पालघरचा ‘डीजे’मुक्त गणेश विसर्जन मिरवणुकीचा आदर्श

दै. ‘मुंबई तरुण भारत’चा पुढाकार सुमारे १,६५० मंडळांचा सहभाग

DJ Free Ganesh Visarjan
 
पालघर ( DJ Free Ganesh Visarjan) : गणेशोत्सवाची परंपरा, सामाजिक भान, पर्यावरण संवर्धन आणि शिस्त यांचा सुंदर संगम घडवत पालघर जिल्हा पोलीस आणि दै. ‘मुंबई तरुण भारत’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘सार्वजनिक श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक स्पर्धा २०२६’चा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला. "पालघर जिल्ह्याने ‘डीजे’मुक्त गणेश विसर्जन मिरवणुकीचा आदर्श महाराष्ट्रासाठी घालून दिला,” अशा शब्दांत कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मिणा यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
 
पालघर जिल्ह्यातील १,९५८ मंडळांपैकी १,६५० मंडळांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. "गणेशोत्सवातील वाढते ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी गेल्या दहा वर्षांपासून ‘डीजे’मुक्त मिरवणुकीची संकल्पना पुढे नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. सर्वांच्या सहकार्याने पालघरमध्ये पारंपरिक वाद्यांच्या साथीने ‘डीजे’मुक्त मिरवणूक काढण्यात आली. कोणताही उत्सव हा समाजाला सकारात्मक संदेश देण्याची संधी असतो,” असे मिणा यांनी यावेळी स्पष्ट केले. ( DJ Free Ganesh Visarjan)
 
"मी महाराष्ट्रात पोलीस अधिकारी म्हणून गेल्या २० वर्षांपासून काम करत आहे. गणेशोत्सव हा कोकणच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. ही परंपरा जपण्यासाठी आणि तिला पुढे घेऊन जाण्यासाठी पालघर पोलीस आणि दै. ‘मुंबई तरुण भारत’ यांनी घेतलेला हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे,” असे प्रतिपादन मिणा यांनी केले.
 
"स्पर्धेच्या निकषांचेही त्यांनी कौतुक केले. पर्यावरण, अभयारण्यांचे संरक्षण, महिलांची सुरक्षा, बालकांचे संरक्षण, प्लास्टिकचा वापर टाळणे आणि ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान अशा विविध बाबींचा स्पर्धेच्या निकषांमध्ये समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक बाबीला गुण देण्यात आले आहेत. त्यामुळे हा केवळ पुरस्काराचा कार्यक्रम नसून पुढील वर्षासाठी प्रेरणा देणारा सातत्यपूर्ण उपक्रम आहे,” असे त्यांनी सांगितले. ( DJ Free Ganesh Visarjan)
 
यावेळी दै. ‘मुंबई तरुण भारत’चे संपादक किरण शेलार यांनीही पालघर पोलिसांच्या उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले, "गणेश विसर्जनाची मिरवणूक किती चांगल्या प्रकारे पार पडली, इतरांना त्रास न देता आदर्श कसा निर्माण केला आणि समाजाने त्याचे अनुकरण कसे करावे, याचा गौरव करण्यासाठी आपण आज येथे एकत्र आलो आहोत. पालघर जिल्ह्याने सामाजिक भान दाखवत ‘डीजे’च्या दणदणाटापेक्षा शिस्त, संस्कृती आणि सामाजिक जबाबदारीला प्राधान्य दिले. हा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याने, विशेषतः मोठ्या शहरांनी अनुकरण करावा, असा वस्तुपाठ आहे,” असे शेलार म्हणाले. ( DJ Free Ganesh Visarjan)
 
"गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस अधिकारी-कर्मचारी आपल्या कुटुंबापासून दूर राहतात, याची जाणीव ठेवून विसर्जन मिरवणुका शिस्तबद्ध आणि वेळेत पूर्ण कराव्या,” असे आवाहनही त्यांनी केले. "आपण सण साजरे करताना आपल्या सुरक्षेसाठी सदैव उभ्या असलेल्या पोलिसांचाही संवेदनशीलपणे विचार केला पाहिजे,” असे शेलार यांनी नमूद केले.
 
या सोहळ्यास पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके , अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, यांच्यासह पालघर पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. ( DJ Free Ganesh Visarjan)
 
उत्कृष्ट गणेश मंडळांचा सन्मान
 
प्रथम पुरस्कार : १ लाख रुपये व प्रमाणपत्र
वृक्षमित्र मंडळ, पास्थळ, ता. पालघर
 
द्वितीय पुरस्कार : ७५ हजार रुपये व प्रमाणपत्र
साईनगर विकास मंडळ, पालघर
 
तृतीय पुरस्कार : ५० हजार रुपये व प्रमाणपत्र
छत्री कंपाऊंड मित्र मंडळ, ता. डहाणू
 
उत्तेजनार्थ पुरस्कार : ३५ हजार रुपये
वंजारपाड्याचा महागणपती, ता. पालघर
सह्याद्री आदिवासी सामाजिक सेवा संस्था, उधवा
 
गणेशोत्सव हा कोकणच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. ही परंपरा जपण्यासाठी आणि तिला पुढे घेऊन जाण्यासाठी पालघर पोलीस आणि दै. ‘मुंबई तरुण भारत’ यांनी घेतलेला हा उपक्रम महत्त्वाचा आहे.- चंद्रकिशोर मिणा, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण
 
सार्वजनिक श्री गणेश मूर्ती विसर्जन मिरवणूक स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या समृद्घ संस्कृतीचे दर्शन घडले. भविष्यातही असे उपक्रम राबविले जातील.- यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक, पालघर
 
पालघर जिल्ह्याने सामाजिक भान दाखवत ‘डीजे’च्या दणदणाटापेक्षा शिस्त, संस्कृती आणि सामाजिक जबाबदारीला प्राधान्य दिले. हा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याने, विशेषतः मोठ्या शहरांनी अनुकरण करावा, असा वस्तुपाठ आहे.- किरण शेलार, संपादक, दै. ‘मुंबई तरुण भारत’
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर