त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar Simhastha Kumbh Mela) : पवित्र कुशावर्त तीर्थ... गोदावरीचे सान्निध्य... वैदिक मंत्रोच्चार, शंखनाद आणि साधू-महंतांच्या उपस्थितीत त्र्यंबकेश्वर येथे शनिवारी सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहणाचा मंगलमय सोहळा संपन्न झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शृंगेरीपीठाचे जगद्गुरू शंकराचार्य विधुशेखर भारती यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. ध्वजारोहण करून सिंहस्थ कुंभमेळा पर्वाचा मंगलारंभ झाला.
मुख्यमंत्री फडणवीस यांचे शनिवारी सकाळी कुशावर्त तीर्थ येथे आगमन झाल्यानंतर त्यांच्या हस्ते उपस्थित साधू-महंतांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर शृंगेरीपीठाचे जगद्गुरू शंकराचार्य विधुशेखर भारती यांचेही यावेळी स्वागत करण्यात आले. सोहळ्याच्या प्रारंभी पवित्र गोदावरीचे विधिवत पूजन करण्यात आले. पुरोहितवृंदांनी मंत्रोच्चारांतून गोदावरीचे स्तवन केले. त्यानंतर संकल्पविधी करण्यात आला. सर्व प्राणिमात्रांना सुख, शांती, समृद्धी आणि कल्याण लाभावे, अशी प्रार्थना करण्यात आली. (Trimbakeshwar Simhastha Kumbh Mela)
गणेशपूजनाने पूजाविधीचा प्रारंभ झाला. सिंहस्थ कुंभमेळ्याचे सर्व धार्मिक विधी आणि आयोजन निर्विघ्नपणे पार पडावे, यासाठी श्रीगणेशाला आवाहन करण्यात आले. पुरोहितवृंदांनी मंत्रोच्चारांतून देवतांचे आवाहन केले. त्यानंतर ध्वजारोहणासाठी देवतांची अनुज्ञा मागण्यात आली. गोदावरी गंगा प्रार्थना आणि सामूहिक प्रार्थनेने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ध्वजस्तंभाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर धर्मध्वज आणि ध्वजपताकेचे विधिवत पूजन झाले. जगद्गुरू शंकराचार्य विधुशेखर भारती यांनीही धर्मध्वजाचे पूजन केले. (Trimbakeshwar Simhastha Kumbh Mela)
धर्मध्वज पूजनानंतर शंखनाद करून ध्वजाची आरती करण्यात आली. त्यानंतर जगद्गुरू शंकराचार्य आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी धर्मध्वजाची प्रदक्षिणा केली. यावेळी भगवान त्र्यंबकेश्वराची प्रार्थना करण्यात आली. पुरोहितवृंदांच्या मंत्रोच्चारांत, शंखनाद आणि धार्मिक जयघोषात धर्मध्वजारोहणाचा सोहळा उत्साहपूर्ण व मंगलमय वातावरणात संपन्न झाला. उपस्थित साधू-महंत आणि भाविकांनी या पवित्र सोहळ्याचा अनुभव घेतला. धर्मध्वजारोहणानंतर पवित्र गोदावरीची आरती करण्यात आली. त्र्यंबकेश्वरच्या धार्मिक परंपरेत विशेष स्थान असलेल्या या धर्मध्वजारोहण सोहळ्याने सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडविले. (Trimbakeshwar Simhastha Kumbh Mela)
या सोहळ्यास आमदार हिरामण खोसकर, त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार, विशेष पोलीस महानिरीक्षक संजय ऐनपुरे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलीस अधीक्षक डॉ. एस. स्वामी, उपविभागीय अधिकारी पवनदत्ता, तहसीलदार गणेश जाधव, मुख्याधिकारी गोविंद जाधव, अमोल चौधरी यांच्यासह विविध संत महंत उपस्थित होते. (Trimbakeshwar Simhastha Kumbh Mela)