मुंबई : ‘ज्या क्षेत्रात जो प्रवीण असतो, त्याने त्या क्षेत्रात काम करायला हवे. राज ठाकरे चांगले व्यंगचित्रकार आहेत, उद्धव ठाकरे चांगले छायाचित्रकार आहेत. मी राजकारणात प्रवीण आहे. त्यामुळे त्यांनी आता मला माझे काम करू द्यावे,’ अशा मिश्कील शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंना टोला लगावला. ‘२०१९ पर्यंत जेव्हा जेव्हा उद्धव ठाकरेंनी फोन केला, तेव्हा तेव्हा मी त्यांच्या घरी गेलो. पण २०१९ नंतर त्यांनी बोलावलेच नाही. मी वाटच पाहत राहिलो,’ असे सांगत फडणवीस यांनी जुन्या राजकीय संबंधांवरही भाष्य केले. त्यांच्या या वक्तव्यांनी सभागृहात हास्याची कारंजी उडाली. (Fadnavis Thackeray Political Banter)
निमित्त होते व्यंगचित्रकार प्रशांत कुळकर्णी यांच्या ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत राजकीय टोलेबाजीची रंगत अनुभवायला मिळाली. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आपल्या भाषणात, ‘राज ठाकरेंनी बोलावले की मुख्यमंत्री फडणवीस कार्यक्रमाला येतात,’ असे म्हटले. हाच धागा पकडत राज ठाकरे यांनी, ‘ठाकरेंनी बोलावलं की मुख्यमंत्री फडणवीस येतात; पण २०२९ पर्यंत त्यांना मुख्यमंत्रिपदी ठेवा म्हणजे झालं,’ असा मिश्कील टोला लगावला. (Fadnavis Thackeray Political Banter)
राज ठाकरेंच्या या राजकीय गुगलीला उत्तर देताना फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंसोबतच्या जुन्या संबंधांचा संदर्भ दिला. २०१९ पर्यंत उद्धव ठाकरे यांनी फोन केला की आपण त्यांच्या घरी जात होतो; मात्र त्यानंतर त्यांनी कधीही बोलावले नाही, असे सांगत त्यांनी राजकीय परिस्थितीवर उपरोधिक भाष्य केले. (Fadnavis Thackeray Political Banter)
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या फटकेबाजीने कार्यक्रमातील वातावरण हलकेफुलके झाले. राजकीय व्यासपीठांवर एकमेकांवर टीका करणार्या नेत्यांमधील ही मिश्कील जुगलबंदी उपस्थितांसाठी चर्चेचा विषय ठरली. (Fadnavis Thackeray Political Banter)