मुंबई (PCPNDT Act Maharashtra 2026) : प्रसुतीपूर्व गर्भ लिंग निदान करून स्त्री भ्रृणहत्या करणाऱ्या डॉक्टरांवर कठोर कारवाई होण्यासाठी गर्भधारणा पूर्व व प्रसुतीपूर्व निदानतंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा १९९४ व २००३ मध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. असे गुन्हे करणाऱ्या डॉक्टरांवर लावण्यात येणारे कलम अधिक कठोर करण्यासोबतच, गुन्हेगारांवर मोक्का लावणे, गुन्हे सिद्धता आणि शिक्षा यात बदल करणे आवश्यक असून येत्या हिवाळी अधिवेशनात या कायद्यात सुधारणा विधेयक सादर करण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
गर्भधारणा पूर्व व प्रसुतीपूर्व निदानतंत्रे लिंग निवडीस प्रतिबंध कायदा १९९४ व २००३ च्या कठोर अंलबजावणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कृती दलाची पहिली बैठक मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला कृती दलाच्या अध्यक्षा आ. डॉ. निलम गोऱ्हे, सदस्य आ. मनीषा कायंदे, आ. उमा खापरे, आ. स्नेहा दुबे-पंडीत आणि आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर उपस्थित होते. (PCPNDT Act Maharashtra 2026)
मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, “राज्यस्तरीय कृती दलाचे काम जिल्हा स्तरापर्यंत पोहचवणे आवश्यक आहे. जेणेकरुन जिल्हा स्तरावरून याबाबत तक्रारी प्राप्त होतील. यासाठी समितीचा कालबद्ध कार्यक्रम ठरविण्यात यावा. तसेच या कामासाठी समर्पित अधिकारी आणि कर्मचारी यांचा चमू नेमून देण्यात यावा. नोंदणी नसलेल्या बोगस डॉक्टरांची यादी तयार करून प्रसिद्ध करण्यात यावी जेणेकरून बोगस डॉक्टरांची माहिती नागरिकांना मिळून त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचे काम जनताही करेल. अशा बोगस डॉक्टरांवर कठोर कारवाई करावी,” असे निर्देश त्यांनी दिले.
पोर्टेबल सोनोग्राफी मशीनवर बंदी घालावी
“सध्या बाजारात सोनोग्राफी करण्यासाठी पोर्टेबल मशीन उपलब्ध आहेत. तशा जाहिराती गुगलवर दिसतात यासंदर्भात सर्वेक्षण करुन अशा उत्पादनावर बंदी घालण्यात यावी. शिवाय पशुंसाठी वापरण्यात येणाऱ्या सोनोग्राफी मशीनचा वापर मनुष्यासाठी होतोय का याची शहानिशा करण्यात यावी. जिल्हास्तरीय समित्यांचा आढावा घेण्यासाठी हिवाळी अधिवेशापूर्वी सर्व जिल्ह्यांमध्ये बैठका घेण्यात याव्यात. कायद्याची जनजागृती करणाऱ्यांना अधिक सक्षम व कार्यक्षम करण्यासाठी कार्यशाळा घेण्यात याव्यात,” अशा सूचनाही मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या. (PCPNDT Act Maharashtra 2026)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....