महायुतीतील कुरघोड्यांवरून भाजप आक्रमक; शिंदे सेनेच्या धंगेकरांवर कारवाईची मागणी!

‘महायुतीत राहून विरोधी भूमिका घेणे योग्य नाही’; प्रवीण दरेकरांचा शिंदेंना सल्ला, नितेश राणेंचा समन्वयावर भर

 
 
BJP Mumbai March November 2
 
मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीतील समन्वयाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमधील निवडणुकीत मित्रपक्षांकडून अपेक्षित सहकार्य मिळाले नसल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे.
 
महायुतीत राहून युतीच्या उमेदवारांविरोधात भूमिका घेणाऱ्या नेत्यांची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केली. विधान परिषद सदस्य प्रवीण दरेकर यांनीही महायुतीतील अंतर्गत मतभेदांवर नाराजी व्यक्त करत शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी लक्ष घालावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. दरम्यान, मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी निवडणुकीतील कामगिरीचा वरिष्ठ नेत्यांकडून आढावा घेतला जाणार असल्याचे स्पष्ट केले. (BJP Mumbai March November 2)
 
रवींद्र धंगेकरांचा राजीनामा घ्या : नवनाथ बन
 
महाराष्ट्रात महायुतीत, थोडासा समन्वय असला असता तर पुण्याची जागाही भाजपाने जिंकली असती आणि छत्रपती संभाजीनगरची जागाही राष्ट्रवादीला मिळाली असती. पुण्यामध्ये शिक्षक मतदारसंघासाठी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार मंगेश चिवटे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यांना देण्यात आलेला एबी फॉर्म मागे घेतल्यानंतर महायुती म्हणून आम्ही एकत्रित निवडणूक लढवू, अशी अपेक्षा असताना ऐनवेळेला शिवसेनेने सचिन सानप यांना पाठिंबा दिला. सचिन सानप यांना जवळपास 16 हजार मते मिळाली आणि पदवीधर मतदारसंघात भाजपाच्या स्मिता जाधव साधारणतः 11 ते 12 हजार मतांनी पराभूत झाल्याचे विश्लेषण भाजपा मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केले.  (BJP Mumbai March November 2)
 
छत्रपती संभाजीनगरात सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने सतीश चव्हाण यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली होती. तेथे सतीश चव्हाण यांच्याविरोधात अब्दुल सत्तार यांनी जाहीरपणे भूमिका घेतली आणि तिथेही मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने विरोधात काम केले, असा आरोप बन यांनी केला.  (BJP Mumbai March November 2)
 
पुण्यामध्ये पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेचे महानगरप्रमुख रविंद्र धंगेकर यांनी अधिकृतपणे भाजपा उमेदवाराला मत देऊ नका, असे जाहीर आवाहन केले. पुण्यात शिक्षक मतदारसंघासाठी तुम्ही पाठिंबा दिला, तिथपर्यंत आम्ही समजू शकतो. परंतु पदवीधर मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार नसताना रविंद्र धंगेकर निवडणुकीनंतर पुन्हा पोस्ट करतात की, “शाब्बास पदवीधरांनो!” याचा अर्थ काय? हे अतिशय गंभीर आहे. महायुती म्हणून आम्ही अमरावतीत एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेला पूर्ण मदत केली. तिथे आमच्या काही लोकांनी बंडखोरी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्याचे काम माननीय प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांनी केले. रविंद्र धंगेकर यांनी केसाने गळा कापण्याचा निर्णय घेतला असेल, तर अशा झारीतल्या शुक्राचार्यांविरोधात एकनाथजी शिंदे यांनी कारवाई करावयास हवी, अशी मागणी बन यांनी केली.  (BJP Mumbai March November 2)
 
‘महायुतीत राहून युतीचे पाय तोडू नका’ : प्रवीण दरेकर
 
विधानपरिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांनीही महायुतीतील परस्परविरोधी भूमिकांवर आक्षेप घेतला. निवडणुकीत प्रत्येक घटकपक्षाने महायुतीचा धर्म पाळणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी मित्रपक्षांना समन्वय राखण्याचा सल्ला दिला. ‘महायुतीत राहायचे आणि महायुतीचे पाय तोडायचे, हा प्रकार शेखचिल्लीसारखा आहे,’ असे दरेकर म्हणाले. पुण्यातील निवडणुकीत रवींद्र धंगेकर यांच्या भूमिकेचा संदर्भ देत त्यांनी एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी लक्ष घालावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. ‘अमरावती विभागात भाजपचे पदाधिकारी उभे होते. त्यावेळी भाजपने त्यांच्यावर कारवाई केली. त्यांना सहा वर्षांसाठी निलंबित केले. आम्ही महायुतीचा धर्म बजावला. महायुतीच्या घटकपक्षाने युतीधर्म पाळला नाही.महायुतीच्या उमेदवारांना पराभूत करण्याचे पाप हे मित्रपक्षाने केल्याचे स्पष्ट झाले आहे.  (BJP Mumbai March November 2)
 
‘पुण्याचा महानगरप्रमुख रविंद्र धंगेकर यांनी निवडणुकीआधी आवाहन केले होते. तर निवडून आल्यानंतरही प्रतिक्रिया दिली आहे. एखाद्या शहराचा महानगरप्रमुख भूमिका घेतो. त्यावेळी तो पक्षाचा महत्त्वाचा पदाधिकारी असतो. वरून आदेश आल्याशिवाय होत नाही. मला वाटतं यात आता शिंदे साहेबांनी लक्ष घातलं पाहिजे. आमचा पक्ष आत्मचिंतन करतो. चुका दुरुस्त करतो. परंतु शिंदे गटानेही भूमिका मांडताना महायुतीत वितुष्ट येईल, अशी मांडू नये, असे दरेकर पुढे म्हणाले.  (BJP Mumbai March November 2)
 
ठाकरेंचे मातोश्री प्रेमी काही महायुतीत राहिले नाहीत ना ? : मंत्री नितेश राणे
 
मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनीही महायुतीतील समन्वयाच्या प्रश्नावर भाष्य केले. या पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, शिवसेनेचे प्रमूख म्हणून एकनाथ शिंदे आहेत. आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, सुनेत्राताई पवार आहेत हे सगळी नेते मंडळी बसून या सगळ्या ज्या काही घटना घडलेल्या आहेत ना त्यावर ते बरोबर जिथे जिथे टाइट करायचे आहे त्या सगळ्या गोष्टी आता होतील. ‘कोणत्या मतदारसंघात कोणी काय भूमिका घेतली, कोणी युतीच्या विरोधात कशी भूमिका घेतली, या सगळ्या बाबींचे विश्लेषण होईल, आत्मपरीक्षण होईल. त्यानंतर त्यानुसार कारवाई केली जाईल,’ असे राणे यांनी स्पष्ट केले.  (BJP Mumbai March November 2)
 
भाजपने वसुलीकर उमेदवार दिला होता या शिंदे गटाचे नेते रविंद्र धंगेकरांच्या टीकेला नितेश राणे यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, "आता थोडं तपासायला पाहिजे की हे उद्धव ठाकरेंचे मातोश्री प्रेमी काही महायुतीमध्ये तरी राहिले नाहीत ना? त्यांचं आजही मातोश्रीवरचं प्रेम गेलेलं नाही. अशा काही लोकांना चेक करायला पाहिजे. असे शकुनीमामा महायुतीमध्ये तरी बसलेले नाहीत ना? ते नुसत्या काड्या लावतायेत. उद्धव ठाकरेला गुदगुद्या होतील, उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे लोक सुखाने झोपतील यासाठी तर काही लोक महायुतीमध्ये काम तर करत नाही ना? अशा पद्धतीचे वक्तव्य आहेत. हे जरा आता तपासण्याची वेळ आलेली आहे".  (BJP Mumbai March November 2)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर