मुंबई (SwarArjun Mahabharat Musical Program) : महाभारतातील प्रसंग, त्यामागील तत्त्वज्ञान आणि आजच्या जीवनाला दिशा देणारी जीवनसूत्रे गीत-संगीत व निवेदनाच्या माध्यमातून उलगडणाऱ्या ‘स्वरार्जुन’ या कार्यक्रमाला विलेपार्लेकर रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दि. २६ सप्टेंबर रोजी विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
महाभारत ही केवळ युद्धाची कथा नसून मानवी जीवनातील संघर्ष, कर्तव्य, नातेसंबंध, निर्णयक्षमता, धर्म-अधर्माचा विवेक आणि संकटांवर मात करण्याची प्रेरणा देणारा चिरंतन ग्रंथ आहे, ही भूमिका केंद्रस्थानी ठेवून ‘स्वरार्जुन’ची मांडणी करण्यात आली. महाभारतातील अर्जुन आणि पांडवांच्या जीवनातील निवडक प्रसंग गीत, संगीत आणि निवेदनातून रसिकांसमोर उलगडण्यात आले. या कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार उपस्थित होते. (SwarArjun Mahabharat Musical Program)
यावेळी बोलताना मंत्री आशिष शेलार यांनी भारतीय संस्कृती आणि महाभारतातील विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविणाऱ्या अशा सांस्कृतिक उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे विशेष अतिथी ज्येष्ठ गीतकार-संगीतकार कौशल इनामदार यांनीही ‘स्वरार्जुन’मधील गीतरचना, संगीत आणि कार्यक्रमाच्या संकल्पनेला मनापासून दाद दिली. यावेळी आ. संजय उपाध्याय, स्थानिक नगरसेविका अंजली सामंत, माजी नगरसेवक अभिजित सामंत, भाजप कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष सुहास अडीवरेकर, ज्येष्ठ कार्यकर्ते विलास भागवत तसेच ज्येष्ठ साऊंड इंजिनीअर अविनाश ओक आदी मान्यवर उपस्थित होते. (SwarArjun Mahabharat Musical Program)
गीत-संगीत आणि प्रभावी निवेदनाचा संगम
‘स्वरार्जुन’ची संकल्पना व निर्मिती वैभव केळकर आणि डॉ. मेघना दलाल यांची असून निवेदन लेखन वैभव केळकर यांनी केले आहे. कवी श्रीरंग (श्रीपाद सहस्रबुद्धे) यांच्या गीतांना माधुरी नाईक यांनी संगीतबद्ध केले आहे. संगीत संयोजन सोमेश नार्वेकर आणि अमेय ठाकूरदेसाई यांचे आहे. कार्यक्रमाचे निवेदन श्रीराम केळकर यांनी केले. महाभारतातील विविध प्रसंग, त्यातील व्यक्तिरेखा आणि त्या प्रसंगांमधून समोर येणारी जीवनसूत्रे यांची सांगड त्यांनी गीतांशी प्रभावीपणे घातली. त्यामुळे गीतांमधील आशय आणि महाभारतातील घटनांचा संदर्भ रसिकांपर्यंत सहजपणे पोहोचला. गायक धनंजय म्हसकर, गायिका केतकी चैतन्य आणि गायक व संगीत संयोजक सोमेश नार्वेकर यांच्या गायनाला रसिकांनी भरभरून दाद दिली. विविध वाद्यांच्या समृद्ध साथीमुळे कार्यक्रमाचा सांगीतिक अनुभव अधिक प्रभावी झाला.
प्रत्येक गीताला उत्स्फूर्त दाद
कार्यक्रमासाठी पार्लेकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. प्रत्येक गीतानंतर होणारा टाळ्यांचा कडकडाट, निवेदनादरम्यान रसिकांची एकाग्रता आणि कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत जाणवलेला उत्साह यामुळे नाट्यगृहात भारावलेले वातावरण निर्माण झाले. ‘महाभारतातील जीवनसूत्रांचा सांगीतिक प्रवास’ या सूत्राभोवती उभ्या राहिलेल्या ‘स्वरार्जुन’ने महाभारतातील चिरंतन विचार आधुनिक जीवनाशी जोडत संगीत, साहित्य, निवेदन आणि तत्त्वज्ञानाचा प्रभावी संगम रसिकांसमोर सादर केला. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या माध्यमातून झालेला हा प्रयोग ‘स्वरार्जुन’च्या वाटचालीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला. (SwarArjun Mahabharat Musical Program)