मुंबई (Chief Minister Shaurya Medal): कर्तव्य बजावताना जोखीम पत्करून साहसी कामगिरी करणाऱ्या पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यापुढे ‘मुख्यमंत्री शौर्य पदक’ देऊन गौरवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री शौर्य पदक विजेत्यांना रोख ५० हजार रुपये, पदक तसेच प्रशस्तीपत्र मिळणार आहे. मरणोत्तरही हे पदक देण्याची तरतुद करण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला. (Chief Minister Shaurya Medal)
दरवर्षी १ मेच्या म्हणजे महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री शौर्य पदकांची घोषणा करण्यात येणार आहे. दरवर्षी शौर्य पदकांची निश्चित अशी संख्या राहणार नाही. तर ती राज्यभरातील क्षेत्रीय स्तरावरील कामगिरींबाबतचे अहवाल आणि येणाऱ्या प्रस्तावांच्या अधीन राहून जाहीर केली जातील. पोलीस दलातील अधिकारी, अंमलदारांच्या धाडसाचे सन्मान करण्यासाठी केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडून दरवर्षी शौर्य, राष्ट्रपती शौर्य आणि अशोकचक्र, किर्तीचक्र अशी विविध पदके दरवर्षी २६ जानेवारी व १५ ऑगस्ट या दिवशी जाहीर केली जातात. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात मुख्यमंत्री शौर्य पदक दिले जाणार आहे.(Chief Minister Shaurya Medal)
या पुरस्कार निवडीसाठी राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली प्रथम निवड समिती असेल. या समितीकडे जिल्हास्तरावरून पोलीस अधीक्षक हे त्या परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याद्वारे, तर पोलीस आयुक्त पोलीस महासंचालकांकडे प्रस्ताव सादर करतील. शासन स्तरावर गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती असेल. त्यानंतर हे प्रस्ताव गृहमंत्री तथा मुख्यमंत्री यांच्याकडे सादर केले जातील. मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री शौर्य पदकासाठी निवड पद्धती, त्यासाठी समितीची रचना आणि अनुषांगिक खर्चाच्या तरतुदीस मंजुरी देण्यात आली.(Chief Minister Shaurya Medal)