महिना उलटला तरी, प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येचा हेतू अस्पष्टच!

१२ साक्षीदारांचे जबाब, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी; राजेंद्र आणि मीनाक्षी शिंदे यांचीही चौकशी

    29-Oct-2026
 
 
Pradeep Purnekar Murder Case
 
ठाणे (Pradeep Purnekar Murder Case) : प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्येला महिना उलटूनही हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अटक केलेल्या आरोपींकडून मिळालेली माहिती, साक्षीदारांचे जबाब आणि अन्य पुराव्यांच्या आधारे तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. संयुक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) पंजाबराव उगले आणि विशेष तपास पथकाचे (एसआयटी) प्रमुख अमरसिंह जाधव यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत आतापर्यंत च्या तपासाची माहिती दिली.
 
या गुन्ह्याच्या तपासासाठी २३ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे विशेष पथक नेमण्यात आले आहे. आतापर्यंत १२ साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले असून, घटनाक्रम स्पष्ट करण्यासाठी विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले आहे. अटक आरोपी निखिल यादव आणि नितेश पवार यांच्याकडून पिस्तूल आणि वाहने जप्त करण्यात आली आहेत. आरोपी पप्या शिंदे याला गुन्हा दाखल झाल्यानंतर घटनास्थळावरून अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. (Pradeep Purnekar Murder Case)

राजेंद्र, मीनाक्षी शिंदे यांची चौकशी
 
या प्रकरणात राजेंद्र शिंदे यांना वारंवार चौकशीसाठी बोलावण्यात आले असून, माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचीही चौकशी करण्यात आली आहे. पप्या शिंदे याच्याकडे कसून चौकशी करण्यात आली असून, आरोपींच्या जबाबांसह उपलब्ध पुराव्यांची जुळवाजुळव सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. राम पूर्णेकर यांनी सादर केलेले पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेजचाही तपास केला जात आहे. (Pradeep Purnekar Murder Case)
 
राजकीय हत्येचा उल्लेख नसल्याचा पोलिसांचा दावा
 
आरोपी अमित सिंग याने दिलेल्या जबाबात ही हत्या राजकीय कारणातून झाल्याचा उल्लेख नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, हत्येमागील नेमका हेतू अद्याप स्पष्ट झालेला नसल्याने तपासाच्या निष्कर्षाबाबत प्रतीक्षा कायम आहे. अटक आरोपींकडून मिळालेली माहिती आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास पुढे सुरू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. (Pradeep Purnekar Murder Case)
 
तपासाबाबत चुकीचे निष्कर्ष काढू नका
 
तपास सुरू असताना काही ठिकाणी तपासाबाबत वेगळ्या आणि चुकीच्या स्वरूपाच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात असल्याचे पोलिसांनी नमूद केले. या गुन्ह्यात पुरावे गोळा करताना काही ठिकाणी अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचेही त्यांनी सांगितले. (Pradeep Purnekar Murder Case)
 
दरम्यान, काल झालेला प्रकार गंभीर असून आंदोलनकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. कोणीही कायदा हातात घेऊ नये, असा इशारा देतानाच या प्रकरणाचा तपास सुरूच राहणार असून कायद्याच्या चौकटीतच पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले. (Pradeep Purnekar Murder Case)
 
 




संबंधित मजकूर