मुंबई (MPSC Students Jobs Update 2026) : एमपीएससी आंदोलक विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा केली असून, या विषयावर मुख्यमंत्रीही सकारात्मक असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले. येत्या काही दिवसांत एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यांसंदर्भात चांगली बातमी येण्याची अपेक्षा असल्याचेही त्यांनी नमूद केले.
आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत राज ठाकरे यांनी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले की, "दि. ५ ऑक्टोबर रोजी पुण्यात एमपीएससी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. त्यावेळी विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले होते. स्वतःचा राहता जिल्हा, तालुका, आपले घर तसेच आपल्या कुटुंबाला सोडून नोकरीसाठी राब राब राहणाऱ्या तरुणांना आणि तरुणींना पाहिले की, जिवाची कालवाकालव होते." (MPSC Students Jobs Update 2026)
विद्यार्थ्यांनी संयम ठेवावा
"त्यामुळे आज मुख्यमंत्र्यांशी या विषयावर सविस्तर चर्चा झाली. ते देखील पूर्णपणे सकारात्मक आहेत हे जाणवले. आणि येत्या काही दिवसांत एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यांसंदर्भात एक चांगली बातमी येईल अशी अपेक्षा आहे . तेव्हा विद्यार्थ्यांनीदेखील संयम ठेवावा," असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पद्धतीतील त्रुटी, कथित पेपरफुटी, रखडलेली भरती प्रक्रिया आणि लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा अशा विविध विषयांवर पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. आता राज ठाकरे यांनी या आंदोलनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली असून लवकरच यावर सकारात्मक तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. (MPSC Students Jobs Update 2026)