फेसबुकवर बनावट अकाउंट, मुलींना अश्लील मेसेज; आरोपीला न्यायालयाचा दणका! ५ वर्षे सक्तमजुरी अन् ६० हजारांचा दंड

    04-Oct-2026
 
 Fake Facebook Account Minor Girls Case
 
ठाणे (Fake Facebook Account Minor Girls Case) : बनावट फेसबुक अकाउंट तयार करून अल्पवयीन मुलींशी संपर्क साधणे, त्यांना अश्लील संदेश, फोटो आणि व्हिडिओ पाठवून मानसिक त्रास देणे तसेच लैंगिक शोषणाची धमकी देणाऱ्या आरोपीला ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने ५ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांनी मंगेश ईश्वरदास तांबे (२८, रा. उत्तन) याला माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७(अ) अंतर्गत पाच वर्षांची सक्तमजुरी आणि ५० हजार रुपये दंड, तर भादंवि कलम ३५४(अ) अंतर्गत तीन वर्षांची सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंड ठोठावला. दंडाची रक्कम पीडितांना नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
 
‘विद्या’च्या नावाने फेक अकाउंट
 
डिसेंबर २०१७ ते मार्च २०१८ या काळात आरोपीने सोशल मीडियाचा गैरवापर करून हा प्रकार केल्याचे न्यायालयीन प्रकरणातून समोर आले. आरोपीने फेसबुकवर ‘विद्या’ या नावाने बनावट प्रोफाइल तयार केले आणि फिर्यादी तरुणीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. समोरील व्यक्ती मुलगी असल्याचा समज झाल्याने तिने ती स्वीकारली. (Fake Facebook Account Minor Girls Case)
 
मात्र, चॅटिंग सुरू झाल्यानंतर आरोपीने अश्लील फोटो पाठवण्यास सुरुवात केली. संशय आल्याने फिर्यादीने व्हिडिओ कॉल केला असता समोरील व्यक्ती मुलगी नसून पुरुष असल्याचे उघड झाले. त्यानंतर तिने आरोपीचा मोबाइल क्रमांक ब्लॉक केला.
 
नंबर ब्लॉक केल्याचा राग; फिर्यादीच्याच नावाने अकाउंट
 
मोबाइल क्रमांक ब्लॉक केल्याचा राग मनात धरून आरोपीने फिर्यादीच्याच नावाने आणखी एक बनावट फेसबुक अकाउंट तयार केल्याचे तपासात समोर आले. या अकाउंटच्या माध्यमातून त्याने फिर्यादीची चुलत बहीण आणि तिच्या अल्पवयीन मैत्रिणींना अश्लील मेसेज, फोटो आणि व्हिडिओ पाठवण्यास सुरुवात केली. (Fake Facebook Account Minor Girls Case)
 
मुलींना धमकावून त्यांच्यावर दबाव आणण्याचाही प्रयत्न केल्याचा आरोप होता. या प्रकाराला कंटाळून फिर्यादीने सागरी उत्तन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंग, पोक्सो तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
 
नऊ साक्षीदार, डिजिटल पुरावे ठरले महत्त्वाचे
 
या प्रकरणाची सुनावणी ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयात झाली. सरकारी पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील श्रीमती भामरे-पाटील यांनी बाजू मांडली. आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकारी पक्षाने नऊ महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंदवली. साक्षीदारांचे जबाब, डिजिटल पुरावे आणि न्यायालयासमोर सादर करण्यात आलेली कागदपत्रे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले. (Fake Facebook Account Minor Girls Case)
  
न्यायालयीन कामकाजात सरकारी वकिलांना कोर्ट पैरवी पोलिस हवालदार दिलीप सनेर यांनी सहकार्य केले.
 
शिक्षा अशी
 
माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६७(अ) : ५ वर्षे सक्तमजुरी आणि ५० हजार रुपये दंड.
भादंवि कलम ३५४(अ) : ३ वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंड.
दंडाची रक्कम पीडितांना नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश.
५० हजारांचा दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावास. (Fake Facebook Account Minor Girls Case)

 




संबंधित मजकूर