मुंबई (Maharashtra LegislativCouncil Election Results): विधानपरिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीला दिलेला मतदारांचा कौल पुढे आला आणि राजकीय वर्तुळात एकच रणकंदन माजले. महायुतीच्या पारड्यात दोन शिक्षक तर, मविआला तीन पदवीधर मतदारसंघात विजय मिळाला. मात्र, या निकालाने दोन्ही आघाड्यांसमोर आगामी राजकीय लढाईसाठी काही महत्त्वाचे संकेत नक्कीच ठेवले आहेत. पदवीधरांचा कौल महायुतीसाठी चिंतनाचा विषय ठरला असताना, शिक्षक मतदारसंघातील विजयाने महायुतीला दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे, तीन जागांवरील विजयामुळे मविआला नव्याने राजकीय आत्मविश्वास मिळाला असला, तरी दोन शिक्षक मतदारसंघांतील पराभवामुळे विरोधकांसमोरील आव्हानेही अधोरेखित झाली आहेत. (Maharashtra LegislativCouncil Election Results)
एकूणच पाचही मतदारसंघांबद्दल बोलायचे झाल्यास, बंडखोरी आणि नंतर मित्रपक्षांमधील असमन्वयाचा फटका महायुती आणि महाविकास आघाडीलाही बसल्याचे दिसते. या निवडणूकीत पुणे शिक्षक मतदारसंघातील शिवसेनेची हेकेखोरपणाची भूमिका त्यांनाच नडल्याचे चित्र आहे. सुरुवातीला मंगेश चिवटे यांना दिलेली अधिकृत उमेदवारी मागे घेऊन शिवसेनेने अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आणि भाजपच्या विरोधात प्रचार केला. मात्र, इथल्या शिक्षक मतदारांनी भाजपलाच आपली पहिली पसंती दिली. (Maharashtra LegislativCouncil Election Results)
अमरावती शिक्षक मतदारसंघात काँग्रेस आणि उबाठा गटातील मैत्रीपूर्ण संघर्ष त्यांना भोवला. याठिकाणी झालेले मतविभाजन शिवसेनेच्या पथ्थ्यावर पडले आणि किरण सरनाईक विजयी झालेत.
पुणे पदवीधरमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेने भाजप उमेदवाराला फारशी मदत न केल्याने महायुतीला आपली जागा गमवावी लागली, असे काही राजकीय विश्लेषकांचे मत आहे. मात्र, या जागेवर शरद पवार गटाच्या हर्षदा देशमुख यांना विजय मिळाल्याने त्या पक्षाचा आत्मविश्वास बळावला आहे. (Maharashtra Legislative Council Election Results)
दादांच्या राष्ट्रवादीला इशारा
मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसने विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांना उमेदवारी दिली खरी, मात्र शिवसेनेने सुरुवातीपासूनच त्यांच्या उमेदवारीला विरोध केला. परिणामी, इथेही महायुतीतील असमन्वय प्रकर्षाने पुढे आला. शिवाय छत्रपती संभाजीनगर हा गृहजिल्हा असूनही चव्हाण यांना तिथून फारशी ताकद मिळाली नाही. अलीकडे, झालेल्या एमपीएससी विदयार्थ्यांच्या आंदोलनात पदवीधरांचे आमदार म्हणून सतीश चव्हाण यांनी योग्य भूमिका घेतली नाही, असाही एक मतदारांचा सूर असल्याचे बोलले जाते. शिवाय अनेक वर्षे एकाच मतदारसंघाचे प्रतिनिधित्व आणि मतदारांशी संपर्क असतानाही चव्हाण यांचा पराभव नक्कीच पक्षासाठी आत्मचिंतनाचा विषय आहे. शिवाय अमरावती शिक्षक आणि मराठवाडा पदवीधर मतदारसंघात भाजपनेही मित्रपक्षांना फारसे सहकार्य केले नसल्याचा एक सूर आहे. (Maharashtra Legislative Council Election Results)
नागपूरमध्ये अचानक गेम का पालटला?
विधानपरिषदेच्या पाच जागांपैकी सर्वाधिक गाजली ती जागा म्हणजे नागपूर पदवीधर मतदारसंघ. मतमोजणीच्या शेवटच्या क्षणापर्यंत या जागेवर भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये चुरस पाहायला मिळाली. अखेर, काँग्रेसच्या अभिजीत वंजारी यांनी भाजपच्या सुधाकर कोहळे यांचा पराभव केला. याठिकाणी भाजपने कोहळे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर माजी आमदार अनिल सोले यांनी बंडखोरी केली होती. पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टाईनंतर त्यांनी आपला अर्ज मागे घेत अधिकृत उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यावेळी निर्माण झालेले मतभेद शेवटपर्यंत ताणले गेल्याचीही शक्यता वर्तवण्यात येते. (Maharashtra Legislative Council Election Results)
सुरुवातीला पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये सुधाकर कोहळे आघाडीवर होते. पण दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या आधारे निकाल लागल्यास कुणाला फायदा होईल, याचे आकलन कोणत्याच पक्षाला नव्हते आणि हीच बाब निर्णायक ठरली. नितेश कराळे यांना मिळालेल्या पहिल्या पसंतीच्या मतपत्रिकेवर दुसऱ्या पसंतीची सर्वाधिक मते अभिजीत वंजारी यांना मिळाली. त्यामुळे भाजपच्या सुधाकर कोहळे यांना मागे टाकत ते विजयी झालेत. (Maharashtra Legislative Council Election Results)
कराळे मास्तर निर्णायक ठरले?
दुसरी गोष्ट म्हणजे, नागपूर पदवीधर मतदारसंघात नितेश कराळे सुरुवातीला शरद पवार गटातर्फे रिंगणात असल्याने मतविभाजन होऊन भाजपला फायदा होईल असे वाटत असले तरी, त्यांनी भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांच्या उमेदवारांची मते आपल्याकडे खेचून घेतल्याचे दिसते. याशिवाय गेल्या ६ वर्षात अभिजीत वंजारी यांनी मतदारसंघात केलेले कामही निर्णायक ठरले. (Maharashtra Legislative Council Election Results)
आजचे विधान परिषदेचे निकाल म्हणजे एक स्पष्ट आणि महत्त्वाचा इशारा आहेत. लोकांचा विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी, पक्षाचे प्राधान्यक्रम नव्याने ठरवण्यासाठी आणि संघटनेत सुधारणा करण्यासाठी तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. त्याहीपेक्षा महत्वाची बाब म्हणजे महायुतीला एकत्र बसून कठोर आत्मपरीक्षण करावे लागेल. (Maharashtra Legislative Council Election Results)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....