‘संजय राऊतांनी आधी स्वतःच्या तीन उमेदवारांचा हिशेब द्यावा’; मंत्री नितेश राणेंचा ठाकरे गटावर निशाणा

‘दुसऱ्यांच्या घरात डोकावण्याची सवय सोडा’; महायुतीतील मतभेदांवर आत्मपरीक्षणाचे संकेत, निकालानंतर आवश्यक ती कारवाई होणार असल्याचे राणेंचे वक्तव्य


Nitesh Rane Sanjay Raut 
 
मुंबई, : (Nitesh Rane Sanjay Raut)निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीतील समन्वय, मित्रपक्षांची भूमिका आणि परस्परांवर होणाऱ्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. “संजय राऊत यांनी दुसऱ्यांच्या घरात डोकावण्यापेक्षा आधी स्वतःच्या पक्षाने उभे केलेल्या तीन उमेदवारांचा हिशेब द्यावा,” असे आव्हान राणे यांनी दिले. त्याचवेळी महायुतीतील निवडणुकीच्या कामगिरीचा वरिष्ठ नेत्यांकडून आढावा घेतला जाणार असून, जिथे युतीविरोधात भूमिका घेतली गेली असेल, तिथे आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
निवडणुकीचे निकाल उशिरा जाहीर झाल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना राणे यांनी काँग्रेस, ठाकरे गट आणि संजय राऊत यांच्या वक्तव्यांचा समाचार घेतला. महायुतीच्या कामगिरीवर टीका करणाऱ्या विरोधकांनी स्वतःच्या पक्षाच्या निकालाचे विश्लेषण करावे, असे ते म्हणाले.
 
संजय राऊत हे महायुतीतील घडामोडींवर सातत्याने भाष्य करतात; मात्र त्यांनी स्वतःच्या पक्षाच्या कामगिरीकडेही लक्ष द्यावे, अशी टीका राणे यांनी केली. “नेहमी दुसऱ्यांच्या घरात काय चालले आहे, हे पाहण्याची सवय सोडा. स्वतःच्या घरात काय चालले आहे, तेही पाहा,” अशा शब्दांत त्यांनी राऊत यांना लक्ष्य केले.(Nitesh Rane Sanjay Raut)
 
ठाकरे गटाने निवडणुकीत तीन उमेदवार उभे केल्याचा संदर्भ देत राणे म्हणाले, “संजय राजाराम राऊत यांना तुम्ही जरा विचारलं पाहिजे, साहेब, तुमच्या तीन उमेदवारांबद्दल सांगा ना? आमचे सहा, आमचे चौदा, आमचे काय? तुमचे उमेदवार किती निवडून आले आणि त्यांना किती मते मिळाली, याचे विश्लेषण आधी करा.”
 
विरोधकांकडून महायुतीच्या निकालावर प्रश्न उपस्थित केले जात असताना स्वतःच्या पक्षाच्या कामगिरीचे उत्तर देणेही आवश्यक आहे, असा मुद्दा त्यांनी मांडला. ठाकरे गटाला उद्देशून टीका करताना त्यांनी पक्षाच्या निवडणूक कामगिरीवरून संजय राऊत यांनी महायुतीला मार्गदर्शन करण्याची गरज नसल्याचे म्हटले.
 
‘महायुतीचा फेविकॉलचा जोड कोणी तोडू नये’
 
महायुतीतील एकजुटीचा मुद्दा अधोरेखित करत राणे म्हणाले की, निवडणुकीतील निकालातून प्रत्येक पक्षाने शिकण्याची गरज आहे. विधानसभा निवडणुकीप्रमाणे सर्व घटक पक्षांनी एकदिलाने निवडणूक लढवली असती, तर निकालाचे चित्र आणखी वेगळे दिसले असते, असे त्यांचे मत आहे.(Nitesh Rane Sanjay Raut)
 
“महायुतीचा मजबूत जोडा, ज्याला आपण फेविकॉलचा जोड म्हणतो, तो कोणी तोडता कामा नये,” असे स्पष्ट करत त्यांनी मित्रपक्षांना समन्वय कायम ठेवण्याचे आवाहन केले.
 
ते पुढे म्हणाले, “आम्ही एकत्र राहिलो, तर निश्चितपणे महाराष्ट्राचा विकास करू शकू. महायुती म्हणून आम्ही एकजुटीने लढलो, तर त्याचा फायदा होतो. त्यामुळे प्रत्येक घटक पक्षाने ही बाब लक्षात घेतली पाहिजे.”
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीतील इतर प्रमुख नेते एकत्र बसून निवडणुकीच्या निकालाचा आढावा घेतील, असेही त्यांनी सांगितले.(Nitesh Rane Sanjay Raut)
 
‘महायुतीत काड्या लावणारे कोण, हे तपासण्याची वेळ’
 
महायुतीतील काही नेत्यांच्या वक्तव्यांमुळे मित्रपक्षांमध्ये मतभेद निर्माण होत असल्याचा आरोप करत राणे यांनी अशा भूमिकांची तपासणी करण्याची गरज व्यक्त केली. काही नेते महायुतीत राहून विरोधकांना अनुकूल ठरणारी वक्तव्ये करतात का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
 
“काही लोक महायुतीमध्ये राहून उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला सुखाने झोपता यावे, यासाठी काम करत नाहीत ना? महायुतीमध्ये काही शकुनी मामा बसलेले नाहीत ना, जे नुसत्या काड्या लावत आहेत? हे तपासण्याची आता वेळ आलेली आहे,” असे राणे म्हणाले.
 
महायुतीतील अंतर्गत मतभेदांचा फायदा विरोधकांना होऊ नये, यासाठी सर्व घटक पक्षांनी जबाबदारीने वागण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सूचित केले. संबंधित विषयावर वरिष्ठ नेते योग्य निर्णय घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.(Nitesh Rane Sanjay Raut)

‘निकालाचे विश्लेषण होईल; आवश्यक ती कारवाईही'
 
निवडणुकीत काही ठिकाणी महायुतीतील घटक पक्षांनी अपेक्षित समन्वय राखला नसल्याच्या प्रश्नावर बोलताना राणे यांनी निकालाचे सविस्तर विश्लेषण होणार असल्याचे सांगितले.
 
“आता काल उशिरा निकाल आलेला आहे. आमचे प्रमुख नेते बसतील. नेमके कोणत्या मतदारसंघात कोणी काय भूमिका घेतली, कोणी युतीच्या विरोधात कशी भूमिका घेतली, या सगळ्या बाबींचे विश्लेषण होईल, आत्मपरीक्षण होईल. त्यानंतर त्यानुसार कारवाई आणि शासन होण्याची सुरुवात होईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
 
महायुतीतील मतभेदांवर अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार वरिष्ठ नेतृत्वाकडे असल्याचेही त्यांनी नमूद केले. प्रदेशाध्यक्ष आणि मित्रपक्षांचे प्रमुख नेते या विषयाची दखल घेतील, असे राणे यांनी सांगितले.
 
नागपूरमधील निवडणूक निकालाचा संदर्भ देत राणे यांनी काँग्रेसच्या विजयावरही प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या दाव्यानुसार, पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये भाजपचा उमेदवार आघाडीवर होता; मात्र दुसऱ्या पसंतीच्या मतांमुळे निकालाचे चित्र बदलले.
“पहिल्या पसंतीच्या मतांवर आमचा उमेदवार साडेचार हजारांनी सातत्याने पुढे होता. त्यानंतर दुसऱ्या पसंतीची मते मोजली गेली आणि काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला. मग तुम्ही कोणाच्या नावाने मिठाई वाटत आहात, याचाही विचार करा,” असे ते म्हणाले.
काँग्रेसने या निकालाचे श्रेय घेताना दुसऱ्या पसंतीच्या मतांची भूमिका लक्षात घ्यावी, अशी टीका त्यांनी केली. कराळे गुरुजी यांच्या भूमिकेचा उल्लेख करत काँग्रेसच्या विजयामागे दुसऱ्या पसंतीच्या मतांचा प्रभाव असल्याचा दावा त्यांनी केला.
 
तथापि, मतमोजणीची अधिकृत आकडेवारी आणि संबंधित उमेदवारांची मतसंख्या यांची स्वतंत्र पडताळणी आवश्यक आहे. महायुतीच्या उमेदवारांनी पैशांच्या जोरावर किंवा संस्थाचालकांच्या मदतीने निवडणूक जिंकल्याच्या आरोपांवरही राणे यांनी प्रतिक्रिया दिली. भाजपला राज्यातील जनतेने मोठे समर्थन दिले असल्याचा दावा करत त्यांनी हे आरोप फेटाळले.
“आम्हाला पैशाची काही गरज भासत नाही. आम्ही लोकांची हृदये जिंकणाऱ्यांपैकी आहोत. आम्हाला पैसे आणि दमदाटी करण्याची गरज नाही,” असे ते म्हणाले.(Nitesh Rane Sanjay Raut)
 
भाजपला विधानसभा निवडणुकीत १३२ आमदार निवडून देऊन जनतेने पाठिंबा दिला असल्याचा संदर्भ देत राणे यांनी पक्षाच्या जनाधाराचा मुद्दा मांडला. निवडणुकीतील आरोपांची वस्तुस्थिती आणि निकालातील घडामोडींचा आढावा पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील, असेही त्यांनी सांगितले.
 
मतदान प्रक्रियेत बाद होणाऱ्या मतांचा मुद्दाही राणे यांनी उपस्थित केला. सुशिक्षित मतदारांकडूनही मतदान करताना चुका होत असतील, तर त्यावर सर्व राजकीय पक्षांनी विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
“सुशिक्षित मतदारांकडूनही मत बाद होत असेल, तर या बाबतीत सर्वच राजकीय पक्षांनी विचार करायला पाहिजे,” असे ते म्हणाले. मतदान प्रक्रियेबाबत मतदारांमध्ये अधिक जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचा मुद्दा त्यांच्या वक्तव्यातून पुढे आला.(Nitesh Rane Sanjay Raut)
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर