विवेकानंद पाटील आणि नवनाथ बन यांच्यात जुंपली!

रोहित पवार आणि विवेकानंद पाटील यांनी रामरक्षा स्तोत्राचा श्लोक म्हणावा; बन यांचे आव्हान

    09-Oct-2026   
 
 Vivekanand Patil Navnath Ban MPSC Protest
 
मुंबई (Vivekanand Patil Navnath Ban MPSC Protest) : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून भाजप प्रवक्ते नवनाथ बन आणि आंदोलक विवेकानंद पाटील यांच्यात चांगलीच जुंपली आहे. विवेकानंद पाटील यांनी नवनाथ बन यांच्यावर केलेल्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर देत त्यांनी रोहित पवार आणि विवेकानंद यांना रामरक्षा स्तोत्राचा श्लोक म्हणण्याचे आव्हान दिले.
 
आंदोलक विवेकानंद पाटील यांनी नवनाथ बन यांना नवनाथ सांप्रदायाचा उगम कुठे झाला आणि नवनाथांपैकी नऊ नाथ कोणकोण आहेत, ते सांगावे, असे आव्हान दिले होते. या आव्हानाला सडेतोड प्रत्युत्तर देत नवनाथ बन म्हणाले की, एमपीएससीच्या आंदोलनात काल पुन्हा एकदा माझ्यावर व्यक्तिगत टीका करण्यात आली आणि मला २५० मार्काचा पेपर सोडवण्यासाठी देण्यात आला. नवनाथांची नावे आणि नाथांची परंपरा सांगा, असे मला सांगण्यात आले. बन यांनी आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा हा संपूर्ण अभंग म्हणत विवेकानंद पाटील यांच्यावर अर्धवट अभंग सांगत असल्याची टीका केली. तसेच त्यांनी शिव पंचाक्षर स्तोत्रातील एक श्लोकही म्हणून दाखवला. भगवान शंकरापासून चालत आलेली नाथ परंपरा ज्ञानोबांनी भागवत धर्मापर्यंत आणून ठेवली असल्याचे त्यांनी सांगितले. एवढेच नाही तर, त्यांनी नवनाथांची नऊ नावेदेखील सांगितली. शिवाय आपल्या ज्ञानाचा अहंकार करू नका, असा सल्लाही विवेकानंद पाटील यांना दिला. (Vivekanand Patil Navnath Ban MPSC Protest)
 
विवेकानंद पाटील आणि रोहित पवार यांनी ५०० मार्काचा पेपर सोडवावा
 
"आधी विवेकानंद पाटील यांनी रामरक्षा स्तोत्राचा श्लोक म्हणावा आणि नंतर रोहित पवारांनी तो श्लोक वाचून म्हणायला लावावा. कदाचित विवेकानंद पाटील असेही म्हणतील की, बारामतीच्या बसस्टॅण्डवर चिंचा आणि बोरं विकण्यात रोहित पवारांचे बालपण गेल्याने त्यांचा संस्कृत सुभाषितांचा अभ्यास नाही. त्यामुळे मी रोहित पवारांना सोपा पेपर देतो. वारकरी संप्रदायामध्ये 'राम कृष्ण हरी' पासून 'सुंदर ते ध्यान, रूप पाहता लोचनी' आणि 'हेचि दान देगा देवा' ते 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' पर्यंत कुठलाही एक अभंग विवेकानंद यांनी म्हणावा आणि त्याचे निरूपण रोहित पवारांनी करावे. या ५०० मार्कांच्या पेपरमध्ये रोहित पवारांना किती मार्क मिळतात ते बघू," असे आव्हान नवनाथ बन यांनी दिले. तसेच यापुढे कुणाची अक्कल काढत असताना विवेकानंद यांनी १००० वेळा विचार करावा, असेही ते म्हणाले. (Vivekanand Patil Navnath Ban MPSC Protest)
 
मिशन मुख्यमंत्री यशस्वी होऊ देणार नाही
 
"यापुढे कोणाचा अभ्यास कसा आहे, कुणाचे ज्ञान कसे आहे, हे सांगण्याच्या भानगडीत पडू नये. 'अहंकाराचा वारा न लागो' या उक्तीप्रमाणे वारकरी संप्रदायानुसार वागावे. त्यातच विवेकानंदांचे हित आहे. बाकी रोहित पवार आणि मी येणाऱ्या काळात जी काही उत्तरे द्यायची आहेत ती देऊ. कारण ओबीसी असलो, गावकुसाबाहेर राहत असलो तरी तुम्हाला घाबरत नाही. तुमच्या या ट्रोलधाडीला घाबरून मी गप्प बसेन, असे वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे. मी भाजपा आणि देवाभाऊंचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे. तुम्हाला तात्त्विक मुद्द्यांवर, तत्त्वज्ञानावर किंवा एमपीएससीवर चर्चा करायची असेल तर, कुठेही खुली चर्चा ठेवा. स्थळ, ठिकाण, वेळ तुम्ही निवडा. आम्ही सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी तयार आहोत. परंतू, तुमचे मिशन मुख्यमंत्री आम्ही यशस्वी होऊ देणार नाही," अशी टीकाही नवनाथ बन यांनी केली. (Vivekanand Patil Navnath Ban MPSC Protest)
 
एमपीएससी आंदोलनामागे रोहित पवारांचे नेतृत्व पुढे आणण्याचा डाव
 
रोहित पवार यांचे एमपीएससी आंदोलन हे विद्यार्थ्यांसाठीचे आंदोलन नाही तर तो राजकीय अजेंडा आहे. प्रामाणिकपणे अभ्यास करणारे विद्यार्थी त्यात नाहीत हे आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत आहोत. आता हे आंदोलन म्हणजे रोहित पवार यांचे नेतृत्व पुढे आणण्यासाठीच्या प्रयत्नाचा भाग असल्याचे उघड झाले आहे. आंदोलनाच्या ठिकाणच्या भाषणांमध्ये कार्यकर्ते ‘आपल्या रोहितदादांना मुख्यमंत्री करायचे आहे’ असे म्हणत असल्याचे अनेक व्हिडिओ नवना बन यांनी यावेळी सादर केले. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील जनता रोहित पवारांच्या मुख्यमंत्रिपदाच्या स्वप्नाला आग लावल्याशिवाय राहणार नाही. कारण हा महाराष्ट्र तुमच्यासारख्या नौटंकीबाजांच्या पाठीशी कधीच उभा नव्हता. तो मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या पाठीशी उभा आहे. कारण आम्ही जनता आणि विद्यार्थ्यांसोबत आहोत. राज ठाकरे यांनीही ट्विट करून आपली मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून लवकरच आनंदाची बातमी येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आता कुणाच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीला आग लागेल, हे विवेकानंद पाटील यांच्यासारख्या मंडळींनी ध्यानात ठेवावे, असेही ते म्हणाले. (Vivekanand Patil Navnath Ban MPSC Protest)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर