मुंबई : कालपासून शिवसेना आणि भाजप महायुतीबद्दल सुरू असलेल्या चर्चेत पुण्यातील माजी आमदार ज्यांनी १२ पक्ष फिरून शिवसेनेत प्रवेश केला असा माकडछाप व्यक्ती भाजप, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्यावर टीका करत आहे. ज्यांनी आपला माकडछाप ब्रँड पुणेकरांना दाखवला त्यांना लोकसभा आणि विधानसभेला पुणेकरांनी घरी बसवले. १२ पक्ष फिरूनही ज्यांना आपले करिअर घडवता आले नाही त्यांनी भाजपला शहाणपणा शिकवू नये, अशा शब्दात भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांच्यावर टीका केली. (Navnath Ban Ravindra Dhangekar Controversy)
शुक्रवारी, पत्रकार परिषदेत बोलताना नवनाथ बन म्हणाले की, “ज्यांचा ब्रँडच माकडछाप आहे, त्याची अवस्था 'माकडाच्या हाती कोलीत' अशी झाली आहे. माझ्या पाठीमागे कमळ आहे, पण धंगेकरांच्या पाठीमागे पंजाचा हात होता, पूर्वी त्यांच्या पाठीमागे रेल्वे इंजिन होते, आता धंगेकरांच्या पाठीमागे धनुष्यबाण आहे. उद्या पुन्हा त्यांच्यामागे पाठीमागे शिट्टी येईल, कारण धंगेकरांना एकाही पक्षाने किंमत दिली नव्हती. सुरुवातीला मनसे, काँग्रेस, शिवसेना, मग कधी उबाठा तर कधी आणखी कुठे जाल? मी तुमच्यासारखे १२ पक्ष बदललेले नाहीत. १२ घरे फिरून आपले करिअर सेट करण्यासाठी मी इथे आलेलो नाही. त्यामुळे माकडछाप व्यक्तींना फार महत्त्व देऊ नये.” (Navnath Ban Ravindra Dhangekar Controversy)
ते पुढे म्हणाले की, “महायुती आलबेल राहावी, हा आमचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या तिन्ही नेत्यांनी महायुती वाढवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. परंतू, त्यांचे काही खालचे कच्चेबच्चे महायुतीत दरार निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतील, भाजपाच्या उमेदवारालाच पाडण्याचा प्रयत्न करत असतील तर भाजपाचा एक साधा कार्यकर्ता म्हणून मला जे वाटले, ते मी त्यांना विचारले. त्यांनी उत्तर द्यावे. तुमचा पदाधिकारी समाजमाध्यमांवर पोस्ट टाकत असताना त्याबद्दल पक्षाची भूमिका आहे की नाही, याचे साधे उत्तर देणे अपेक्षित आहे.” (Navnath Ban Ravindra Dhangekar Controversy)
झारीतील शुक्राचाऱ्यांना वेळीच रोखले पाहिजे
“अमरावतीतील बंडखोरांना आम्ही एक-दोन नाही तर तब्बल सहा वर्षांसाठी निलंबित केले. आता माझा बच्चू कडूंना सवाल आहे की, अमरावतीमध्ये आम्ही कारवाई केली, तशी कारवाई तुम्ही पुण्यामध्ये महायुतीविरोधात काम करणाऱ्यांवर करणार आहात का? छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीच्या विरोधात काम करणाऱ्यांवर कारवाई करणार आहात का? कारण ते उघडपणे मान्य करतात की, होय, आम्ही महायुतीच्या विरोधात काम केले. मग अशांवर कारवाई होणार आहे की नाही? कारण महायुती टिकवायची असेल तर झारीतील शुक्राचाऱ्यांना वेळीच रोखले पाहिजे. तर महायुती अभेद्य राहील,” असेही ते म्हणाले. (Navnath Ban Ravindra Dhangekar Controversy)
धंगेकरांची भूमिका शिवसेनेची आहे का?
“मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाब विचारला नाही किंवा त्यांच्यावर टीका केली नाही. फक्त रवींद्र धंगेकर बोलतात ती भूमिका शिवसेनेची आहे का? अब्दुल सत्तार बोलतात, ती भूमिका शिवसेनेची आहे का? या प्रश्नाचे साधे, सरळ आणि सोपे उत्तर शिवसेनेकडून अपेक्षित आहे. काल भाजपा उमेदवाराबद्दल रवींद्र धंगेकरांनी खंडणीखोरांपासून इतर अनेक अपशब्दांचा वापर केला. या शब्दांशी एकनाथजी शिंदे, शिवसेनेचे वरिष्ठ नेते सहमत आहेत का? हा माझा प्रश्न आहे,” असेही नवनाथ बन यांनी स्पष्ट केले. (Navnath Ban Ravindra Dhangekar Controversy)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....