मुंबई : (Captain Smit Machhar)आकाशात मृत्यूला हुलकावणी देत शेकडो निरपराध प्रवाशांचे प्राण वाचविणारे फ्लायदुबईचे कॅप्टन स्मित मच्छार यांना दुबईच्या प्रतिष्ठित ‘ऑर्डर ऑफ झायेद द्वितीय’ या प्रथम श्रेणीच्या सन्मानाने गौरविण्यात आले. संयुक्त अरब अमिरातीचे (यूएई) राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनी कॅप्टन स्मित मच्छार यांचा सन्मान केला. अबू धाबी येथे आयोजित सन्मान सोहळ्यात याप्रसंगी हल्ल्याच्या वेळी विमानात उपस्थित असलेल्या अन्य कर्मचाऱ्यांचाही सन्मान करण्यात आला.
फ्लायदुबई विमानातील घटनेनंतर कॅप्टन स्मित मच्छार प्रथमच एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात दिसले. दि. ३० सप्टेंबर रोजी ते दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या विमानाचे उड्डाण करत असताना त्यांच्या सहवैमानिकाने त्यांच्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केला होता. गंभीर जखमी होऊनही कॅप्टन स्मित मच्छार यांनी धैर्याने प्रतिकार केला आणि कॉकपिटचा दरवाजा उघडला. त्यानंतर विमानातील प्रवासी आणि कर्मचाऱ्यांनी ओमानी सहवैमानिकाला ताब्यात घेतले.(Captain Smit Machhar)
सन्मान सोहळ्यातील कॅप्टन मच्छार यांची छायाचित्रे समोर आल्यानंतर त्यांच्या धैर्याचे पुन्हा एकदा कौतुक होत आहे. मच्छार यांना रुग्णालयातून पूर्णपणे बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूस झालेल्या गंभीर जखमांच्या खुणा आणि त्यावर घातलेले टाके अद्याप स्पष्टपणे दिसत आहेत. ही छायाचित्रे पाहिल्यानंतर अनेक जण कॅप्टन मच्छार यांच्या धैर्याचे कौतुक करत आहेत.
‘ऑर्डर ऑफ झायेद द्वितीय’ सन्मानाचे महत्त्व काय?
‘ऑर्डर ऑफ झायेद द्वितीय’ हा संयुक्त अरब अमिरातीचा प्रतिष्ठित नागरी आणि लष्करी सन्मान आहे. देश आणि समाजासाठी असाधारण, धाडसी आणि उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा सन्मान प्रदान केला जातो.(Captain Smit Machhar)
फ्लायदुबईच्या विमानात नेमके काय घडले?
फ्लायदुबईचे विमान दुबईहून दि. ३० सप्टेंबर रोजी तेल अवीवकडे रवाना झाले. या विमानात १७४ जण प्रवास करत होते. विमान हवेत असताना सहवैमानिकाने कॅप्टन स्मित मच्छार यांना नमाज पढायची असल्याचे सांगितले. नमाजप्रती आदर व्यक्त करण्यासाठी कॅप्टन मच्छार यांनी समोर पाहण्यास सुरुवात केली. त्याच वेळी ओमानी सहवैमानिकाने मागून त्यांच्या डोक्यावर हल्ला केला. हल्ल्यासाठी सहवैमानिकाने विमानातील आपत्कालीन परिस्थितीत वापरली जाणारी कुऱ्हाड (क्रॅश ॲक्स) वापरली.
कॅप्टन स्मित मच्छार यांनी कॉकपिटचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, सहवैमानिकाने त्यांना रोखून पुन्हा हल्ला केला. कॉकपिटचा दरवाजा उघडल्यानंतर प्रवाशांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले. त्यानंतर विमानातील ड्युटीवर नसलेल्या दोन वैमानिकांनी विमानाचे नियंत्रण हाती घेतले. विमानाचा मार्ग बदलून ते सौदी अरेबियातील तबुक येथे नेण्यात आले. तेथे विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. ओमानी सहवैमानिकाला अटक करण्यात आली, तर स्मित मच्छार यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी मच्छार यांना विमानाने अबू धाबी येथे नेण्यात आले. हल्लेखोरालाही अबू धाबी येथे आणण्यात आले असून, त्याची चौकशी सुरू आहे.(Captain Smit Machhar)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक