मुंबई (Pravin Darekar CJP Ambedkar Statement) : सीजेपीच्या आंदोलनात चुकीची माहिती देत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा घोर अपमान करण्याचा प्रकार घडल्याने आंबेडकरी आणि राज्यातील जनतेत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे सीजेपीने आंबेडकरी जनतेची आणि महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी भाजपा गटनेते आ. प्रवीण दरेकर यांनी शनिवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सह माध्यम प्रमुख ओमप्रकाश चौहान उपस्थित होते.
सीजेपीचे आंदोलन सपशेल अयशस्वी ठरल्याचे सांगत या विद्रोही आंदोलनाला कोणत्याही प्रकारे प्रतिसाद न दिल्याबद्दल आ. दरेकर यांनी मुंबईकरांना मनापासून धन्यवाद दिले. तसेच हे आंदोलन योग्यप्रकारे हाताळल्याबद्दल मुंबई पोलिसांचे त्यांनी अभिनंदन केले. हे आंदोलन काँग्रेसच्या स्क्रिप्टवर झाले. दीपके हा काँग्रेसचा चेहरा आहे आणि हे आंदोलन काँग्रेस पुरस्कृत आंदोलन होते. मोर्चामध्ये डाव्या विचारसरणीतून आलेले लोक पाहायला मिळाले. आंदोलनाला प्रतिसाद न मिळाल्याने नैराश्य आलेले आणि भांबावलेले दीपके पाहायला मिळाले, असे ते म्हणाले. (Pravin Darekar CJP Ambedkar Statement)
आ. दरेकर पुढे म्हणाले कि, भाजपाचा द्वेष आणि काँग्रेसचे मोठेपण सांगण्यासाठीच हे आंदोलन करण्यात आले. विरोधी पक्षांकडे स्वतःची ताकद दाखविण्यासाठी पुरेसा जनाधार नसल्याने अशा प्रकारच्या आंदोलनांच्या माध्यमातून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सीजेपी ही काँग्रेसची ‘बी टीम’ म्हणून काम करत असल्याचेही आ. दरेकर यांनी नमूद केले. या आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी करण्यात आलेल्या वक्तव्यांवरही त्यांनी जोरदार टीका केली. शाहू, फुले, डॉ. आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील सुसंस्कृत जनतेला ही भूमिका अजिबात आवडली नसल्याचे ते म्हणाले. (Pravin Darekar CJP Ambedkar Statement)
आंदोलन करण्यास कोणाचाही आक्षेप नाही. मात्र आंदोलन पारदर्शक आणि जनतेच्या हितासाठी असले पाहिजे. निवडणूक आयोगावर विश्वास नसेल तर सर्वप्रथम आदित्य ठाकरे आणि महेश सावंत यांनी आमदारकीचे राजीनामे द्यावेत आणि मगच आंदोलनात सहभागी व्हावे. कारण तेही याच निवडणुकीच्या प्रक्रियेतून निवडून आल्याचे आ. दरेकर म्हणाले.
आंदोलनाच्या प्रक्रियेत चुकीची नावे येऊ नयेत, योग्य ती माहिती समोर यावी, यासाठी एसआयआर केले जात असताना कायदेशीर प्रक्रियेबद्दल न बोलता केवळ ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. केवळ संभ्रम निर्माण करण्यासाठी निराधार आरोप करणे, वातावरणात गोंधळ निर्माण करणे आणि असंतोष वाढवून अराजकतेची परिस्थिती निर्माण करण्याचा हा प्रयत्न योग्य नसल्याचेही आ. दरेकर म्हणाले. (Pravin Darekar CJP Ambedkar Statement)