‘फ्लायदुबई एअरलाईन्स’च्या दुबईहून तेल अवीवला जाणार्या विमानाचा ‘९/११’सारखा घातपात घडविण्याचा प्रकार, ही केवळ इस्रायलसाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी धोक्याची घंटा. या फसलेल्या हवाई दहशतवादी हल्ल्यातून हवाई सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून, त्याची गांभीर्याने दखल घेऊन उपाययोजना करणे हे क्रमप्राप्तच.
इस्रायलमध्ये निवडणुका अवघ्या चार आठवड्यांवर आल्या असताना, दि. ३० सप्टेंबर रोजी ‘फ्लायदुबई एअरलाईन्स’चे दुबईहू्न तेल अवीवकडे निघालेल्या विमानाचे अपहरण करण्याचा प्रयत्न निष्फळ झाला. विमानाचे मुख्य वैमानिक कॅप्टन स्मित मच्छार यांनी प्राणांशी झुंज देत असतानाही प्रसंगावधान राखून ‘कॉकपिट’चा दरवाजा उघडला. व्यवसायाने प्लंबर असलेल्या यानिव हायुन यांनी कॉकपिटमध्ये शिरून विमान आदळवण्याचा प्रयत्न करणार्या सहवैमानिक हमाम अल-हमामीला पकडले. विमान चालवण्याचे कोणतेही प्रशिक्षण नसताना केवळ टीव्हीवर पाहिल्यामुळे जमिनीकडे आवाजाच्या वेगाने झेपावणारे आणि सुमारे साडेसतरा हजार फूट खाली आलेले विमान स्थिर करण्यात यश मिळवले. दंतवैद्य डॉ. शोटा मुसाएव यांनी शुद्ध हरपून कोमामध्ये जात असलेल्या कॅप्टन स्मितना विमान उतरेपर्यंत शुद्धीवर ठेवले. सहप्रवाशांनी इअरफोनच्या वायरच्या मदतीने सहवैमानिकाला जेरबंद केले आणि योगायोगाने त्याच विमानातून प्रवास करणार्या दोन राखीव वैमानिकांच्या मदतीने सौदी अरबमधील ताबुक येथील ‘प्रिन्स सुलतान अल अब्दुल अझीझ’ विमानतळावर उतरवले. हवाई उड्डयन क्षेत्रातील हा मोठा चमत्कार समजण्यात येतो. यातील एकही गोष्ट काही सेकंद उशिरा झाली असती, तर विमानातील सर्वच्या सर्व म्हणजे, १७४ प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले असते.
कॅप्टन स्मित भारताप्रमाणे इस्रायलमध्येही ‘महानायक’ बनले असून, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी त्यांच्याशी व्हिडिओद्वारे संवाद साधत असताना, त्यांना इस्रायलच्या पुढील स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींसह इस्रायलची स्वातंत्र्यज्योत प्रज्वलित करण्यासाठी निमंत्रित केले. हा सन्मान केवळ इस्रायली नागरिकांसाठी राखीव असतो. दुबईचे युवराज शेख हमदान अल महंमद अल रशिद अल मकतूम यांनीही रुग्णालयात कॅप्टन स्मितची भेट घेत असताना, त्यांच्या कपाळाचे चुंबन घेऊन आपला आदर व्यक्त केला. जर हमाम अल-हमामी आपल्या उद्दिष्टात यशस्वी झाला असता आणि १४०हून अधिक इस्रायली नागरिकांसह १७४ प्रवाशांचे प्राण गेले असते, तर इस्रायलला दहशतवादाविरोधातील आपले युद्ध आणखी तीव्र करावे लागले असते. इस्रायल आणि संयुक्त अरब अमिरातींमधील संबंधांवर परिणाम झाले असते. इस्लामिक प्रभावाखालील पाश्चात्त्य माध्यमांनी कॅप्टन स्मितना हल्लेखोर ठरवून हिंदू दहशतवादाच्या नावाने छाती पिटण्यास प्रारंभ केला असता.
तपासात स्पष्ट झाले की, इंटरनेटच्या माध्यमातून इस्लामिक मूलतत्त्ववादी बनलेल्या सहवैमानिक हमाम अल-हमामीची तेल अवीवच्या ‘बेन गुरियन’ विमानतळाच्या प्रवासी टर्मिनलवर हे विमान आदळवून जास्तीत जास्त लोकांना मारण्याची योजना होती. यापूर्वी तेल अवीवला विमाने उतरवत असताना, त्याने या भागाचा सखोल अभ्यास केला होता. त्याला माहिती होते की, जर विमान अपहरण होऊन नागरी वस्तीकडे झेपावत असेल, तर इस्रायल लढाऊ विमानांच्या मदतीने असे प्रवासी विमान पाडतो. यात विमानातील निष्पाप प्रवासी मरणार असले, तरी इस्रायलमधील अन्य नागरिकांचे प्राण वाचणार असल्याने असे करण्याची परवानगी ‘९/११’च्या दहशतवादी हल्ल्यानंतर इस्रायली सैन्यदलांना मिळाली आहे. त्या दिवशीही इस्रायलची दोन लढाऊ विमाने हवेत झेपावली होती. पण, कॅप्टन स्मितच्या शौर्यामुळे ती वेळ आली नाही.
हमाम अल-हमामीला तेल अवीवला जाणारे विमान चालवायची परवानगी कशी मिळाली, याची सध्या चौकशी होत आहे. इस्रायल आणि संयुक्त अरब अमिरातींमध्ये झालेल्या करारानुसार, अमिरातीच्या इस्रायलला जाणार्या विमानांमध्ये केवळ इस्रायलशी राजनयिक संबंध असणार्या देशांचेच वैमानिक असतात. एकेकाळी ओमान आणि इस्रायलमध्ये अनौपचारिक संबंध असले आणि यापूर्वी एकदा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू ओमानला गेले असले, तरीही दोन्ही देशांमध्ये राजनयिक संबंध नाहीत. हमाम अल-हमामीची आई सीरियन असून, वडील ओमानी आहेत. त्याचा जन्म अमिरातींतील असला, तरी ऑस्ट्रेलियामध्ये उच्चशिक्षण घेतल्यानंतर तो सीरियात असताना इस्लामिक मूलतत्त्ववादाच्या प्रभावाखाली आला. त्याच्या स्वभावातील बदलामुळे तो सुरुवातीला काम करत असलेल्या ‘ओमान एअर’ने त्याला सहवैमानिक पदावरून काढून कार्यालयात काम दिले. ‘फ्लायदुबई’मध्ये नोकरी करताना त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली असली, तरी त्याच्या इस्लामिक मूलतत्त्ववादी विचारसरणीकडे दुर्लक्ष झाले. एक ओमानी वैमानिक इस्रायलमध्ये येतो, हे इस्रायली सुरक्षा यंत्रणांच्या का लक्षात आले नाही, यावरून इस्रायलमधील राजकारण तापले आहे. विरोधी पक्षांनी त्यासाठी नेतान्याहूंच्या सरकारला जबाबदार धरले असून, या घटनेचा दि. ७ ऑक्टोबर २०२३चा दहशतवादी हल्ला रोखण्यात आलेल्या अपयशाशी संबंध जोडला आहे. या मुद्द्याचा मतदानावर कसा परिणाम होतो, हे आणखी तीन आठवड्यांत स्पष्ट होणार असले; तरी हवाई सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
‘९/११’च्या दहशतवादी हल्ल्यामध्ये हल्लेखोरांना विमान चालवायचे प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यांनी आपल्यासोबत आणलेल्या छोट्या चाकू आणि शस्त्रांनी विमानातील कर्मचार्यांवर हल्ला करून विमानाचा ताबा घेतला. भविष्यात दहशतवाद्यांनी विमानाचा ताबा घेऊ नये, यासाठी त्यानंतर विमानाच्या संरचनेत बदल करून ‘कॉकपिट’चे दार केवळ आतून उघडता येईल, अशी तजवीज करण्यात आली. भविष्यात वैमानिकच दहशतवादी हल्ला करण्याची योजना आखेल, असे त्यांना वाटले नसावे.
‘फ्लायदुबई’च्या त्या विमानात सहवैमानिक हमाम अल-हमामी विमान इस्रायलजवळ पोहोचल्यानंतर प्रार्थनेसाठी म्हणून उठला. मुस्लीम धर्मीय वैमानिक ‘कॉकपिट’मध्येच आपापल्या वेळी प्रार्थना करत असल्यामुळे कॅप्टन स्मित यांना संशय आला नाही. त्यांना बेसावध गाठून हमामीने ‘कॉकपिट’मधील आपत्कालीन वापरासाठी असलेली कुर्हाड काढून कॅप्टन स्मितच्या डोक्यावर आणि हातांवर वार केले. ‘कॉकपिट’चा दरवाजा बाहेरून उघडण्याची सोय नसल्यामुळे त्यादिवशी जर कॅप्टन स्मितनी दरवाजा उघडला नसता, तर विमानाचा अपघात अटळ होता.
या घटनेमुळे एकीकडे हवाई सुरक्षेमधील मोठी त्रुटी लक्षात आली असताना, दुसरीकडे ‘खासगीपणा विरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा’ या वादालाही नव्याने तोंड फुटले आहे. ‘लोन वुल्फ’ हल्ल्यामध्ये सहभागी दहशतवाद्याविरुद्ध यापूर्वी कोणताही गुन्हा नसतो. तो कोणत्याही दहशतवादी संघटनेचा सदस्य नसतो. त्याचे औपचारिक प्रशिक्षणही होत नाही. इंटरनेट आणि समाजमाध्यमांमधील विखारी प्रचारामुळे त्याच्या मनावर परिणाम होतो आणि तो आपले प्राण धोक्यात घालून दहशतवादी हल्ला करण्यास तयार होतो. हल्ल्यापूर्वी तो सामान्य माणसांप्रमाणेच वागत असल्याने त्याला पकडणे अवघड असते. त्यामुळे भविष्यात वैमानिकांचे देश आणि धर्मानुसार ‘प्रोफाइलिंग’ होणे आणि त्यांच्यावर सातत्याने नजर ठेवली जाणे, ही सामान्य प्रक्रिया होणार आहे. असा हल्ला केवळ वैमानिकच नाही; तर बस आणि रेल्वे चालक, अणुऊर्जा किंवा अन्य वीज प्रकल्पांमधील नियंत्रण असणारा अधिकारी, पाणीपुरवठा विभागातील पाण्याची गुणवत्ता तपासणारा अधिकारी किंवा शालेय कर्मचारी असा कोणीही करू शकतो. ही समस्या सोडवण्याचा एक समांतर उपायही आहे. ज्या देशांकडून आणि माध्यमांकडून इस्लामिक मूलतत्त्ववादी विचार, तसेच द्वेषभाव समाजात पसरवला जातो, त्यांना उघडे पाडण्याची आवश्यकता आहे. कतारसारखे देश आपण उदारमतवादी असल्याचे चित्र निर्माण करतात; पण प्रत्यक्षात परदेशी विद्यापीठांना दरवर्षी अब्जावधी डॉलरच्या देणग्या देऊन तिथे राजकीय इस्लामचा प्रचार करतात. तरुण पत्रकारांना शिष्यवृत्ती देऊन त्यांना जागतिक वृत्तमाध्यमांत नोकरी दिली जाते आणि आपल्या विचारधारेच्या प्रचारासाठी त्यांचा वापर करतात. अशा देशांचे वास्तव उघडे न पाडल्यास, जग आणखी असुरक्षितच होणार आहे.