"डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान सहन करणार नाही" माजी आमदार विजय गिरकर यांचा 'सीजेपी'ला इशारा!

    03-Oct-2026   
 
Vijay Girkar CJP
 
मुंबई (Vijay Girkar CJP's Dr Babasaheb Ambedkar Statement) : जवाहरलाल नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५१ साली देशाला मतदानाचा अधिकार दिल्याच्या खोट्या कंड्या सीजेपीचे नेते पिकवत आहेत. तुम्हाला जवाहरलाल नेहरू यांचा कितीही उदो उदो करायचा असेल तर करा. मात्र, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अवमूल्यन आणि अपमान करायचा प्रयत्न कुणी केला तर आंबेडकरी जनता आणि देशवासीय त्याचा धिक्कार करतील, असा इशारा भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार विजय (भाई) गिरकर यांनी शनिवारी दिला.
 
पत्रकार परिषदेत भाई गिरकर म्हणाले की, "१९४९ साली डॉ. बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान १९५० साली आपण स्वीकारले. तेव्हा अमेरिका, इंग्लंडच्या संविधानात महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता. त्यासाठी त्यांना लढावे लागले. डॉ. बाबासाहेबांनी मात्र पुरुषांसोबत महिलांनाही मतदानाचा अधिकार दिला. इतकेच नव्हे तर 'टाटा बाटा'सोबत इथल्या गठई कामगारांना मतदानाचा अधिकार दिला. हे बाजूला ठेऊन डॉ. बाबासाहेबांना नाकारण्याचे काम चालले आहे." (Vijay Girkar CJP's Dr Babasaheb Ambedkar Statement)
 
"योगेंद्र यादव म्हणतात आता देशाचा कारभार संसदेतून नव्हे तर रस्त्यावरून चालणार. म्हणजे तुम्हाला देशात अराजकता आणायची आहे. या देशात झुंडशाही, अतिरेक आणि हिंसाचार घडवून आणायचा आहे. संविधानाने दिलेले न्यायालय, निवडणूक आयोग विधीमंडळ, लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेली प्रसार माध्यमे आणि व्यक्ती स्वातंत्र्याचे अधिकार नाकारत यांना संविधानालाच विरोध करायचा आहे. आणीबाणीच्या काळात लोकशाही संस्थांवर निर्बंध आले. त्या इतिहासातून आपण धडा घेतला पाहिजे. भविष्यात कोणत्याही सरकारने किंवा कोणत्याही पक्षाने लोकशाही संस्थांच्या अधिकारांना बाधा पोहोचवू नये. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान आणि त्यातून निर्माण झालेली लोकशाही व्यवस्था ही प्रत्येक भारतीयाची आहे. त्यामुळे संविधानाचे संरक्षण करणे, मतदाराचा अधिकार सुरक्षित ठेवणे आणि निवडणूक प्रक्रिया पारदर्शक ठेवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. याच भूमिकेतून आपण या विषयाकडे पाहिले पाहिजे," असेही ते म्हणाले. (Vijay Girkar CJP's Dr Babasaheb Ambedkar Statement)

काँग्रेस, कम्युनिस्टांनी डॉ. आंबेडकरांचा पराभव केला
 
"मतचोरी आणि ज्ञानेश कुमार यांच्याविषयी आंदोलनात बोलले गेले. मात्र पहिली मतचोरी झाली होती ती नेहरूंना पंतप्रधान करण्यासाठी. सरदार वल्लभभाई पटेल यांना पंतप्रधान करण्यासाठी दहा मते पडली होती. मात्र, नेहरूंना एकही मत न पडता गांधीजींनी त्यांना पंतप्रधान करून देशावर थोपले. दुसरी मतचोरी झाली ती १९५२ साली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवडणुकीसाठी त्यावेळच्या दक्षिण मध्य मतदार संघात उभे राहिले, तेव्हा त्यांच्याविरुद्ध नेहरूंनी त्यांचे स्वीय सहाय्यक काजरोळकर यांना उभे करून डॉ. बाबासाहेबांना पाडले होते. त्यावेळच्या कम्युनिस्टांनी मते कुजवण्यास सांगितले. सुमारे ७८ हजार मते बाजूला काढली गेली आणि दहा हजार मतांनी डॉ. बाबासाहेबांना पराभूत केले. त्यावेळी डॉ. बाबासाहेबांना पाडण्यासाठी स्वत: नेहरू प्रचाराला आले होते. त्यांनी पैसा पुरवला. मतदारांना निरनिराळी आमिषे दाखवून चुकीचा प्रचार करून बाबासाहेबांना पाडण्यात आले. वेळोवेळी अपमानित करून कॉंग्रेसकडून डॉ. बाबासाहेबांना नाकारण्यात आले आणि आताही १९५१ साली नेहरू आणि डॉ. बाबासाहेबांनी मतांचा अधिकार दिल्याचे सांगत नेहरू यांचे नाव पुढे केले जात आहे," अशी टीकाही भाई गिरकर यांनी केली. (Vijay Girkar CJP's Dr Babasaheb Ambedkar Statement)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर