पालघर (Palghar Ganesh Visarjan Competition 2026) : पालघर जिल्हा पोलीस दल आणि दै. ‘मुंबई तरुण भारत’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘सार्वजनिक श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक स्पर्धा २०२६’चा पारितोषिक वितरण सोहळा बुधवार, दि. ७ ऑक्टोबर रोजी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात उत्साहात पार पडला.
यावेळी पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यतिश देखमुख यांनी उपस्थितांना संबोधित केले. सार्वजनिक ‘श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक स्पर्धे’च्या माध्यमातून आपल्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडल्याचे नमूद केले. "भविष्यातही असे उपक्रम राबवले जातील, ज्यामुळे सार्वजनिक उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरे होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार नाही,” असे प्रतिपादन केले. या स्पर्धेत सहभागी सर्व मंडळांचे अभिनंदन करत "त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन इतर मंडळांनीही असाच आदर्श गणेशोत्सव साजरा करावा,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच या यशस्वी आयोजनाबद्दल सहआयोजक दै. ‘मुंबई तरुण भारत’चे आभार मानले. या सोहळ्याची सुरुवात सायंकाळी ४.३० वाजता दीपप्रज्वलनाने झाली. प्राध्यापिका सुप्रिया राऊत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. दीपप्रज्वलनानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. जिल्हा विशेष शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गिते यांनी ‘पीपीटी’द्वारे स्पर्धा नियोजन व डेटा संकलनाची माहिती दिली. त्यानंतर गिते यांच्यासह पोलिस विभागातील आयटी विभागाचे तुषार कथोरे, डहाणू पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक दीपक रावते, तारापूर सहा.फौ. विनायक मर्दे, जिल्हा विशेष शाखेचे वैभव हडपती, कासा पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार जितेंद्र उमतोल यांचा विशेष सत्कार करण्यात आला. (Palghar Ganesh Visarjan Competition 2026)
दै. ‘मुंबई तरुण भारत’चे संपादक किरण शेलार यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक (कोकण परिक्षेत्र) चंद्रकिशोर मीना, अप्पर जिल्हाधिकारी दत्तात्रेय कवितके आणि अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांनी उपस्थितांना संबोधित केले. (Palghar Ganesh Visarjan Competition 2026)
कार्यक्रमात मुख्य जिल्हास्तरीय, जिल्हास्तरीय उत्तेजनार्थ आणि तालुकास्तरीय विजेत्या मंडळांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. यानंतर राष्ट्रीय गीत, राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
तालुकास्तरीय विजेती गणेशोत्सव मंडळे
तलासरी: विश्व हिंदू परिषद प्रकल्प, तलासरी
जव्हार: सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, दळवीपाडा (डेंगाची मेट)
मोखाडा: सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ब्राह्मणगाव
विक्रमगड: चालक-मालक मित्र मंडळ, विक्रमगड
वाडा: श्री गणेश मित्र मंडळ, चौधरीपाडा (देवगाव)
डहाणू: सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळ, सायवन (कासा)
पालघर: आर्य क्रीडा सांस्कृतिक मंडळ, कचेरी रोड (पालघर)
सायबर सुरक्षिततेबाबत दहा प्रश्नांची ऑनलाईन परीक्षा व प्रमाणपत्र
यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी सायबर सुरक्षिततेविषयी एका महत्त्वाच्या उपक्रमाची माहिती दिली. पालघर जिल्ह्यात ऑक्टोबर महिना हा ‘सायबर जनजागृती महिना’ म्हणून साजरा केला जात आहे. त्यानिमित्त सायबर सुरक्षेसाठी दहा प्रश्नांचा एक संच तयार करण्यात आला असून त्याची लिंक सर्वत्र प्रसारित केली जाणार आहे. ही परीक्षा पूर्ण करणार्या नागरिकांना ऑनलाईन प्रमाणपत्र मिळणार आहे. समाजात आपण किती सायबर सुरक्षित आहोत, हे तपासण्यासाठी प्रत्येकाने या परीक्षेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. (Palghar Ganesh Visarjan Competition 2026)