मातीशी नाळ जोडलेला ‘नटसम्राट’!


 Nana Patekar Biography and Legacy

 
एक दमदार अभिनेता, संवेदनशील साहित्यप्रेमी, अष्टपैलू कलावंत आणि समाजासाठी सदैव झटणारा ‘देवमाणूस’... मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीचा ‘नटसम्राट’ ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गुरुवार, दि. ८ ऑक्टोबर रोजी वयाच्या ७५व्या वर्षी निधन झाले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली असून, अभिनयाचा एक दिग्गज अध्याय काळाच्या पडद्याआड गेला आहे.
 

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लखलखता तारा म्हणजे नाना पाटेकर. मातीशी नाळ जोडलेला आणि सर्वसामान्यांना आपला वाटणारा हा अभिनेता आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. गंभीर असो, विनोदी असो किंवा खलनायकी भूमिका असो, प्रत्येक व्यक्तिरेखेला त्यांनी आपल्या अभिनयाची वेगळी छाप दिली. हिंदी, मराठीसह अनेक भाषांमध्ये काम करत त्यांनी देशभरात मोठा चाहतावर्ग निर्माण केला.
 

नानांचे खरे नाव विश्वनाथ पाटेकर. दि. १ जानेवारी १९५१ रोजी रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील दिनकर पाटेकर यांचा कपड्यांचा व्यवसाय होता. आईचे नाव संजनाबाई पाटेकर, पत्नी नीलकांती व मुलगा मल्हार पाटेकर हे त्यांचे कुटुंब. नाना अवघ्या बाराव्या वर्षांचे असताना व्यवसाय बंद पडल्याने कुटुंबावर आर्थिक संकट आले. या काळात नानांनी मुंबईत चित्रपटांची पोस्टर्स लावण्याचे काम केले. त्यावेळी त्यांना दिवसातील एका वेळेच्या जेवणासह महिन्याला ३५ रुपये मिळत. अत्यंत कमी मोबदल्यात काम करत त्यांनी संघर्षाचे दिवस पाहिले. याच संघर्षातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार मिळाला.
 

नाना मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे विद्यार्थी होते. चित्रकलेसोबतच त्यांना स्केचेस काढण्याची आवड होती. गुन्हेगारांच्या वर्णनावरून पोलिसांसाठी रेखाचित्रे तयार करून देण्याचे कामही त्यांनी केले. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी त्यांनी जाहिरात क्षेत्रातही काम केले. कॉलेजच्या काळात नाटकांमध्ये काम करताना त्यांच्यातील अभिनेता घडत गेला. विशेष म्हणजे अभिनयाचा मार्ग त्यांनी ठरवून निवडला नव्हता. एका नाटकाची रिहर्सल पाहण्यासाठी गेले असताना त्यांना अभिनयाची संधी मिळाली आणि तिथून त्यांच्या रंगभूमीवरील प्रवासाला सुरुवात झाली.
 

१९७८ मध्ये ‘गमन’ या चित्रपटातून नाना पाटेकर यांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. या चित्रपटातील त्यांची भूमिका छोटी होती. त्यानंतर तब्बल आठ वर्षे मिळेल त्या भूमिका स्वीकारत त्यांनी संघर्ष सुरू ठेवला. मात्र, म्हणतात ना, ‘भगवान के घर देर है, अंधेर नहीं!’ संघर्षाच्या याच काळात त्यांना ‘हमीदाबाईची कोठी’ या गाजलेल्या नाटकात काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांच्या अभिनयाला खरी ओळख मिळू लागली. त्यानंतर नानांच्या कारकिर्दीची गाडी वेगाने पुढे धावू लागली.
 

‘माफीचा साक्षीदार’ या मराठी चित्रपटातील नानांचा अभिनय विशेष गाजला. या चित्रपटाची हिंदी आवृत्ती ‘फांसी का फंदा’ या नावाने तयार करण्यात आली. पुढे ‘मोहरे’ आणि ‘सलाम बॉम्बे’ या चित्रपटांमधील भूमिकांमुळे हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांच्यासाठी खलनायकी भूमिकांचे दरवाजे खुले झाले. प्रसिद्ध अभिनेते राज बब्बर यांच्या प्रमुख भूमिकेतील ‘आज की आवाज’मध्ये नानांनी सहनायकाची भूमिका साकारली. चित्रपटाला अपेक्षित यश मिळाले नसले, तरी नानांच्या अभिनयाचे कौतुक झाले.
 

१९८६ मध्ये आलेला एन. चंद्रा दिग्दर्शित ‘अंकुश’ हा नानांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरला. या चित्रपटात त्यांनी बेरोजगारीमुळे त्रस्त, मात्र सरळमार्गी युवकाची भूमिका साकारली. या भूमिकेने नानांना वेगळी ओळख मिळवून दिली आणि त्यांचा दमदार अभिनेता म्हणून प्रवास सुरू झाला.
 

१९८९ मध्ये ‘परिंदा’मधील खलनायकाच्या भूमिकेसाठी नानांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर १९९२ मध्ये आलेल्या ‘तिरंगा’ने त्यांना मुख्य अभिनेता म्हणून मोठे यश मिळवून दिले. याच वर्षी ‘अंगार’मधील खलनायकी भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट खलनायकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. तर १९९४ मध्ये ‘क्रांतिवीर’मधील दमदार अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. अशाप्रकारे अभिनेता, सहाय्यक अभिनेता आणि खलनायक या तिन्ही श्रेणींमध्ये फिल्मफेअर पुरस्कार मिळवून नानांनी आपल्या अष्टपैलू अभिनयाची प्रचिती दिली.
 

अभिनयासोबतच नानांनी दिग्दर्शनातही पाऊल ठेवले. ‘प्रहार : द फायनल अटॅक’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट. या चित्रपटात त्यांनी कमांडो अधिकाऱ्याची भूमिका साकारली. भूमिका वास्तवदर्शी व्हावी यासाठी त्यांनी पुण्यात जवळपास तीन महिने लष्करी प्रशिक्षण घेतले आणि काही काळ सैनिकांसोबत राहून त्यांचे जीवन जवळून अनुभवले. पडद्यावरची भूमिका केवळ अभिनयापुरती मर्यादित न ठेवता ती प्रत्यक्ष जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या नानांच्या या मेहनतीमुळे ‘प्रहार’मधील त्यांची भूमिका विशेष गाजली. सैनिकांसोबतच्या वास्तववादी प्रशिक्षणामुळे आणि त्यांच्या धाडसी व्यक्तिमत्त्वामुळे त्यांना ‘कॅप्टन’ म्हणूनही सन्मानित करण्यात आले. संघर्षाच्या काळात मिळालेल्या छोट्या भूमिकांपासून सुरुवात करून आपल्या अभिनयाच्या जोरावर नानांनी हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचे अढळ स्थान निर्माण केले.
 

नाना पाटेकर यांनी केवळ खलनायकी भूमिका गाजवल्या नाहीत, तर नायक, सहनायक, ॲक्शन हिरो आणि चरित्र अभिनेता म्हणूनही आपल्या अभिनयाची ताकद सिद्ध केली. ‘अंधायुद्ध’, ‘परिंदा’, ‘अंगार’, ‘तिरंगा’, ‘क्रांतिवीर’, ‘वजूद’, ‘अब तक छप्पन’, ‘अटॅक ऑफ २६/११’, ‘गुलाम-ए-मुस्तफा’, ‘यशवंत’, ‘खामोशी’, ‘अपहरण’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहिल्या. ‘अपहरण’मधील भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट खलनायकाचा फिल्मफेअर पुरस्कार आणि स्टार स्क्रीन पुरस्कार मिळाला. तर ‘अब तक छप्पन’मधील दमदार अभिनयासाठी बंगाल फिल्म जर्नलिस्ट्स असोसिएशनचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.
 

नानांच्या अभिनयाची खरी ताकद त्यांच्या संवादफेकीत आणि देहबोलीत होती. एखादा संवाद बोलताना आवाजातील चढ-उतार, चेहऱ्यावर उमटणारे भाव, नजरेतील तीव्रता आणि संताप व्यक्त करण्याची त्यांची शैली यामुळे त्यांची प्रत्येक भूमिका जिवंत वाटत असे. पडद्यावर त्यांचा राग असो, वेदना असो किंवा आक्रमकपणा—तो केवळ अभिनय न वाटता प्रत्यक्ष अनुभव असल्यासारखा जाणवत असे.
 

मात्र, गंभीर आणि आक्रमक भूमिका करणाऱ्या नानांचा एक वेगळाच चेहरा ‘वेलकम’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आला. ‘उदय शेट्टी’ या भूमिकेत त्यांनी विनोदाची अशी अफलातून फोडणी दिली की, प्रेक्षकांना खळखळून हसवणारा नाना त्यांच्या मनात घर करून गेला. अनिल कपूर यांच्या ‘मजनू भाई’सोबतची त्यांची जोडी विशेष गाजली. दोघांच्या संवादफेकीपासून देहबोलीपर्यंत प्रत्येक प्रसंगाला हास्याची किनार मिळाली.
 

‘वेलकम’मधील नाना म्हणजे पडद्यावरचा तोच दमदार अभिनेता, पण एका वेगळ्या अंदाजात. गंभीर भूमिका पाहून ज्यांच्या अभिनयाची दहशत वाटायची, त्याच नानांनी ‘उदय शेट्टी’च्या भूमिकेत प्रेक्षकांना मनमुराद हसवले. चित्रपट कितीही वेळा पाहिला तरी त्यांच्या प्रसंगांवर हसू आवरत नाही, हीच त्यांच्या अभिनयाची ताकद. ‘वेलकम’ आणि त्यानंतर ‘वेलकम बॅक’मधून नानांनी आपण केवळ गंभीर किंवा खलनायकी भूमिका करणारे अभिनेते नसून विनोदावरही तितक्याच ताकदीने राज्य करू शकतो, हे सिद्ध केले.
 

म्हणूनच नाना पाटेकर यांचा अभिनय एका चौकटीत कधीच बसला नाही. रौद्र भूमिका असो, भावनिक व्यक्तिरेखा असो किंवा प्रेक्षकांना पोट धरून हसवणारा ‘उदय शेट्टी’ असो—नाना प्रत्येक भूमिकेत स्वतःची एक वेगळी छाप सोडून गेले.
 

मराठी चित्रपटसृष्टीतही नाना पाटेकर यांनी आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटवली. ‘माफीचा साक्षीदार’, ‘पक पक पकाक’, ‘देऊळ’, ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे : द रिअल हीरो’, ‘आपला माणूस’ आणि ‘नटसम्राट’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. प्रत्येक भूमिकेत त्यांनी व्यक्तिरेखेला केवळ पडद्यावर साकारले नाही, तर ती अक्षरशः जगली.
 

महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘नटसम्राट’ हा त्यांच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरला. या चित्रपटात नानांनी साकारलेला नटसम्राट गणपतराव बेलवलकर आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे. संवादफेक, हावभाव, आवाजातील चढ-उतार आणि भावनांचा विलक्षण आविष्कार यामुळे ही भूमिका पाहताना अंगावर शहारे येतात आणि डोळ्यांत नकळत अश्रू तरळतात.
 

गणपतराव बेलवलकरांच्या सुख-दुःखाचा, उतारवयातील एकटेपणाचा आणि कलाकार म्हणून झालेल्या उपेक्षेचा प्रवास नानांनी इतक्या ताकदीने साकारला की पडद्यावरील व्यक्तिरेखा आणि नाना पाटेकर यांच्यातील फरकच क्षणभर जाणवत नाही. ‘नटसम्राट’ने त्यांच्या अभिनयाला नवी उंची दिली आणि ‘अभिनेते नाना पाटेकर’ ही ओळख ‘नटसम्राट नाना पाटेकर’ अशी अधिक ठळक केली.
 

नाना पाटेकर यांच्या अभिनयाच्या प्रवासाइतकेच त्यांच्या मैत्रीचे किस्सेही मनाला भिडणारे आहेत. पुण्यात कामाच्या शोधात असताना नानांनी संघर्षाचे दिवस पाहिले. उदरनिर्वाहासाठी रस्त्यावर पांढरे पट्टे रंगवण्याचे कामही त्यांनी केले. मोबदला कमी होता; मात्र जिद्द आणि मेहनत मोठी होती. हळूहळू रंगभूमीवर काम मिळू लागले आणि त्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली.
 

याच काळात ‘हमीदाबाईची कोठी’ या नाटकाच्या निमित्ताने नाना पाटेकर आणि ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची मैत्री झाली. दोघे अल्पावधीतच जिवलग मित्र बनले. त्यावेळी अशोक सराफ यांना नाटकासाठी २५० रुपये मिळत, तर नानांना केवळ ५० रुपये मानधन मिळायचे. नानांची आर्थिक परिस्थिती अशोक सराफ यांना चांगलीच माहिती होती. त्यामुळे मित्र म्हणून ते नानांना शक्य तितकी मदत करत.
 

नाटकाच्या प्रयोगापूर्वी किंवा प्रयोगानंतर कलाकार मंडळी पत्ते खेळत असत. त्यावेळी अशोक सराफ मुद्दाम नानांकडून हरायचे आणि नानांच्या हातात १०-२० रुपये यायचे. नानांना हे समजत असे, पण त्या पैशांची गरज असल्याने तेही मित्राने केलेली ही मदत स्वीकारायचे.
 

या मैत्रीचा आणखी एक गोड किस्सा म्हणजे नाना अनेकदा अशोक सराफ यांचे पाय चेपत आणि डोक्याला तेल लावून चंपी करत. चंपी झाल्यानंतर अशोक सराफ नानांच्या हातावर पाच रुपये ठेवायचे. नाना तेही तितक्याच सहजतेने स्वीकारायचे. काळ बदलला, नाना मोठे अभिनेते झाले, दोघांची कारकीर्दही मोठी झाली; मात्र त्यांच्या मैत्रीतला हा साधेपणा कधीच बदलला नाही.
 

आजही नाना अशोक सराफ यांची चंपी करतात आणि मामा त्यांना पैसे देत म्हणतात, “नान्या, ठेव... महागाई वाढली आहे!” या एका छोट्याशा प्रसंगात त्यांच्या मैत्रीतील जिव्हाळा, विनोद आणि आपलेपणा दिसून येतो. अशोक सराफ यांनी संघर्षाच्या काळात केलेली मदत नाना कधीच विसरले नाहीत. मोठे झाल्यानंतरही जुन्या मित्रांप्रती कृतज्ञता आणि आपुलकी जपणारा नाना हा केवळ पडद्यावरचा मोठा अभिनेता नव्हता, तर नात्यांना मनापासून जपणारा माणूस होता.
 

सामाजिक कार्यातही नाना ‘देवमाणूस’ ठरले, अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या साथीने नाना पाटेकर यांनी ‘नाम फाऊंडेशन’च्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदतीचा हात दिला. शेतकऱ्यांच्या पत्नींना आर्थिक मदत करण्यासोबतच शिलाई मशीनचे वाटप करून त्यांना स्वावलंबी करण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. अनेक गरजू कुटुंबांना मदत करताना त्यांनी काही गावांच्या विकासाची जबाबदारीही स्वीकारली.
 

नाना केवळ पडद्यावरचे अभिनेते नव्हते, तर समाजाप्रती आपली जबाबदारी जपणारे संवेदनशील व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या दानशूर स्वभावाची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. त्यांना मिळालेल्या राज कपूर पुरस्काराची १० लाख रुपयांची रक्कमही त्यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दिली. सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या या कार्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला वेगळीच उंची मिळाली. अभिनय क्षेत्रातील योगदानासाठी ‘पद्मश्री’सह अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला.
 

नानांनी पडद्यावरील आयुष्य असो किंवा खरे आयुष्य, ते नेहमीच दिलखुलासपणे आणि मनमोकळेपणाने जगले. माणूस कितीही मोठा झाला, कितीही प्रसिद्धी मिळाली, तरी त्याची नाळ मातीशी जोडलेली असावी, या विचारांवर ते आयुष्यभर ठाम राहिले. म्हणूनच प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचल्यानंतरही त्यांनी शेती, साधेपणा आणि गावाशी असलेलं नातं कधीच सोडलं नाही.
 

त्यांच्याच एका गाजलेल्या डायलॉगमध्ये म्हणायचं झालं तर, “भगवान का दिया हुआ सब कुछ है... दौलत है, शोहरत है, इज्जत है...” शून्यातून स्वतःचं विश्व उभं करणाऱ्या, अभिनयाच्या आभाळाएवढ्या कर्तृत्वाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या ‘नटसम्राटा’ला भावपूर्ण श्रद्धांजली!




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर