मुंबई (Drone-Based Artificial Rain in Jalna) : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी आता ड्रोन तंत्रज्ञानाचा पर्याय तपासला जात आहे. जालना जिल्ह्यात स्वदेशी ड्रोन तंत्रज्ञानाच्या मदतीने कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रक्रियेची प्रायोगिक चाचणी घेण्यात आली. इस्लामवाडी टेकडीवरून उड्डाण केलेल्या ड्रोनच्या माध्यमातून सुमारे ४०० मीटर उंचीवर ढगांमध्ये क्षाराधारित क्लाऊड सीडिंग द्रव्याची फवारणी करण्यात आली. कमी खर्चात आणि कमीत कमी पायाभूत सुविधांच्या मदतीने कृत्रिम पाऊस पाडणे शक्य आहे का, याची पडताळणी या प्रयोगातून करण्यात येत आहे.
सध्या कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी प्रामुख्याने विमान किंवा हेलिकॉप्टरचा वापर केला जातो. मात्र, या प्रक्रियेसाठी मोठा खर्च, तांत्रिक यंत्रणा आणि पायाभूत सुविधांची आवश्यकता असते. त्या तुलनेत ड्रोनच्या माध्यमातून कमी खर्चात आणि विशिष्ट ठिकाणी लक्ष्य केंद्रित करून क्लाऊड सीडिंग करता येऊ शकते का?, याचा अभ्यास केला जात आहे. (Drone-Based Artificial Rain in Jalna)
पुण्यातील भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेच्या (आयआयटीएम) संशोधनातून योग्य हवामान परिस्थितीत क्लाऊड सीडिंगमुळे पर्जन्यमान वाढण्याची शक्यता समोर आली आहे. त्यामुळे जालन्यातील या प्रयोगाकडे विशेष लक्ष लागले आहे. या चाचणीत क्लाऊड सीडिंग केलेले आणि न केलेले ढग यांची तुलना केली जाणार आहे. तसेच फवारणी यंत्रणेची परिणामकारकता आणि हवामानातील बदल यांचाही पुढील काळात अभ्यास करण्यात येणार आहे. (Drone-Based Artificial Rain in Jalna)
या प्रयोगामागील भूमिका स्पष्ट करताना बळीराम बागल यांनी सांगितले की, "नेहमी कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी विमान किंवा हेलिकॉप्टरचा वापर केला जातो. मात्र, त्यासाठी लागणारा खर्च आणि पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर असतात. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कमीत कमी पायाभूत सुविधांमध्ये कृत्रिम पाऊस पाडता येऊ शकतो का, या विचारातून ड्रोन उत्पादक प्रद्युम्न मानधनी यांच्याशी चर्चा केली. त्यांनी या प्रयोगासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला." (Drone-Based Artificial Rain in Jalna)
ड्रोन तज्ज्ञ आणि संशोधक प्रद्युमण मानधनी हे ड्रोन उत्पादक असून त्यांच्या कंपनीकडून भारतासह परदेशातही ड्रोनची निर्यात केली जाते. या स्वदेशी ड्रोन तंत्रज्ञानाची चाचणी यशस्वी ठरल्यास भविष्यात तुलनेने कमी खर्चात क्लाऊड सीडिंग करण्याचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो. (Drone-Based Artificial Rain in Jalna)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.