मसाला बाजारात एफडीएची कारवाई; राज्यभरात ८४ परवाने निलंबित, १९.७० कोटींचा साठा जप्त

    30-Oct-2026
 
 
Maharashtra FDA Spice Adulteration
 
मुंबई : मसाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ करणार्‍या अन्न व्यावसायिकांविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाने आतापर्यंतची सर्वात मोठी आणि धडक कारवाई केली आहे.
 
एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली १ एप्रिल ते २९ ऑक्टोबर २०२६ दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात ही विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेमध्ये नियमांचे उल्लंघन करणार्‍या आणि असुरक्षित अन्नपदार्थ विकणार्‍या ८४ मसाला उत्पादक व व्यापार्‍यांचे नुकतेच परवाने निलंबित करण्यात आले आहेत. या कारवाईमध्ये एकूण १९ कोटी ७० लाख रुपयांचा भेसळयुक्त साठा जप्त करण्यात आला.
 
एफडीएच्या अधिकृत माहितीनुसार, मागील सात महिन्यांत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अन्न सुरक्षा अधिकारी आणि सहाय्यक आयुक्तांच्या पथकांनी धडक तपासणी सत्र सुरू केले होते.
 
या मोहिमेदरम्यान राज्यभरातील १,०५७ अन्न आस्थापनांची व मसाला निर्मिती केंद्रांची कसून तपासणी करण्यात आली. तपासणीत त्रुटी आढळलेल्या आणि गंभीर मानकांचे उल्लंघन करणार्‍या ८४ व्यावसायिकांचे परवाने तातडीने निलंबित करण्यात आले.स्वच्छता आणि अन्न सुरक्षेच्या नियमांचे किरकोळ उल्लंघन करणार्‍या ५५७ व्यावसायिकांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या असून, त्यांना नियमांचे पालन करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. तर भेसळयुक्त, निकृष्ट दर्जाचे आणि मानकांमध्ये न बसणारे मसाले व कच्चे साहित्य मिळून एकूण १९ कोटी ६९ लाख ९२ हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
 
विभागनिहाय झालेली कारवाई:
 
राज्यातील सर्वच प्रमुख विभागांमध्ये ही कारवाई करण्यात आली असून, यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक कारवाई झाल्याचे समोर आले आहे:
 
१. छत्रपती संभाजीनगर विभाग: सर्वाधिक २७ परवाने निलंबित करण्यात आले.
२. पुणे विभाग: १४ परवाने निलंबित करून निकृष्ट दर्जाच्या साठ्यावर कारवाई.
३. अमरावती विभाग: १४ परवाने निलंबित.
४. बृहन्मुंबई विभाग (मुंबई): १२ मसाला व्यापार्‍यांचे परवाने निलंबित करून कोट्यवधींचा साठा सील.
५. कोकण विभाग: १२ परवाने निलंबित.
६. नाशिक विभाग: ८ परवाने निलंबित.
७. नागपूर विभाग: ७ परवाने निलंबित.
 
मसाल्यांमध्ये कशाची भेसळ?
 
सणासुदीच्या काळात मिरची पावडर, हळद, गरम मसाला आणि धन्या पावडर यांसारख्या रोजच्या वापरातील मसाल्यांना मोठी मागणी असते. याच संधीचा फायदा घेऊन काही नफेखोर व्यापार्‍यांनी मसाल्यांमध्ये खालील घातक पदार्थांची भेसळ केल्याचे एफडीएच्या तपासणीत उघड झाले आहे:
 
  • मिरची पावडरीमध्ये लाकडाचा भुसा, विटांची पूड आणि कपड्यांना दिला जाणारा रासायनिक रंग.
  • हळदीमध्ये मानवी आरोग्याला घातक असणारे रासायनिक पिवळे रंग (मेटॅनिल यलो).
  • धन्या पावडरीमध्ये घोड्याची लीद किंवा स्टार्च पावडर





संबंधित मजकूर