवतींच्या सामर्थ्याला नवी दिशा आणि त्यांच्या स्वप्नांना नवी उभारी देणारे ठरले. (Yugandhara Yuvati Sammelan 2026)
 
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर