मुंबई (Maharashtra MLC Election 2026 MVA) : विधान परिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. निवडणुकीत एकत्र लढण्याची भूमिका मांडणाऱ्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्येच जागावाटपावरून एकमत होत नसल्याचे चित्र आहे. शुक्रवारी, काँग्रेसने परस्पर आपले उमेदवार जाहीर केल्याने मविआत नाराजी असल्याचे समजते. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीतील बेबनाव चव्हाट्यावर आला आहे.
काँग्रेसने नागपूर पदवीधर तसेच पुणे आणि अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. यामुळे मविआत संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, यावर प्रतिक्रिया देताना उबाठा गटाचे नेते संजय राऊत म्हणाले की, "विधान परिषद निवडणुकीबाबत राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे यांच्याशी आमची चार दिवसांपूर्वी बैठक झाली. काँग्रसे नेते हर्षवर्धन सपकाळ आणि नसीम खान यांच्यासोबतही बैठक झाली. महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याची आमची भूमिका असली तरी, आमच्या मित्र पक्षांची गणिते वेगळी आहेत. प्रत्येकाला वाटते की, आम्ही मोठी नोंदणी केली आहे. काँग्रेसने नागपूर, अमरावती आणि पुणे शिक्षक मतदारसंघातील उमेदवार जाहीर केला आहे. आम्ही अमरावती, मराठवाडा पदवीधर मतदारसंघ लढणार आहोत. दोन दिवसात आम्ही उमेदवारांची घोषणा करणार आहोत. एकमत होत नसेल तर मैत्रीपूर्ण लढती होऊ द्या. आम्ही मराठवाड्याची जागा लढणार आहोत. तसेच आम्ही अमरावतीची जागाही लढणार आहोत. एकमत होत नसेल तरी आम्ही लढू. आम्हाला लढावेच लागेल. आम्हालाही आमचा पक्ष चालवायचा आहे," असे ते म्हणाले. (Maharashtra MLC Election 2026 MVA)
यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, "या निवडणूका सामान्य मतांवर नसतात. ज्यांनी जास्त सदस्य नोंदणी केली त्या बाजूला जास्त कौल असतो. या सामान्य निवडणूका असत्या तर, तडजोड केली असती पण या निवडणूकांमध्ये जो सदस्य नोंदणी करतो त्याचे वजन चालते. नाराजी ठेवून उपयोग नाही. आम्ही सगळे समन्वयाने मार्ग काढू. पुण्याच्या पदवीधर मतदारसंघात त्यांचा सिटींग असताना आम्ही त्यावर दावा केला नाही. पुणे शिक्षक मतदारसंघात आमचा उमेदवार आहे, त्यामुळे त्यांनीही दावा केला नाही. सिटींग आमदार असताना दुसऱ्याने त्या जागेची मागणी करणे योग्य नाही."
निवडणूकीआधीच मविआत फूट?
येत्या २३ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी मतदान होणार असून २७ ऑक्टोबर रोजी निकाल लागणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली असून उमेदवारांबाबत चर्चा सुरु आहे. दरम्यान, या निवडणूका महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा होण्याची चर्चा असतानाच मविआत फूट पडल्याचे चित्र आहे. नेहमीप्रमाणे या निवडणूकांमध्येही मविआतील अंतर्गत मतभेद पुढे आले आहेत. त्यामुळे आता आगामी विधानपरिषदेच्या निवडणूका महाविकास आघाडी एकत्र लढणार का? हे पाहणे औत्सुक्याचे असेल. (Maharashtra MLC Election 2026 MVA)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....