मुंबई (Sachin Kalyanshetti) : हुतात्मा श्रीकांत लिंगायत यांच्या जयंतीनिमित्त केवळ त्यांच्या स्मृतींना उजाळा देणे पुरेसे नसून, त्यांनी हिंदुत्वासाठी दिलेल्या सर्वोच्च बलिदानामागील ज्वलंत विचार समाजाने आत्मसात करणे ही काळाची गरज आहे. हजारो वर्षांच्या परकीय आक्रमणांचा आणि संघर्षाचा इतिहास विसरून चालणार नाही; धर्म आणि देशाच्या रक्षणासाठी हिंदू समाजाने आता अधिक संघटित, सजग आणि सावध राहणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले.
पुण्यातील मंगळवार पेठेत असलेल्या स्वरूपवर्धिनी सभागृहात हुतात्मा श्रीकांत लिंगायत जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते ‘हिंदू सारा एक’ या विषयावर प्रबोधन करत होते. हुतात्मा श्रीकांत लिंगायत मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष आणि माजी खासदार प्रदीप रावत या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, माजी सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांच्यासह विद्यालक्ष्मी लिंगायत, चंद्रकांत लिंगायत, दीपक नागपुरे आणि राजे शिवराय प्रतिष्ठानचे अतुल गोणते उपस्थित होते. (Sachin Kalyanshetti)
उपस्थिताना संबोधित करताना कल्याणशेट्टी म्हणाले की, "संघ परिवाराचा कार्यकर्ता तसेच ‘वंदे मातरम्’ आणि ‘भारत माता की जय’चा जयघोष करणाऱ्या आपल्या एका निष्ठावान कार्यकर्त्याची धर्मांध शक्तींनी निर्घृण हत्या केली, ही भळभळती जखम हिंदू समाजाने कधीही विसरता कामा नये. आज राज्यात आणि केंद्रात हिंदुत्ववादी सरकार आहे, लोकशाही आणि भक्कम संरक्षण व्यवस्थेमुळे आपण सुरक्षित आहोत असे वरवर वाटत असले, तरी इतिहासाचे स्मरण ठेवणे नितांत आवश्यक आहे." (Sachin Kalyanshetti)
छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा संघर्षमय इतिहास आपली कायमस्वरूपी प्रेरणा असल्याचे सांगत पुढे ते म्हणाले, "हिंदू संस्कृती ‘वसुधैव कुटुंबकम्’ मानणारी आणि सर्वांना सामावून घेणारी आहे. मात्र, याच समाजात जाणीवपूर्वक जातीभेदाची विषवल्ली पेरून फूट पाडण्याचे षडयंत्र रचले जात आहे. हिंदू धर्म हा प्रवाही आणि बदल स्वीकारणारा आहे; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा सर्वाधिक सन्मान आणि रक्षण हिंदू समाजच करत आला आहे. त्यामुळे हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी हिंदू समाजाने एकसंध राहिले पाहिजे." (Sachin Kalyanshetti)
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदीप रावत यांनी यावेळी एक अभिनव आणि राष्ट्रव्यापी विचार मांडला. ते म्हणाले, "पितृपंधरवड्यात केवळ कौटुंबिक पूर्वजांचे नव्हे, तर धर्म, समाज आणि राष्ट्रासाठी प्राण वेचणाऱ्या ज्ञात-अज्ञात राष्ट्रपुरुषांच्या स्मरणार्थ देशभर 'राष्ट्रीय पितर स्मरण दिन' साजरा करण्याची परंपरा निर्माण व्हायला हवी. आजचा अखंड आणि सुरक्षित भारत हा हजारो वर्षांच्या हिंदू समाजाच्या संघर्ष आणि पूर्वजांच्या बलिदानाच्या पायावर उभा आहे. लोकमान्य टिळक आणि आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांनी जसा उत्सव आणि शाखांच्या माध्यमातून समाज संघटित केला, तसाच हुतात्मा श्रीकांत लिंगायत यांचे जीवन हे हिंदू ऐक्याचे प्रतीक मानून आपण ‘हिंदू सारा एक’ हा मंत्र प्रत्यक्षात आणला पाहिजे." (Sachin Kalyanshetti)
माजी मंत्री दिलीप कांबळे यांनी पुण्यातील पूर्व भागात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत श्रीकांत लिंगायत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हिंदुत्वाचा विचार तळागाळापर्यंत रुजविण्यासाठी केलेल्या संघर्षाला उजाळा दिला. "हिंदू समाजावरील संकटे अद्याप संपलेली नाहीत. १९२५ साली सुरू झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारांमुळे आणि लाखो स्वयंसेवकांच्या तपस्येमुळे आजचे हे अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे," असे ते म्हणाले. (Sachin Kalyanshetti)
रा. स्व. संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नानासाहेब जाधव यांनी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदानाचा आणि काश्मीरमधील कलम ३७० रद्द झाल्याच्या ऐतिहासिक घटनेचा संदर्भ देत, हुतात्मा लिंगायत यांचे बलिदान व्यर्थ गेले नसल्याची ग्वाही दिली व समाजाला सजग राहण्याचे आवाहन केले. (Sachin Kalyanshetti)
प्रारंभी भारतमाता, छत्रपती शिवराय आणि हुतात्मा श्रीकांत लिंगायत यांच्या प्रतिमांचे भावपूर्ण पूजन करण्यात आले. सचिन कुलकर्णी यांनी ‘हिंदू सारा एक’ हे स्फूर्तीगीत सादर केले. यावेळी राष्ट्रकार्यासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांना हुतात्मा श्रीकांत लिंगायत यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ‘हिंदू युवा प्रबोधिनी सन्मान’ प्रदान करण्यात आला. (Sachin Kalyanshetti)
स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान, कै. श्रीकांत लिंगायत मेमोरियल ट्रस्ट, विवेक विचार मंच आणि राजे शिवराय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रेरणादायी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे स्वागत प्यारेलाल चौधरी, सन्मानार्थींचा परिचय निलेश धायरकर, सूत्रसंचालन कल्याणी रणसिंग तर आभार प्रदर्शन दिनेश होले यांनी केले. (Sachin Kalyanshetti)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक