मुंबई (CJP Protest) : कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात काही असामाजिक तत्व तिथे होते का? त्यांनी काही चुकीचे काम केले का, याची संपूर्ण चौकशी सुरु असून या आंदोलनावर पोलिसांची करडी नजर आहे, अशी माहिती राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना राज्यमंत्री पंकज भोयर म्हणाले की, "कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात चुकीचे आणि आक्षेपार्ह वाक्य वापरले असल्यास त्याची दखल घेण्यात येईल. देशाच्या पंतप्रधानानांबद्दल कुणीशी असे चुकीचे वक्तव्य करू नये. पोलिसांचा कुठेही हे आंदोलन दडपवण्याचा प्रयत्न नव्हता. उलट आपण महाराष्ट्र पोलीस मुंबई पोलिसांचे कौतुक केले पाहिजे. मुंबई हे भारतातील एक महत्त्वपूर्ण शहर असून लाखों लोक या ठिकाणी रोज वाहतूक करत असतात. अशावेळी त्यांना सुरक्षित ठेवणे महत्वाचे असून पोलिसांनी यावेळी पूर्ण सहकार्य केले." (CJP Protest)
ते पुढे म्हणाले की, "अशा वेळी होणाऱ्या गर्दीमध्ये काही असामाजिक तत्व देखील राज्यातील शहराची शांतता बिघडविण्याचा प्रयत्न करत असतात. परंतू, पोलीस प्रशासनाची करडी नजर या सर्व असामाजिक कार्यकर्त्यांवर आहे. त्या ठिकाणी असून कुठले असामाजिक तत्व घुसू नये किंवा सर्वसामान्य लोकांना त्रास होऊ नये, याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येतो. कुठल्याही प्रकरणामध्ये कोणी दोषी असेल तर निश्चितपणे त्याच्यावर कारवाई होतच असते. जे जे आरोप होतात त्याची शहानिशा करण्यात येईल आणि त्यानंतर चौकशीअंती जे काही सत्य असेल त्या अनुषंगाने कारवाई करण्यात येईल."
कालच्या आंदोलनाचे सगळे व्हिडिओ फुटेज मुंबई पोलिसांनी मागवल्याची माहिती पुढे आली होती. यावर बोलताना राज्यमंत्री पंकज भोयर म्हणाले की, "या आंदोलनात काही असामाजिक तत्व सामील झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने कदाचित पोलिसांनी आंदोलनाचे सीसीटीव्ही फुटेज मागवले." (CJP Protest)
समृद्धी महामार्गावरील अपघाताच्या घटना कमी करण्याचा प्रयत्न
समृद्धी महामार्गावरील वाढत्या अपघातांबाबत बोलताना ते म्हणाले की, "विदर्भातील जनतेला पश्चिम महाराष्ट्रात किंवा मुंबईला जाण्याकरिता सुकर मार्ग उपलब्ध व्हावा यासाठी समृद्धी महामार्गाची निर्मिती करण्यात आली होती. अतिशय सुलभ पद्धतीने त्या ठिकाणी दोन्ही दिशेच्या लोकांना वाहतूक करता येत असल्याचे आपण बघतो. परंतू, ही वाहतूक होत असताना मधल्या काळात काही अपघात झाले आणि यात अनेक लोक मृत्यूमुखी पडलेत. या अनुषंगाने शासनाच्या वतीने अनेक सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात आल्या. पण यात काही त्रुटी आहेत का? जवळपास १५ पोलिस मदत केंद्रे आपण त्याठिकाणी उभे केले असून त्याचा आढावा घेऊन ते अधिक सक्रिय करत अशा घटना कशा कमी करता येईल, असा सरकारचा प्रयत्न राहील. हा मार्ग अधिक सुरक्षित कसा करता येईल याबाबत आढावा घेण्यात येईल." (CJP Protest)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....