‘अपार’ कार्ड नोंदणीत कोकण अव्वल; ९६.८५ टक्के नोंदणीसह सिंधुदुर्ग जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम

    06-Oct-2026
 
APAAR Card Registration Maharashtra 
 
मुंबई (APAAR Card Registration Maharashtra): केंद्र सरकारच्या ‘एक देश, एक विद्यार्थी ओळख’ या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात शालेय विद्यार्थ्यांची ‘अपार’ कार्ड नोंदणी अंतिम टप्प्यात आली आहे . शिक्षण विभागाच्या ताज्या अहवालानुसार, राज्यातील सुमारे ८७.४१% विद्यार्थ्यांचे ‘अपार’ आयडी यशस्वीरित्या तयार झाले आहेत . या डिजिटल मोहिमेत ९६.८५% नोंदणी पूर्ण करून सिंधुदुर्ग जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रात अव्वल ठरला आहे . सिंधुदुर्ग पाठोपाठ रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांनीही नोंदणीचा ९० टक्क्यांचा टप्पा ओलांडला असून संपूर्ण कोकण विभागाने राज्यात अग्रस्थान पटकावले आहे.
 
याउलट, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुविधा असूनही मुंबई उपनगर जिल्हा या यादीत सर्वात पिछाडीवर असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे . मुंबईतील इंग्रजी माध्यमांच्या शाळा, आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या शाळा आणि काही खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये या कार्डबाबत उदासीनता दिसून आली आहे. याशिवाय, अनेक विद्यार्थ्यांच्या आधार कार्डवरील नावांमध्ये असलेल्या चुका, पालकांच्या मोबाईल क्रमांकाची अनुपलब्धता आणि सर्व्हर डाऊन असण्याच्या तांत्रिक अडचणींमुळे मुंबई उपनगरातील नोंदणी रखडल्याचे शाळा प्रशासनांकडून सांगण्यात येत आहे. (APAAR Card Registration Maharashtra)
 
‘अपार’ कार्ड म्हणजे काय आणि ते का महत्त्वाचे आहे?
 
‘अपार’ कार्ड हे विद्यार्थ्यांसाठी आधार कार्डसारखाच एक १२ अंकी विशेष डिजिटल ओळख क्रमांक आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत हे कार्ड तयार केले जात आहे. या कार्डचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांचा संपूर्ण शैक्षणिक प्रवास डिजिटल लॉकरमध्ये सुरक्षित ठेवणे हा आहे.
 
१.शैक्षणिक प्रगतीचे रेकॉर्ड: विद्यार्थ्यांचे गुणपत्रक, क्रीडा क्षेत्रातील प्रमाणपत्रे, शिष्यवृत्ती आणि इतर शैक्षणिक यश या कार्डशी लिंक केले जाईल.
 
२. शाळा बदलणे सोपे होणार: जर एखाद्या विद्यार्थ्याला एका राज्यातून दुसर्‍या राज्यात किंवा एका शाळेतून दुसर्‍या शाळेत प्रवेश घ्यायचा असेल, तर त्याला कागदपत्रे गोळा करण्याची गरज भासणार नाही. केवळ ‘अपार’ आयडी टाकून त्याचा संपूर्ण डेटा नवीन शाळेला उपलब्ध होईल.
 
३. गळती रोखण्यास मदत: या डिजिटल प्रणालीमुळे बोगस प्रवेशांना आळा बसेल आणि शाळा सोडणार्‍या (ॄअ‍ॅेर्-िेीीं) विद्यार्थ्यांचा अचूक मागोवा घेता येईल. (APAAR Card Registration Maharashtra)
 
शिक्षण विभागाचे कडक निर्देश
 
राज्यातील उर्वरित १३ टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी रखडल्याने शिक्षण विभागाने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. ऑक्टोबर अखेरपर्यंत राज्यातील १०० टक्के विद्यार्थ्यांचे ‘अपार’ कार्ड तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ज्या शाळा या कामात हलगर्जीपणा करतील, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. मुंबई उपनगरातील वेग वाढवण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्याचे आदेश शिक्षण संचालनालयाने स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. पालकांनीही आपल्या पाल्याच्या आधार कार्डमधील त्रुटी तातडीने सुधारून शाळेला सहकार्य करावे, असे आवाहन शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे. (APAAR Card Registration Maharashtra)
 
 




संबंधित मजकूर